मास्यांच्या वाढीसाठी पाणवनस्पतींची लागवड
By Admin | Updated: July 18, 2015 01:20 IST2015-07-18T01:20:47+5:302015-07-18T01:20:47+5:30
भंडारा व गोंदिया हे दोन्ही जिल्हे तलावांचे जिल्हे म्हणून ओळखले जात असले तरी सध्या या तलावांची स्थिती खालावत चालली आहे .

मास्यांच्या वाढीसाठी पाणवनस्पतींची लागवड
सजिवांचा अधिवास : निसर्ग व संस्कृती अभ्यास मंडळाचा पुढाकार
बोंडगावदेवी : भंडारा व गोंदिया हे दोन्ही जिल्हे तलावांचे जिल्हे म्हणून ओळखले जात असले तरी सध्या या तलावांची स्थिती खालावत चालली आहे . माश्यांचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे . पूर्वी मोठ्या प्रमाणात आढळणारे पाणपक्षी अगदी कमी दिसतात. तलावांमधील पाणवनस्पती तर अनेक ठिकाणी पूर्णपणे नष्टच झाल्या आहेत. त्यासाठी तलावांमध्ये पाणवनस्पतींची लागवड करण्यात आली आहे.
तलावांच्या पोटातील जनावरांच्या चाऱ्यांचे प्रमाणही कमी झाले आहे. या सर्व तलवांशी सबंधित नैसर्गिक बाबी नष्ट होण्याचा परिणाम हा त्या तलावांवर अवलंबून असलेल्या शेतकरी, मासेमार, पशुपालक अशा सर्वच लोकांवर होतो. पाणवनस्पती या पाण्यातील इतर सजीवांच्या अधिवासाचा मुख्य भाग आहे. त्यामुळे या वनस्पती तलावांमध्ये परत आल्यास त्यांचे चांगले परिणाम दिसून येतात. माशांवरील रोग नियंत्रणात राहतो, माश्यांना नैसर्गिक खाद्य उपलब्ध होऊन त्यांची वाढ चांगली होते. उन्हाळ्यात पाण्याचे तापमान कमी राहते. मुलकी माशांना घरटे तयार करता येते. स्थलांतरीत पक्षी येतात. पाण्याची गुणवत्ता सुधारते. जल जन्य किडींवर नियंत्रण अशा भूमिकाही संपन्न तलाव पार पाडतो.
तलावांमध्ये पाणवनस्पतींची लागवड करणे आवश्यक आहे. मासेमार समाजातील अनेक तज्ञांचे मत आहे. भंडारा जिल्ह्यातील दी शाम मत्स्यपालन सहकारी संस्था आमगाव येथील गावतलाव (घानोड) व गोंदिया जिल्ह्यातील वाल्मिकी मत्स्यपालन सहकारी संस्था निमगाव येथील वंध्यातलाव व पंचशिल मत्स्यपालन सहकारी संस्था ताडगाव येथील गावतलाव (अर्जुनी मोरगाव)मध्ये पाणवनस्पतींची लागवड करण्यात आली. मुख्यत: चौरा, चिऊल, कुमुदीनी, लाल कमल, गाद, पांझ, पोवन व चिला या पाणवनस्पतींची लागवड तलावांतील वेगवेगळ्या जीवांचा अधिवास तयार होण्याच्या दृष्टीने लावण्यात आल्या. पाणवनस्पतींची लागडव कशी करायची याचे नियम पतीराम तुमसरे व श्री गणेश पुरुष बचत गट, जांभळीच्या सभासदांनी तयार करुन लागवड करतेवेळी प्रत्यक्ष समजावून सांगितले.
जून महिन्याच्या सुरुवातीला वरील तलाव नांगरलेत. त्या जागेत २ ते ३ फूट पाणी आल्यावर गाद, चिला, चिऊल, चौरा, पोवन, पांज, शिमनीफूल, कमळ लावण्यात आले. ज्या वनस्पती पूर्वी त्या तलावात होत्या व नष्ट झाल्या अशाच वनस्पतींची लागवडीकरिता निवड करण्यात आली. या तलावांमध्ये ग्रास कार्प व सायप्रिनस या दोन जातींच्या माश्यांवर बंदी घालण्यात आली. मासे मोठ्या प्रमाणात वनस्पती खाऊन नष्ट करतात. ज्याचा परिणाम पुढे इतर माश्यांच्या वाढीवर होतो व मुलकी जाती नष्टच होतात.
भंडारा निसर्ग व संस्कृती अभ्यास मंडळाच्या वतीने महाराष्ट्र जनुकट कोष या कार्यक्रमाच्या माध्यमातून या संस्थांना मदत करण्यात आली. भारतीय विज्ञान शिक्षण व अनुसंधान संस्था, पुणे व महाराष्ट्र शासनाच्या राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाच्या सहायाने हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. भंडारा निसर्ग व संस्कृती अभ्यास मंडळाचे मनिष राजनकर, महेंद्र राऊत, नंदलाल मेश्राम, शालू कोल्हे व इंदिरा वेठी यांनी या उपक्रमाच्या अंमलबजावणीकरिता सहकार्य केले. (वार्ताहर)