खुरखुडीवासीयांना लागली शिक्षणाची ओढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:52 IST2021-02-06T04:52:58+5:302021-02-06T04:52:58+5:30
बिरसी-फाटा : तिरोडा तालुक्याती खुरखुडी हे एक छोटेशे गाव आहे. मात्र येथील गावकऱ्यांना शिक्षणाची ओढ लागली असून, आपल्या ...

खुरखुडीवासीयांना लागली शिक्षणाची ओढ
बिरसी-फाटा : तिरोडा तालुक्याती खुरखुडी हे एक छोटेशे गाव आहे. मात्र येथील गावकऱ्यांना शिक्षणाची ओढ लागली असून, आपल्या पाल्यांच्या शिक्षणासाठी ते जमेल ती मदत करण्यासाठी सरसावत आहेत. यातूनच ग्रामपंचायतने शाळेत विविध विकासकामे करवून दिली असून, आता आरओ भेट दिला आहे.
ग्रामपंचायतकडून खेळाच्या मैदानात पेवर ब्लॉकचे काम, संपूर्ण शाळा डिजिटल, रंगरंगोटी, शाळेला कमोड आणि साधे शौचालय, शाळेला नवीन आवारभिंत बांधकाम, नवोदय विद्यालयात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना ग्रामपंचायतकडून एक हजार रुपये प्रोत्साहन राशी भेट, गावात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नव्हती ती व्यवस्था करून दिली, ग्रामपंचायतच्या आवारात सुशोभित गार्डन आदि कामे सरपंच छत्रपती बोपचे आणि सदस्यांच्या प्रयत्नातून झाली आहेत. तसेच या गावची शाळा सुद्धा जिल्ह्यात खूप चर्चेत आहे. मागील दोन वर्षांपासून शाळेतील विद्यार्थी नवोदय विद्यालयात असून, स्कॉलरशिपमध्ये पाच मुले तालुक्यात टॉपर ठरले आहेत. विशेष म्हणजे, या गावचे लोक खूप जागरूक असून, गावातील सेवानिवृत्तांकडून शाळेला तीन संगणक संच भेट देण्यात आले आहेत. लोकवर्गणीतून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला सभामंडपाकरिता १.३० लाख रुपये देण्यात आले आहेत. सायंकाळी ५ ते ६ वाजतादरम्यान इंग्लिश ग्रामरचा अभ्यास गावातीलच सुशिक्षितांकडून करविला जातो. सकाळी ९ ते १० या कालावधीत एक तास संगणक जागृती करण्यात येते. लोकवर्गणीतून शाळेतील विद्यार्थ्यासाठी शौचालय तयार करून देण्यात आले आहे.