लोकप्रतिनिधी महोदय, रस्त्याने चालून पाहा..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:28 IST2021-07-31T04:28:52+5:302021-07-31T04:28:52+5:30

मुन्नाभाई नंदागवळी बाराभाटी : ज्या ठिकाणी रस्ता नाही, त्याठिकाणी रस्ता तयार केला जातो, परंतु जो रस्ता आहे तो रस्ता ...

People's Representative, try walking on the road ..! | लोकप्रतिनिधी महोदय, रस्त्याने चालून पाहा..!

लोकप्रतिनिधी महोदय, रस्त्याने चालून पाहा..!

मुन्नाभाई नंदागवळी

बाराभाटी : ज्या ठिकाणी रस्ता नाही, त्याठिकाणी रस्ता तयार केला जातो, परंतु जो रस्ता आहे तो रस्ता मात्र सुरळीत केला जात नाही. रस्ते बांधकामासाठी आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्य कामाचे कंत्राट देतात. मात्र गेल्या २५-३० वर्षांपासून भोयीनगर-चापटी रस्त्याकडे कुणाचेही लक्ष गेले नाही. म्हणूनच भोयीनगरवासीयांनी लोकप्रतिनिधींना ‘महोदय या चिखलाच्या रस्त्याने चालून पहा..!’ असे निमंत्रणच दिले आहे.

हे गाव टोली बाराभाटी ग्रामपंचायतीच्या वॉर्ड क्रमांक-३ मध्ये असून, येथे अनेक समस्या ठाण मांडून आहेत. या वाॅर्डातून म्हणजे भोयीनगर-चापटी या कालव्याच्या बाजूने दळणवळणासाठी असलेला कच्चा रस्ता सुरुवातीपासूनच मुख्य रस्ता आहे. गावातील अनेक रस्ते चांगले बनले आहेत; पण हाच रस्ता दुर्लक्षित आहे. या रस्त्याकरिता अनेक लोकप्रतिनिधी व जिल्हा परिषदेला निवेदन दिले; पण कोणत्याही लोकप्रतिनिधींच्या गाडीची चाके अद्यापही या रस्त्याकडे वळली नसून, ही फार मोठी शोकांतिका आहे. दोन-चारवेळा अर्जुनी-मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांना परस्पर भेटून समस्या मांडली; पण अजून काहीच झाले नाही. पावसाळ्यात या चिखलाच्या रस्त्याने पायीसुद्धा चालता येत नाही. तर सायकल व कोणतेही वाहन जाऊ शकत नाही. पण एकाही लोकप्रतिनिधीला या भागातील नागरिकांची काळजी वाटत नाही. रस्त्याची दुरवस्था झाल्यामुळे नागरिकांची अडचण होत आहे. अशात निवेदन देऊनही काहीच फायदा झाला नसल्याने भोयीटोलावासीयांनी लोकप्रतिनिधींना या रस्त्याने चालून पाहण्याचे आमंत्रणच दिले आहे.

................

स्थानिक निधीतून रस्त्याचे काम करा

क्षेत्रात विकासाची कामे करण्यासाठी आमदार व खासदारांना निधी दिला जातो. मात्र त्यानंतरही त्यांनी आपल्या निधीची उपयोग करून या रस्त्याचे काम करविले नाही. परिणामी आज नागरिकांची अडचण होत आहे. त्यामुळे स्थानिक निधीतून या भोयीनगर-चापटी रस्त्याचे काम करून दयावे, अशी मागणी भोयीनगरवासीयांनी केली आहे.

Web Title: People's Representative, try walking on the road ..!