पाणीपुरवठा योजनेची पाईपलाईन नादुरुस्त

By Admin | Updated: July 22, 2016 02:41 IST2016-07-22T02:41:00+5:302016-07-22T02:41:00+5:30

खांबी प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचा मुख्य सीआय पाईप फुटल्याने १६ जुलैपासून २० गावांचा पाणी पुरवठा बंद आहे.

Pipeline repair of water supply system | पाणीपुरवठा योजनेची पाईपलाईन नादुरुस्त

पाणीपुरवठा योजनेची पाईपलाईन नादुरुस्त

सीआय पाईप फुटला : तीन दिवसांपासून पाणीपुरवठा बंद
नवेगावबांध : खांबी प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचा मुख्य सीआय पाईप फुटल्याने १६ जुलैपासून २० गावांचा पाणी पुरवठा बंद आहे. ऐन पावसाळ्याच्या दिवसात या घटनेमुळे नागरिकांना शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे.
सदर योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने तयार केली असून सन २०१० पासून खांबी प्रादेशिक पाणी पुरवठा मंडळ जिल्हा परिषदेच्या मार्गदर्शनात चालवत आहे. सदर योजना नवेगाव जलाशयावर तयार केलेली आहे. या योजनेद्वारे नवेगाव, बोंडे, देवलगाव, पंचवटी, सुरगाव, चापटी, खांबी, बाराभाटी, ब्राम्हणटोला, कुंभीटोला, कवठा, डोंगरगाव, बोळदे, मुंगली, भुरसी, बीड, उमरी, सावरटोला, बोरटोला व मुंगलीटोली या वीस गावांना शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. १६ जुलैपासून खोली- बोंडे या गावाजवळ मुख्य पाईपलाईन फुटल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. पावसाळ्याच्या दिवसात विहिरी व बोअरवेलमध्ये पाणी गढूळ असते. त्यामुळे नळाचे शुद्ध पिण्याचे पाणी आवश्यक असते. पाणी पुरवठा बंद असल्यामुळे नागरिकांना उपलब्ध असलेल्या पाण्यावरच गरज भागवावी लागत आहे. फुटलेली पाईपलाईन त्वरित दुरुस्त करुन पाणी पुरवठा नियमित सुरू करावा, अशी नागरिकांची मागणी आहे.
उपविभागीय अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग नवेगावबांध यांच्याशी भ्रमणध्वनीवरुन संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही. पाईपलाईन दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
पावसामुळे कामात व्यत्यय येत आहे. तरी देखील मंडळाचे कर्मचारी रात्रंदिवस एक करुन येत्या चोवीस तासात पाणी पुरवठा सुरळीत सुरू करतील, अशी हमी खांबी प्रादेशिक पाणी पुरवठा मंडळाचे अध्यक्ष किशोर तरोणे यांनी दिली आहे. (वार्ताहर)

Web Title: Pipeline repair of water supply system

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.