२३.१५ कोटींचे चुकारे प्रलंबित

By Admin | Updated: July 3, 2015 02:03 IST2015-07-03T02:03:49+5:302015-07-03T02:03:49+5:30

जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आपल्या ४७ व आदिवासी महामंडळ आपल्या ४२ धान खरेदी केंद्रांमार्फत जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे धान खरेदी करतात.

Pending 23.15 crores of rupees | २३.१५ कोटींचे चुकारे प्रलंबित

२३.१५ कोटींचे चुकारे प्रलंबित

उघड्यावर २.३२ लाख क्विंटल : भरडाई न झालेला धानही गोदामात शिल्लक
गोंदिया : जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आपल्या ४७ व आदिवासी महामंडळ आपल्या ४२ धान खरेदी केंद्रांमार्फत जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे धान खरेदी करतात. मात्र खरेदी केलेल्या धानाचे अद्यापही २३ कोटी १५ लाख रूपयांचे चुकारे प्रलंबित आहेत. यात मार्केटिंग फेडरेशनकडे १४ कोटी ५० लाख तर आदिवासी महामंडळाकडे आठ कोटी ६५ लाख ९० हजार ९०० रूपयांचा समावेश आहे.
आदिवासी महामंडळाने खरीप व उन्हाळी धानपीक मिळून आतापर्यंत गोंदिया जिल्ह्यातून पाच लाख २३ हजार ३३९.६८ क्विंटल धान खरेदी केले. यापैकी दोन लाख १९ हजार ९९९.४६ क्विंटल धान भरडाईसाठी पाठविण्यात आले आहे. तर अद्यापही गोदामात ७१ हजार क्विंटल धान शिल्लक पडून आहे. तसेच उघड्यावर दोन लाख ३२ हजार ३५०.२२ क्विंटल धान पडून असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दोन दिवसांपूर्वी आलेल्या संततधार पावसामुळे या उघड्यावरील धान्यात ओलावा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आतापर्यंत शेतकऱ्यांना आदिवासी महामंडळाच्या ४२ खरेदी केंद्रांतून घेतलेल्या धानाचे ६२ कोटी ६१ लाख ६४ हजार ६६४ रूपयांचे चुकारे करण्यात आले आहेत. मात्र आठ कोटी ६५ लाखांचे चुकारे प्रलंबित असल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचण निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तसेच जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने आपल्या ४७ खरेदी केंद्रांमार्फत खरीप व रबी मिळून एकूण सहा लाख ३८ हजार क्विंटल धान खरेदी केले. यापैकी उन्हाळी धान दोन लाख पाच हजार क्विंटल आहे. यात एक लाख ७० हजार क्विंटल धानाची मिलिंग अद्याप झालेली नसून गोदामात पडून आहे. जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसारे त्यांचे शिल्लक धान गोदामात सुरक्षित ठेवण्यात आले आहे.
जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने आतापर्यंत ६१ कोटी ९७ लाख १९ हजार ००१ रूपयांचे चुकारे केले आहेत. तर अद्यापही १४ कोटी ५० लाख रूपयांचे चुकारे प्रलंबित आहेत.

Web Title: Pending 23.15 crores of rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.