पाच महिन्यांपासून वेतन प्रलंबित
By Admin | Updated: August 6, 2015 00:51 IST2015-08-06T00:51:10+5:302015-08-06T00:51:10+5:30
आंग्ल व आयुर्वेदिक दवाखाने या योजनेतील ६१ कर्मचाऱ्यांचे गेल्या पाच महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्याची माहिती मिळाली आहे.

पाच महिन्यांपासून वेतन प्रलंबित
अर्जुनी मोरगाव : आंग्ल व आयुर्वेदिक दवाखाने या योजनेतील ६१ कर्मचाऱ्यांचे गेल्या पाच महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांची आर्थिक कोंडी झाली असून उपासमारीचे संकट उद्भवले आहे.
प्राप्त माहितीनुसार, आंग्ल दवाखाने या योजनेत जिल्ह्यात तीन दवाखाने आहेत. येथे वैद्यकीय अधिकारी, औषध वितरक व परिचर असे तीन पदे मंज़ूर आहेत. जिल्ह्यात एकूण नऊ कर्मचारी कार्यरत आहेत. तसेच जिल्ह्यात आयुर्वेदिक दवाखान्यांची संख्या २६ आहे. येथे प्रत्येकी दोन पदे मंजूर आहेत. असे एकूण ५२ कर्मचारी कार्यरत आहेत. या दोन्ही योजनेतील जिल्ह्यातील ६१ कर्मचाऱ्यांचे गेल्या पाच महिन्यांपासून वेतन मिळाले नाही. सध्या कर्मचाऱ्यांची आॅनलाईन वेतनप्रणाली सुरू आहे. या योजनेतील पदे अजूनही शासन स्तरावरुन मंजूर नसल्याने वेतन देण्यात दिरंगाई होत असल्याचे समजते.
गोंदिया जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना ही अडचण माहिती असूनही गांभिर्याने लक्ष दिले जात नसल्यामुळे या कर्मचाऱ्यांवर उपासमारीचे संकट उद्भवले आहे. चौकशी केली असता थातुरमातूर उत्तर दिले जाते.
सध्या शैक्षणिक सत्र सुरू झाले आहे. अनेक कर्मचाऱ्यांची मुले ही बाहेरगावी शिक्षण घेतात. पगार नसल्याने आधीच घरात उपासमार सुरू आहे. मुलांना पाठविण्यासाठी पैसे कुठून आणणार? पाच महिन्यांची उसनवार वाढल्याने कर्ज देणारे, व्यापारी हे पैशाची मागणी करतात. या दृष्टचक्रात हे कर्मचारी अडकले आहेत. या कर्मचाऱ्यांचे वेतन मिळाले असल्याचे वरिष्ठ अधिकारी सांगतात. मात्र प्रत्यक्षात कर्मचाऱ्यांना वेतन मिळालेच नसल्याचे कर्मचारी सांगत आहेत. (तालुका प्रतिनिधी)
बांगड्यांचे वितरण आज व उद्या
गोंदिया : लोकमत सखी मंचच्या सदस्यांना देण्यात येणारे गोल्ड प्लेटेड बँगल्सचा वितरण सोहळा ६ आणि ७ आॅगस्ट रोजी घेण्यात येणार आहे. सोबतच ज्योतिषांचा मोफत सल्लासुद्धा देण्यात येणार आहे. सदर सोहळा लोकमत जिल्हा कार्यालय गोंदिया येथे होणार आहे. अधिक माहितीसाठी दीपा भौमिक यांच्याशी (9423689664) संपर्क साधावा.