शेतकऱ्यांना बोनसची रक्कम त्वरित द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:28 IST2021-04-13T04:28:03+5:302021-04-13T04:28:03+5:30
गोंदिया : शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अद्यापही बोनसची रक्कम मिळाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक ...

शेतकऱ्यांना बोनसची रक्कम त्वरित द्या
गोंदिया : शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अद्यापही बोनसची रक्कम मिळाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. तर खरीप हंगामासाठी खते, बियाणे यांचा पुरवठा त्यांच्या बांधावर करण्यात यावा, अशी मागणी भाजप किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय टेंभरे यांनी केली आहे.
सध्या सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू आहे. मागील वर्षीसुद्धा कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याने याचा फटका शेतकऱ्यांना बसला होता. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात आले होते. तीच परिस्थिती यंदासुद्धा निर्माण झाली आहे. महाविकास आघाडी सरकारने धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ७०० रुपये बोनस जाहीर केला होता. मात्र, शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करून चार महिन्यांचा कालावधी लोटला तरी अद्यापही शेतकऱ्यांना बोनसची रक्कम देण्यात आली नाही. यंदा जिल्ह्यात ३३ लाख क्विंटल धान खरेदी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने केली, तर १ लाख ८० हजारावर शेतकऱ्यांनी धानाची विक्री केली. या सर्व शेतकऱ्यांना अद्यापही धानाची रक्कम मिळालेली नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात आला आहे. शासनाने याची दखल घेऊन शेतकऱ्यांना बोनसची रक्कम त्वरित द्यावी अन्यथा भाजप किसान आघाडी या विरोधात तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा संजय टेंभरे यांनी दिला आहे. तसेच खरीप हंगामात शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर खते, बियाणांचा पुरवठा करण्याची मागणी केली आहे.