वरूणराजाच्या प्रसन्नतेसाठी 'मेंडूकराणी' दिंडी

By Admin | Updated: July 23, 2015 01:43 IST2015-07-23T01:43:51+5:302015-07-23T01:43:51+5:30

^‘मेंडूकरानी पाणी दे, धान कोदो पिकू दे’, ही आर्त हाक मारून बळीराजा आता मेघराजाला प्रसन्न करण्यासाठी धडपडत आहेत.

For the pleasure of Varunaraja 'ManduKarani' Dindi | वरूणराजाच्या प्रसन्नतेसाठी 'मेंडूकराणी' दिंडी

वरूणराजाच्या प्रसन्नतेसाठी 'मेंडूकराणी' दिंडी

बळीराजाची आर्त हाक : सेंदुरवाफा ग्रामस्थांचा सहभाग
नितेश किरणापुरे लवारी
^‘मेंडूकरानी पाणी दे, धान कोदो पिकू दे’, ही आर्त हाक मारून बळीराजा आता मेघराजाला प्रसन्न करण्यासाठी धडपडत आहेत. वरूणराजा प्रसन्न होऊन धरती मातेला चिंबचिंब भिजवून पिके नष्ट होण्यापासून वाचावे, यासाठी सेंदुरवाफा ग्रामस्थांनी श्रद्धेपोटी पौराणिक ‘मेंडूकराणी दिंडी’ च्या रूपाने वरूणराजाला केविलवाणी विनवणी केली.
मागील काही दिवसापासून वरूणराजाने धरती मातेकडे पाठ फिरविली आहे. यामुळे शेतातील पिके करपू लागली असून रोवणी खोळंबली आहे. पावसाच्या आगमनासाठी बळीराजाच्या नजरा नभाकडे लागल्या आहेत. दिवसामागून दिवस निघत असल्याने हातचे पीक जाईल, या भितीने सेंदुरवाफावासीय वरूणराजाला प्रसन्न करण्यासाठी भक्तीभावात लीन झाले.
या दिंडीत एका मुसळावर दोन्ही टोकाला दोन मेंडक (बेडूक) ठेवून त्यांची पुजाअर्चना करून त्याच्यासमोर समस्त ग्रामवासीयांनी मेघराजाला बरसण्याचे आवाहन केले आहे.
जेव्हा जेव्हा दुष्काळ निर्माण केला, तेव्हा तेव्हा ग्रामस्थ मोठ्या आस्थेने मेंडूकराणीची दिंडी काढून वरूणराजाला प्रसन्न करण्याची ही पौराणिक परंपरा जपत असतात.
या दिंडीसाठी सर्व ग्रामस्थ आपसातील हेवेदावे बाजूला सारून एकत्र येतात व मोठ्या भक्तिभावाने ही दिंडी यशस्वी करण्याचा पुरेपूर प्रयत्न करतात. गावावर आलेला दुष्काळ दूर व्हावा यासाठी एकोप्याने आराधना केल्याने वरूणराजाही त्यांच्यावर प्रसन्न झाला. ग्रामस्थांची आराधना संपताच पावसाचे जोरदार आगमन झाले.
त्यामुळे ऐतिहासिक मेंडूकराणी दिंडीचे आजही विशेष महत्व आहे. पावसाच्या आगमनाने चिंताग्रस्त असलेल्या बळीराजाचे चेहरे प्रफुल्लित झाले आहेत.

Web Title: For the pleasure of Varunaraja 'ManduKarani' Dindi