विकासाचे दूरदृष्टीने नियोजन करा

By Admin | Updated: March 20, 2016 02:13 IST2016-03-20T02:13:57+5:302016-03-20T02:13:57+5:30

जिल्ह्यात रोजगार हमी योजनेतून रोजगार निर्मिती करण्यासोबत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विविध योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी निर्णय घेतले जात आहेत.

Plan with a vision of development | विकासाचे दूरदृष्टीने नियोजन करा

विकासाचे दूरदृष्टीने नियोजन करा

पालकमंत्र्यांचा सल्ला : सरपंच मेळावा व स्वच्छ भारत मिशन कार्यशाळा
गोंदिया : जिल्ह्यात रोजगार हमी योजनेतून रोजगार निर्मिती करण्यासोबत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विविध योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी निर्णय घेतले जात आहेत. ग्रामीण भागाचे चित्र बदलण्यासाठी यंत्रणा आणि लोकप्रतिनिधींनी विकास कामांचे दूरदृष्टीने नियोजन करावे, असा सल्ला पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दिला.
जिल्हा परिषदेच्या वतीने शनिवारी (दि.१९) जिल्हास्तरीय सरपंच मेळावा व स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत ‘आमचे गाव, आमचा विकास’ या विषयावरील कार्यशाळा कटंगीकला येथे आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेचे उद्घाटक म्हणून पालकमंत्री बडोले बोलत होते.
अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष उषाताई मेंढे तर प्रमुख अतिथी म्हणून खा.नाना पटोले, खा.अशोक नेते, आ.गोपालदास अग्रवाल, आ.संजय पुराम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गावडे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष रचना गहाणे, जि.प. िशक्षण व आरोग्य समतिी सभापती पी.जी. कटरे, कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती छाया दसरे, समाजकल्याण सभापती देवराज वडगाये, कटंगीकलाच्या सरपंच कांता नागरीकर यांची उपस्थिती होती. याशिवाय प्रमुख मार्गदर्शक म्हणून हिवरेबाजारचे माजी सरपंच तथा राज्यस्तरीय आदर्श गाव समितीचे अध्यक्ष पोपटराव पवार, नांदेड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांची उपस्थिती होती.
पालकमंत्री बडोले पुढे म्हणाले, रोहयोमध्ये ग्रामविकासाला चालना देण्याची मोठी क्षमता आहे. तालुका हा घटक मानून कुशल व अकुशलची कामे रोहयोतून करावी. पालकमंत्री पांदण रस्ते योजना ही राज्य शासनाने नुकतीच सुरु केली आहे. ही योजना शेतकऱ्यांना शेतीसाठी उपयुक्त असून महसूल विभागाच्या सहकार्यातून मोठ्या प्रमाणात पांदण रस्ते आता करणे शक्य होणार आहे.
सामाजिक न्याय विभागाच्या निधीतून घरकुलांची योजना प्रभावीपणे राबविणार असल्याचे सांगून पालकमंत्री पुढे म्हणाले की, या योजनेतून २०१९ पर्यंत १ लाख ५१ हजार लोकांना घरकूल देण्यात येईल.
गोंदिया हा जलसंपन्न जिल्हा असून आतापासून भविष्यातील पाणी टंचाई टाळण्यासाठी पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा काटकसरीने वापर केला पाहिजे, असेही ते म्हणाले.
अध्यक्षस्थानावरून बोलताना जि.प. अध्यक्ष मेंढे म्हणाल्या, विविध योजनांची ग्रामपंचायतस्तरावर प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे. हागणदारीमुक्त गाव करण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा. १४ व्या वित्त आयोगाचा निधी थेट ग्रामपंचायतींना मिळणार असल्यामुळे त्याचे नियोजन ग्रामपंचायतींनी करावे. महिलांनी सरपंच म्हणून काम करतांना नियमाने व प्रत्येक विषयाचा अभ्यास करु न काम करावे, असे त्या म्हणाल्या.
यावेळी खा.पटोले यांनी ग्रामपंचायतींनी केंद्र सरकारच्या निधीतून सिंचन, वीज, रस्ते, आरोग्य विषयक कामे केली पाहिजे, असे सांगितले. तर खा.नेते यांनी सरपंच व सचिव हे गावाच्या विकासाचे केंद्रबिंदू आहे. शासनाच्या विविध योजना ग्रामपंचायतीने प्रभावीपणे राबविल्यास ग्राम विकासाला चालना मिळणार असल्याचेही सांगितले. आ.अग्रवाल म्हणाले, गावात कुणीही दारिद्र्यरेषेखाली राहणार नाही यासाठी योजनांचा लाभ द्यावा. प्रत्येक कुटुंबाने घरपट्टी, पाणीपट्टी नियमीत भरून ग्रामपंचायतीला सहकार्य करावे. लोकप्रतिनिधींनी सुद्धा दृढ संकल्प करुन आपल्या गावाचा कायापालट केला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे (बार्टी)च्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीचे औचित्य साधून जिल्ह्यातील ४४३ ग्रामपंचायतींना प्रत्येकी सहा हजार रुपये किमतीच्या पुस्तकांचा संच देण्यात येणार आहे. प्रातिनिधिक स्वरुपात एका ग्रामपंचायतीला हा संच पालकमंत्र्यांच्या हस्ते वाटप करण्यात आला.
यावेळी स्वच्छ भारत मिशन लोगोचे विमोचन, जलजागृती अभियानांतर्गत जलपूजन आणि स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) जि.प. गोंदिया यांच्या 18002334056 या टोल फ्री क्रमांकाचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. संचालन मंजुश्री देशपांडे यांनी तर आभार एस.एन. वाघाये यांनी मानले. (जिल्हा प्रतिनिधी)

उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा सत्कार
यावेळी उत्कृष्ट काम करणाऱ्या सरपंच व सचिवांचा तसेच आदर्श ग्रामसेवकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये बिरसी ग्रामपंचायतचे रवींद्र तावाडे (सरपंच), के.आर.धांडे (सचिव), मुरदोली ग्रामपंचायतचे सुरेशचंद्र भगत (सरपंच), आर.एन. बाहेकर (सचिव), गांधीटोलाच्या रेखा फुंडे (सरपंच), एस.एस .रहांगडाले (सचिव), जेठभावडाचे डॉ.जितेंद्र रहांगडाले (सरपंच), एस.डब्ल्यू. बन्सोड (सचिव), खोपडाचे संतोष बावणकर (सरपंच), एस.एस. गोरे (सचिव), फुक्कीमेटाचे दिगांबर चौधरी (सरपंच), एन.एम. मेश्राम (सचिव), राजगुडाचे पुष्पलता पंचभाई (सरपंच), पी.एन. चाचेरे (सचिव), आदर्श ग्रामसेवक पी.डी. बिसेन, डब्ल्यू.टी.सातपुते, पी.ए. भिलकर, श्रीमती के.एम. बागडे, श्रीमती आर.बी. ढोक, डी.एन. शहारे, नरेंद्र गोमासे, एल.आर. ठाकरे, डी.टी.बिसेन, आय.जी. लांजेवार, कमलेश बिसेन, डी.डी. लंजे, एस.जे. परमार, पी.आर. चौधरी, एस.डब्ल्यू.कुथे, एस.ए.खडसे, भास्कर झोडे, एन.डी. अतकरे, एस.एस. राठोड, आर.बी. बावनकुळे, ओ.जी. बिसेन, जी.डी. चारथळ यांचा समावेश आहे. यावेळी राज्यस्तरीय उत्कृष्ट वक्तृत्व स्पर्धेत तिसरी आल्याबद्दल नेहा कापगते हिचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

रोहयोवर १०२ कोटी खर्च
प्रास्ताविकातून सीईओ गावडे यांनी रोहयोवर १०२ कोटी रु पये यावर्षी खर्च करण्यात आले. त्यामुळे गावपातळीवर पायाभूत सुविधा व वैयक्तिक योजनांचा लाभ देण्यास मदत झाल्याचे सांगितले.
जिल्ह्यातील ५१६ ग्रामपंचायतींना २८ कोटी रुपये १४ व्या वित्त आयोगातून देण्यात येणार आहे. ३१ मार्चपर्यंत दिलेला इष्टांक पूर्ण करण्याचा आपला प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Plan with a vision of development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.