वन महोत्सवात १४ लाख रोपट्यांची लागवड
By Admin | Updated: July 13, 2016 02:27 IST2016-07-13T02:27:35+5:302016-07-13T02:27:35+5:30
शासनाने १ जुलै रोजी राज्यभरात दोन कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवले होते. त्यात गोंदिया जिल्ह्याला १० लाख...

वन महोत्सवात १४ लाख रोपट्यांची लागवड
वन विभागाची उद्दिष्टपूर्ती : वृक्षारोपणासाठी खोदले १० लाख ५४ हजार ६१६ खड्डे
गोंदिया : शासनाने १ जुलै रोजी राज्यभरात दोन कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवले होते. त्यात गोंदिया जिल्ह्याला १० लाख ५४ हजार ६१६ वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. जिल्ह्यात त्या उद्दीष्टापेक्षा जास्त रोपट्यांची लागवड झाली. यासोबतच १ ते ७ जुलैदरम्यान साजऱ्या झालेल्या वनमहोत्सवादरम्यान विविध ठिकाणी वृक्ष लागवडीत भर पडून ही संख्या १४ लाखांच्या घरात पोहोचल्याची माहिती उपवनसंरक्षक डॉ.जितेंद्र रामगावकर यांनी दिली.
पर्यावरणाचे संतुलन कायम राखण्याच्या उद्देशाने शासनाने राज्यभर वृक्ष लागवडीचा उपक्रम राबविला. यात जिल्ह्यातील सर्वच यंत्रणांनी सहभाग घेतला. वन विभाग गोंदियाला सात लाख ४८ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. वन विभागाने आपल्या ७४ साईट्समध्ये सात लाख ४८ हजार रोपट्यांची लागवड करून सदर उद्दिष्टाची पूर्तता केली.
वन विभागाशी निगडीत इतर विभागांनाही वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यात सामाजिक वनीकरण विभागाला २९ हजार, वन विकास महामंडळाला ३१ हजार ८००, नवेगाव-नागझिरा वन्यजीव विभागाला १९ हजार ४६६ वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट मिळाले होते. या विभागांनी तेवढ्याच रोपट्यांची लागवड करून आपली उद्दिष्टपूर्ती केली.
याशिवाय जिल्हाभरातील इतर २० यंत्रणांना दोन लाख २६ हजार ३५० वृक्षांच्या लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र दोन लाख २३ हजार ५३६ रोपट्यांचीच लागवड त्यांनी केली. सदर २० यंत्रणांकडून तब्बल दोन हजार ८१६ रोपट्यांची लागवड करण्यात आली नाही. अशाप्रकारे जिल्ह्यात एकूण १० लाख ५१ हजार ८०२ रोपट्यांची लागवड करण्यात आली.
वृक्षारोपणाचे कार्य तर आटोपले. परंतु आता प्रमुख समस्या म्हणजे त्यांचे संरक्षण व संवर्धनाची आहे. ही जबाबदारी वन व्यवस्थापन समित्यांना देण्यात आली आहे. त्यांच्या संवर्धनासाठी नागरिकांमध्ये शासनाच्या वतीने आणखी जागृती आणणे गरजेचे आहे.
अन्यथा लागवड केलेल्या रोपट्यांपैकी किती जिवंत राहतील व किती नष्ट होतील, भविष्यात हा एक शोधाचा विषय ठरणार आहे. (प्रतिनिधी)