स्थानकावरील वॅगनमधून पेट्रोलची चोरी

By Admin | Updated: February 25, 2015 00:15 IST2015-02-25T00:15:22+5:302015-02-25T00:15:22+5:30

मुंबई-हावडा मध्य रेल्वेच्या नागपूर विभागांतर्गत तिरोडा तालुक्यातील काचेवानी रेल्वे स्थानकावर रेल्वे वॅगनमधून पेट्रोलची चोरी होण्याचा प्रकार घडत आहे.

Petrol stolen from the wagon at the station | स्थानकावरील वॅगनमधून पेट्रोलची चोरी

स्थानकावरील वॅगनमधून पेट्रोलची चोरी

तिरोडा/काचेवानी : मुंबई-हावडा मध्य रेल्वेच्या नागपूर विभागांतर्गत तिरोडा तालुक्यातील काचेवानी रेल्वे स्थानकावर रेल्वे वॅगनमधून पेट्रोलची चोरी होण्याचा प्रकार घडत आहे. व्हॅगनचे नटबोल्ट ढिले करून व सील तोडून ही चोरी करण्यात येत असल्याची तक्रार काही सुज्ञ नागरिकांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे. मात्र हा पेट्रोल चोरीचा प्रकार आहे की पेट्रोल गळतीचा हे स्पष्ट झालेले नाही.
पाच महिन्यांपूर्वीपासून रेल्वेच्या मालवाहू टँकरमधून पेट्रोलची चोरी होत असल्याचा ँप्रकार काही नागरिकांच्या लक्षात येत आहे. अशीच घटना ७ फेब्रुवारी २०१५ च्या सकाळी १०.४५ वाजता सुरू असताना काही नागरिकांनी त्याचे मोबाईलमध्ये व्हिडीओ चित्रीकरण केले. त्यात वॅगनच्या खाली बॉटल लावून पेट्रोल जमा केले जात असल्याचे दिसून आले. मात्र ही पेट्रोल चोरी होती, की अनावश्यक झिरपत असलेले ते पेट्रोल बॉटलमध्ये भरल्या जात होते हे स्पष्ट होऊ शकले नाही. असाच प्रकार दि.२० फेब्रुवारीलाही घडला. त्या दिवशी वॅगनच्या दोन टँकरमधून पेट्रोल झिरपत असल्याचे दिसून आले.
याच पद्धतीने ५ वर्षांपूर्वी गंगाझरी रेल्वे स्थानकावर वॅगनमधील पेट्रोल बॉटलमध्ये जमा केले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यावेळी याची तक्रार रेल्वे विभागाला करण्यात आली होती. आता असेच प्रकरण काचेवानी रेल्वे स्थानकावर घडत आहे. काचेवानी स्थानकावर पेट्रोलची वॅगन नेहमीच थांबते. यात पेट्रोलच्या टँकरचे नटबोल्ट मुद्दाम ढिले करुन पेट्रोलची चोरी केली जात असल्याचा संशय नागरिकांनी केला आहे.
या प्रकरणाची तक्रार आर.टी.आय. कार्यकर्ते राजेश तायवाडे यांनी रेल्वे प्रशासन, रेल्वे पोलीस आणि केंद्र व राज्य शासनाकडे केली आहे. मात्र नटबोल्ट ढिले करून पेट्रोलची चोरी होत असल्याचा प्रकार रेल्वे प्रशासनाने फेटाळला आहे.
२० फेब्रुवारीला तिरोड्याकडून काचेवानीकडे एक वॅगन येत असताना काचेवानी रेल्वे चौकीवर पेट्रोल झिरपत असल्याचे पाहण्यात आले. ही ट्रेन काचेवानी स्टेशनवर पोहोचताच चालक आणि गार्ड यांनी दोन टँकर मधून झिरपत असलेले पेट्रोल बंद करण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रयत्न केल्यावर सुध्दा पेट्रोल झिरपने बंद झालेले नव्हते.
रेल्वे वॅगनमध्ये तेल घालणे आणि त्याला सील करणे ही तेल कंपनीची जबाबदारी आहे. पेट्रोल-डिझेल हे ज्वलनशील पदार्थ असल्याने याची दखल कंपनीने दक्षतेने घ्यायला पाहिजे. रेल्वे प्रशासनाने अशा गंभीर घटनेची उत्पत्ती होणार नाही याची खबरदारी घ्यायला पाहिजे. मात्र त्याकडे तेल कंपनी आणि रेल्वे प्रशासन दुर्लक्ष करून कळून न कळल्यासारखे करीत आहेत. या हलगर्जीपणातून पेट्रोल चोरीला प्रोत्साहन मिळण्यासोबतच एखाद्या वेळी मोठा अपघात होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. रेल्वेच्या मालवाहू टॅँकर खाली बॉटल किंवा अन्य साहित्य लावून तेल जमा करण्याचा प्रयत्न केला तर याला कोणीही व्यक्ती चोरी करत आहे असे म्हणणे स्वाभाविक आहे. मात्र कंपनी आणि रेल्वे प्रशासनाने या समस्येला गांभिर्याने घेतलेले नाही. (शहर प्रतिनिधी)
हा प्रकार मुद्दाम करीत नाही
या प्रकाराबाबत काचेवानी रेल्वे स्थानकावरील अधिकाऱ्यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, एका ट्रेनमध्ये ५० वॅगन असतात. काही वॅगनचे व्हॉल्व किंवा नटबोल्ट चालत्या गाडीत ढिले झाल्याने तेल झिरपते. पेट्रोल झिरपल्याने आग लागण्याची भीती टाळण्याकरिता खाली प्लास्टिक बॉटल लावून ते जमा केले जाते. मात्र आजपर्यंत कोणीही कर्मचाऱ्यांने किंवा इतर कोणी मुद्दाम अशा पद्धतीने पेट्रोल-डिझेल काढून चोरी केलेली नाही, असे त्यांनी सांगितले.
नागरिकांनाही झाली सवय
परिसरातील १५ ते २० रेल्वे कर्मचाऱ्यांशिवाय अन्य नागरिकांना टॅकरमधून तेल चोरी संबंधात विचारण्यात आले असता नटबोल्ट ढिले करून तेल चोरी होत असल्याचे आम्ही पाहिले नसल्याचे ते म्हणाले. मात्र अनेक वेळा टॅकरमधून तेल झिरपत असल्याचे अनेकदा पाहण्यात आल्याचे त्यांनी लोकमतला सांगितले. तेल चोरी की, हा कंपनीचा बेजबाबदारपणा याचे मूळ कारण तपासणे गरजेचे आहे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Web Title: Petrol stolen from the wagon at the station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.