रुग्णाच्या पोटात राहिला प्लास्टिकचा पाईप
By Admin | Updated: July 26, 2015 02:04 IST2015-07-26T02:04:26+5:302015-07-26T02:04:26+5:30
पंचायत समिती सालेकसा येथील कार्यरत लेखापाल संजय मधुकर टिकेकर यांना मूतखड्याचा त्रास वाढल्यामुळे त्यांनी बी.जे. हॉस्पिटल गोंदिया येथे मुतखडा काढण्यासाठी...

रुग्णाच्या पोटात राहिला प्लास्टिकचा पाईप
ग्राहक मंचाकडे धाव : सहा महिन्यानंतर पुन्हा केली शस्त्रक्रिया
सालेकसा : पंचायत समिती सालेकसा येथील कार्यरत लेखापाल संजय मधुकर टिकेकर यांना मूतखड्याचा त्रास वाढल्यामुळे त्यांनी बी.जे. हॉस्पिटल गोंदिया येथे मुतखडा काढण्यासाठी श्स्त्रक्रिया करवून घेतली. परंतु शस्त्रक्रियेदरम्यान डॉक्टरांनी दाखविलेल्या निष्काळजीपणामुळे सहा इंच लांब प्लास्टिकचा पाईप संजय टिकेकर यांच्या पोटात राहिले.
सतत सहा महिने त्रास झाल्यावर पुन्हा सोनोग्राफी द्वारे माहीत झाल्यावर पुन्हा पाईप काढण्यासाठी पैसे वसूल करण्यात आले. त्यामुळे संजय टिकेकर यांनी ग्राहक मंचाकडे धाव घेतली आहे.
सविस्तर असे की, लेखापाल संजय टिकेकर यांना अनेक दिवसांपासून मुतखडयाचा त्रास होता. अनेक प्रकारे औषधी घेतल्यानंतरही त्याचा मुतखडा विळून बाहेर पडला नाही. तेव्हा त्यांनी बी.जे. हॉस्पीटल गोंदिया येथे उपचार करायला गेले. तिथे त्यांना शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला देण्यात आला. टिकेकर यांनी शस्त्रक्रियेसाठी तयारी दर्शविली. २२ मार्चला संजयची शस्त्रक्रिया करुन मुतखडा काढण्यात आला. परंतु त्याच दरम्यान संजयच्या पोटात किडनीजवळ सहा इंच लांब प्लास्टिकचे पाईप ठेवले होते. ते न काढताच आॅपरेशन शिवण्यात आले. त्यामुळे संजयच्या पोटात दुखने बंद होण्याऐवजी वाढत गेले.
त्यांनी या त्रासाबद्दल डॉक्टरांना सांगिले तेव्हा त्यांनी शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. काही दर्दनाशक गोळ्या घेतल्यावर दुखणे बंद होऊन जाईल, असे म्हणत त्यांना औषधी लिहून दिली. दवाखान्यातून सुटी देण्यात आली. यासाठी त्यांना एकंदरित ५२ हजार रुपयांचा खर्च लागला. घरी आल्यावर वेदनानाशक औषधीचे सेवन केल्यावर सुद्धा त्याचे पोटात दुखणे कमी होण्याऐवजी वाढत गेले. तेव्हा त्यांनी आमगाव येथे डॉ. साजीद खान यांच्याकडे तपासणी करविली. त्यांनी संजयला सोनोग्राफी करण्याची सल्ला दिला.
टिकेकर यांनी गोंदिया येथील डॉ.सोनल गुप्ता यांच्याकडे जाऊन सोनोग्राफी व एक्सरे काढून घेतले. त्यात रिपोर्टमध्ये पोटात प्लास्टिक पाईप असल्याचे निष्पन्न झाले. तो रिपोर्ट घेऊन संजय टिकेकरने पुन्हा बी.जे. हॉस्पीटलचे द्वार ठोठावले. तेव्हा तेथील डॉक्टरांनी पुन्हा शस्त्रक्रिया करुन पाईप बाहेर काढले. मात्र स्वत: चूक करुनही पुन्हा ११५० रुपये संजयकडून वसूल केले आहेत. या सर्व प्रकरणामुळे टिकेकर यांनी क्षुब्ध होवून जिल्हा ग्राहक मंचाकडे धाव घेण्याचा निर्णय घेतला आहे.
अशा पद्धतीने डॉक्टरांची चूक असतानाही त्यांनी ती कबूल न करता रुग्णांना वेठीस धरण्याच्या प्रकाराबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (प्रतिनिधी)