तीन वर्षांपासून गणवेश निधी प्रलंबित

By Admin | Updated: April 2, 2015 01:12 IST2015-04-02T01:12:06+5:302015-04-02T01:12:06+5:30

सुरक्षित प्रवासाचे ब्रिद घेवून धावणाऱ्या एसटीच्या कर्मचाऱ्यांना अनेक सोयीसुविधा दिल्या जात नाही.

Pending the uniforms for three years | तीन वर्षांपासून गणवेश निधी प्रलंबित

तीन वर्षांपासून गणवेश निधी प्रलंबित

गोंदिया : सुरक्षित प्रवासाचे ब्रिद घेवून धावणाऱ्या एसटीच्या कर्मचाऱ्यांना अनेक सोयीसुविधा दिल्या जात नाही. चालक-वाहकांसह इतर सर्वच कर्मचाऱ्यांना वेळेवर सवलती पुरविल्या जात नाहीत. त्यामुळे कर्मचाऱ्यांना मूलभूत सोयींपासून वंचित ठेवण्यात येत असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांकडून केला जातो. आता गणवेशाकरिता मिळणारा निधी तीन वर्षांपासून मिळाला नाही, असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.
मनुष्याचा सर्वांगिण विकास व प्रगतीत दळणवळण हा महत्त्वाचा घटक आहे. दळणवळणात एसटी महामंडळाचा महत्त्वाचा वाटा आहे. सर्वसामान्य माणूस प्रवासासाठी एसटीच्या बसलाच प्राधान्य देतो. एसटी बस चालविणाऱ्या चालक-वाहकांसोबतच वाहतूक निरीक्षक, प्रशासकीय कर्मचारी वर्ग, कामगारांसह अधिकारी वर्गसुद्धा सुरक्षित व सुखकर प्रवासासाठी आपापल्या विभागामध्ये कार्यरत आहेत.
चालक-वाहक, प्रशासकीय कर्मचारी यांना गणवेश कापड, पावसाळ्यात रेनकोट, हिवाळ्यामध्ये ब्लँकेट, कुटुंबासाठी एकेक महिना सलग असे दोन महिने मोफत प्रवास, वैद्यकीय खर्च, इतर थोड्याफार सोयी-सवलती दिल्या जातात. या सवलती आजपर्यंत वेळेवर सदर कर्मचाऱ्यांना मिळाल्या नाहीत.
चालक-वाहक इतर कर्मचाऱ्यांना खाकी, तर कामगारांना वर्षभरात प्रत्येकी पाच मीटर निळे कापड दोन गणवेशांकरिता दिले जाते. महामंडळाच्या दरानुसार हे गणवेश कर्मचाऱ्यांना बाहेर तयार करावे लागतात. परंतु बहुसंख्य कर्मचाऱ्यांना तीन वर्षांपासून गणवेशासाठी लागणारे कापड पुरविण्यात आलेच नाही. त्यामुळे कार्यालयीन कर्मचाऱ्यांना विशेष त्रास सहन करावा लागत नसला तरी चालक-वाहकांना बाहेर जिल्ह्यात प्रवासादरम्यान दंडाच्या कारवाईची भीती त्यांना सतावत राहते. शिवाय तीन वर्षांमध्ये हिवाळ्यातील ब्लँकेट, पावसाळ्याच्या दिवसांत सुरक्षिततेसाठी पुरविले जाणारे रेनकोटसुद्धा प्रलंबितच आहेत.
किरोकोळ सामान्य सवलती मिळण्यासाठी एसटी महामंडळाकडून दिरंगाई होते. परंतु आजारपणासोबतच म्हातारपणात अत्यावश्यक असणारे वैद्यकीय देयके, पेन्शन, प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅच्युईटी आदींची रक्कमही अनेकांची थांबलेली आहे. अशात कर्मचाऱ्यांनी काय करावे, असा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Pending the uniforms for three years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.