फिटनेससाठी पोलिसांची सायकलिंग

By Admin | Updated: May 18, 2014 23:41 IST2014-05-18T23:41:41+5:302014-05-18T23:41:41+5:30

विविध घटनांचा तपास, यामुळे भोजनात होणारी अनियमितता या कारणाने अनेक पोलिसांना पोट सुटायला लागते. यातच वाढलेल्या पोटामुळे विविध आजारांना बळी पडावे लागते.

Police cycling for fitness | फिटनेससाठी पोलिसांची सायकलिंग

फिटनेससाठी पोलिसांची सायकलिंग

 पेट्रोलचीही बचत : आता आरोग्य राहणार सुदृढ

 नरेश रहिले - गोंदिया

विविध घटनांचा तपास, यामुळे भोजनात होणारी अनियमितता या कारणाने अनेक पोलिसांना पोट सुटायला लागते. यातच वाढलेल्या पोटामुळे विविध आजारांना बळी पडावे लागते. काम जलद व्हावे यासाठी आजचा प्रत्येक पोलीस मोटारसायकलचा वापर करतो. यामुळे पोलिसांच्या शरीराचा व्यायाम होत नाही. अन्न पचविण्यासाठी व्यायाम होत नसल्याने पोलिसांचे वजन वाढते. हे वाढणारे वजन विविध आजारांना आमंत्रण देणारे असल्यामुळे पोलीस विभागात असलेले अनेक कर्मचारी अनफिट आहेत. आमगाव पोलिसांनी फिट राहण्यासाठी शहरातील कामकाज पूर्ण करण्यासाठी मोटारसायकलऐवजी सायकलचा वापर करणे सुरू केले आहे. चोरी, दरोडा, खून, अत्याचार, आत्महत्या अशा विविध घटनांचा तपास करण्याच्या कामात व्यस्त असलेल्या पोलिसांना आपल्याकडे प्रलंबित गुन्ह्यांचा निपटारा करण्यासाठी तपासाच्या कामात व्यस्त राहावे लागते. यासाठी वेळीअवेळी जेवण व भूक लागल्यास बाहेरच्या पदार्थांचे सेवन करणे ही बाब पोलिसांसाठी नित्याचीच झाली आहे. यामुळे अनेक पोलिसांचे वजन वाढत आहे. चहाचाही वापर दिवसाकाठी १५ ते २० वेळा होत असल्याने अनेक पोलीस मधुमेहाचे शिकार झालेले आहेत. कामाचा वाढता व्याप, वेळेवर न मिळणारे भोजन व सतत असणारे टेंशन यामुळे पोलिसांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. या विविध कारणांमुळे पोलीस विभागात असणारे कर्मचारी दोन-चार वर्षानंतरच अनफिट व्हायला लागतात. नक्षलग्रस्त भागात काम करणारे पोलीस कर्मचारी जंगलात अनेक किलोमीटर पायी दर्‍याखोर्‍यातून चालत असतात. त्यामुळे ते नेहमीच फिट असतात. परंतु सामान्य पोलिसिंग म्हणजेच पोलिस ठाणे किंवा पोलीस विभागाच्या विविध शाखेत काम करणे. यात पोलिसांचे चालणे जास्त होत नसल्यामुळे त्यांचे पोट बाहेर यायला लागते. बाहेर येणारे पोट हे त्यांच्या शरीरावरील विविध आजारांना आमंत्रण देते. कामाच्या व्यस्ततेत असलेल्या पोलिसांना स्वत:च्या शरीराकडे किंवा आरोग्याकडे लक्ष द्यायला वेळही उरत नाही. पोलिसांनी निरोगी रहावे यासाठी पोलीस विभागाकडून दरवर्षी आरोग्य शिबिर, प्राणायाम शिबिराचे आयोजन केले जाते. परंतु शिबिरात घेतलेल्या धड्यानंतर पोलिसांना प्राणायाम करायलाही वेळ उरत नाही, असे अनेकांचे म्हणणे आहे. त्यामुळे पोलिसांच्या शरीरात विविध आजार घर करुन घेतात. पोलीस विभागातील ६० टक्यांपेक्षा अधिक पोलिसांचे पोट बाहेर आले आहेत. अनेक पोलीस अनफिट असल्याने पोट वाढलेल्या पोलिसांना सेवेतून कमी करणार असाही धस्का दोन वर्षापूर्वी गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी दिला होता. त्यासाठी काही दिवस पोलिसांनी पोट कमी करण्यासाठी कसरतही केली होती. परंतु आता पोलिसांचे वाढलेले पोट त्यांना अनफिट दाखवीत असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे. यासाठी आमगाव पोलीस ठाण्यात नुकतेच रूजू झालेले पोलीस निरीक्षक बी.डी. मडावी, सहायक पोलीस निरीक्षक एस.एस. पवार व एस.एम. शेळके या तीन अधिकार्‍यांनी आपल्या पोलीस ठाण्यातील कर्मचार्‍यांना फिट राहण्यासाठी मोटारसायकलचा कमितकमी वापर करून सायकलचा वापर अधिक करा, असा सल्ला दिला. एवढेच नव्हे तर आमगाव पोलीस ठाण्यातील अर्ध्यापेक्षा अधिक पोलिसांंनी सायकल खरेदी करून फिटनेससाठी त्याचा वापर करीत असल्याचे चित्र आहे. ते अत्यंत तातडीच्या ठिकाणी जायचे असल्यास मोटारसायकलचा वापर करतात. अन्यथा सामान्य कामकाजासाठी सायकलचा वापर केला जात आहे. पोलीस ठाण्यात तीन अधिकारी व ४७ कर्मचारी कार्यरत असून या कर्मचार्‍यांनी फिट राहण्यासाठी सायकलचा वापर केला असला तरी महिन्याकाठी एका कर्मचार्‍याचे एक हजार रुपयांच्या पेट्रोलची बचतही होणार आहे. पोलीस निरीक्षक मडावी, सहायक पोलीस निरीक्षक पवार, शेळके, पोलीस हवालदार निलू बैस, खेमराज खोब्रागडे, रवि खिराडे, देवचंद सोनटक्के, विनोद बरैय्या, निलकंठ रहमतकर, महिला नायक पोलीस शिपाई मीना फुल्लुके व इतर कर्मचार्‍यांंनी याकरिता आपापल्यासाठी सायकल खरेदी केली आहे.

Web Title: Police cycling for fitness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.