अन्यायग्रस्त शिक्षकाने मागितली आत्मदहनाची परवानगी
By Admin | Updated: October 29, 2015 00:17 IST2015-10-29T00:17:04+5:302015-10-29T00:17:04+5:30
जिल्हा परिषद गोंदियाच्या शिक्षण विभागाने कोणतेही कारण नसताना शिक्षक एन.एल. माने यांचे निलंबन केले.

अन्यायग्रस्त शिक्षकाने मागितली आत्मदहनाची परवानगी
गोंदिया : जिल्हा परिषद गोंदियाच्या शिक्षण विभागाने कोणतेही कारण नसताना शिक्षक एन.एल. माने यांचे निलंबन केले. परंतु शिक्षणाधिकाऱ्यांनी हेतुपुरस्सर त्यांना निलंबित केल्याच्या कारणाला घेऊन त्यांनी कुटुंबासह आत्मदहन करण्याची परवानगी शिक्षक माने यांनी मुख्यमंत्री व राज्यपाल यांच्याकडे केली आहे.
शिक्षणाधिकाऱ्यांनी मुकाम यांची दिशाभूल करुन निलंबनाचा आदेश मंजुर करवून घेतला. २६ आॅगस्टपासून आजपर्यंत पुराव्यासह निवेदन देण्यात आले. ही माहिती माहितीच्या अधिकारात मागविण्यात आली. आयुक्त नागपूर यांनी या सनदर्भात तत्काळ कारवाई करण्याचे पत्र दिले. मात्र आयुक्तांच्या पत्राला सर्वांनी केराची टोपली दाखविली आहे.
शिक्षण विभागाने खोटी टिपणी तयार केली. नियमबाह्य आरोप दर्शविण्यात आले. सेवाशिस्त अधिनियम १९६७ व १९६४ ची उधळपट्टी करण्यात आली. ज्या अर्थी टिपणी तयार करणारे आणि त्याला सहमती दर्शविणाऱ्यांना अधिनियमाची, कायद्याची जाणीव नसल्याचे कृत्य शिक्षण विभागाकडून झाले असल्याचे माने यांनी म्हटले आहे.
अयोग्यरित्या, सुडभावनेतून, राजकीय दबावाखाली, जातीयवादातून कारवाई करण्यात आली. बचावाकरिता अभिलेखाची आणि निलंबनासंबंधी माहिती मागितल्यावर दिली जात नाही. या प्रकारामुळे माने परिवाराची आर्थिक कोंडी झाली आहे. कर्जाऊ रक्कमेवर मासिक व्यापाचा भूर्दंड बसत आहे.
आपण कसलाही शिस्त भंग केली नसताना निलंबनाची कारवाई करण्यात आली. निलंबनाचे आरोप लावण्यात आले त्याचे पूर्ण पुरावे जि.प. आणि विभागीय आयुक्त यांना देण्यात आले आहेत. या त्रासाला कंटाळून १४ आॅक्टोबरला राज्यपाल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे पत्र पाठवून एन.एल. माने आणि पत्नी सुमरना (निता) माने यांनी आत्मदहनाची परवानगी मागितली आहे.
शिक्षणाधिकारी घनश्याम एन.पाटील, कक्ष अधिकारी व कनिष्ठ, वरिष्ठ सहायक तसेच टिपणीमध्ये कारवाईला डोळे मिटून शहनिशा न करता सहमती दर्शविणारे व अनुमोदीत करणारे सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या जाचामुळे आत्मदहन करण्याची परवनागी माने कुटुंबियांनी मागीतली आहे.
आत्मदहनाच्या परवानगीच्या पत्राची प्रत जिल्हाधिकारीच्या मार्फत देण्यात आली असून डाकद्वारे पाठविण्यात आल्या आहेत. पालकमंत्री राजकुमार बडोले, पोलीस अधीक्षक गोंदिया, पोलिस ठाणे ग्रामीण, मुकाअ गोंदिया यांना माहितीसाठी पाठविण्यात आल्या आहेत. (तालुका प्रतिनिधी)