पटसंख्या शून्य, तरीही शाळा सुरूच

By Admin | Updated: November 5, 2015 02:04 IST2015-11-05T02:04:12+5:302015-11-05T02:04:12+5:30

आॅक्सिजन संपले, रुग्ण दगावला तरी व्हेटीलेटर लावून उपचार सुरू ठेवत व्यर्थ पैसा खर्च केला जातो, असा प्रकार सालेकसा

Patti zero, still the school starts | पटसंख्या शून्य, तरीही शाळा सुरूच

पटसंख्या शून्य, तरीही शाळा सुरूच

विजय मानकर ल्ल सालेकसा
आॅक्सिजन संपले, रुग्ण दगावला तरी व्हेटीलेटर लावून उपचार सुरू ठेवत व्यर्थ पैसा खर्च केला जातो, असा प्रकार सालेकसा तालुक्याच्या मानागड येथील आश्रमशाळेत सुरु आहे. या शासकीय आश्रमशाळेत एकही विद्यार्थी नाही, तरीसुध्दा शासनाच्या रेकार्डवर आश्रमशाळा व्यवस्थित सुरू आहे. शिक्षकांचे पगार निघत आहेत. इमारतीचे भाडे, सर्व काही धुळखात पडले आहे आणि आश्रमशाळा चक्क बंद आहे. हे चित्र पाहून शासनाची नियोजनशून्यता दिसून येत आहे.
सालेकसा तालुका मुख्यालयापासून १० किमी अंतरावर असलेले मानागड गाव हे दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागात मोडते. या गावाचा थेट संपर्क तालुका मुख्यालयाशी असून येथील लोकांची अनेक दैनंदिन कामे सालेकसाच्या बाजारपेठेवर अवलंबून असतात. परंतु मानागड परिसरात मोठ्या प्रमाणात आदिवासी लोकांचे वास्तव्य आहे. या भागातील मुलांना सोईस्कररित्या शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आदिवासी प्रकल्प विभागाने येथे शासकीय आश्रम शाळा सुरू करण्याचे ठरविले. त्यानुसार २००४-०५ या शैक्षणिक सत्रात मानागड येथे शासकीय आदिवासी आश्रमशाळा सुरू करण्यात आली. ३५ विद्यार्थ्याचा पहिला वर्ग सुरू करण्यात आला. दुसऱ्या वर्षी दुसरा वर्ग, तिसऱ्या वर्षी तिसरा वर्ग असे करीत सातव्या वर्षी सातव्या वर्गापर्यंत वर्ग सुरू झाले. १ ते ७ वर्गाची उच्च प्राथमिक आश्रम शाळा तयार झाली. शाळा चालविण्यासाठी गावातील लोकांचे मातीचे घर भाड्याने घेण्यात आले. गरजेनुसार एकाच ठिकाणी व्यवस्था होत नसल्याने गावात तीन-चार ठिकाणी घरे भाड्याने घेण्यात आली.
वर्ग चालविण्यासोबतच वसतिगृह, ग्रंथालय, खेळाचे साहित्य इत्यादी सोयीसुविधा पुरविण्यात आल्या. तसेच मुख्याध्यापक, अधीक्षक, शिक्षक, परिचर, कामाठी, स्वयंपाकी इत्यादी सर्व पदे भरून शासनाच्या नियोजनानुसार सर्व प्रकारचे अनुदान मिळू लागले. दरम्यान ७ व्या वर्गापर्यंत एकूण २०० च्या वर शाळेची पटसंख्या पोहोचली आणि शाळा व्यवस्थित चालू लागली. परंतु ज्या झपाट्याने शाळेची पटसंख्या वाढली त्यापेक्षा जास्त वेगाने पटसंख्या घटली आणि अवघ्या १० वर्षातच मानागड आश्रमशाळा विद्यार्थीशून्य झाली.
लोकमत चमूने मानागड येथील आश्रम शाळेला भेट दिली व त्या ठिकाणची वास्तविक परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तिथे गेल्यावर विजय फत्तुजी टेकाम नावाचे चतुर्थश्रेणी कर्मचारी भेटले. ते नेहमी तेथील देखरेख सांभाळतात. मागील सत्रापर्यंत या शाळेत पाच शिक्षक कार्यरत होते. त्यापैकी मुख्याध्यापक पदावर असलेले एच.ए.देशमुख यांना प्रकल्प कार्यालय देवरी येथे विस्तार अधिकारी पदावर समायोजित करण्यात आले. सी.बी.येळेकर गोंदिया येथील प्रकल्प उपकार्यालयात, शिक्षण सेवक आरीकर हे बोरगाव शाळेत तर भुस्कुटेकर या शिक्षिकेला काही दिवसांपूर्वीच सालेकसा येथील वसतिगृहात आणि इतर काही कर्मचारी वेगवेगळ्या ठिकाणी समायोजीत करण्यात आले.
शाळा विद्यार्थीशून्य होण्याचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता असे लक्षात आले की, येथे शाळा सुरू करण्यात आली. सुरूवातीला विद्यार्थी मिळाले. शासनाने सर्व सोयी सुविधा पुरविण्याचा प्रयत्न केला परंतु स्थानिक स्तरावर शाळा कायमस्वरूपी टिकवून ठेवण्यासाठी शिक्षक, पालक, गावकरी किंवा परिसरातील राजकारणी या घटकांनी कोणतेच प्रयत्न केले नाही. शाळा चालो किंवा बंद पडो, आपल्याला काय करायचे, अशी भूमिका जबाबदार लोकांनी घेतल्यामुळे शाळा आज विद्यार्थीशून्य झाली आहे.
काम दुसरीकडे, पगार आश्रमशाळेतून
४मुख्याध्यापक व्ही.एम.बढिये येथे येतात, आपली हजेरी लावतात, बसतात आणि जातात. के.व्ही.कांबळे म्हणून अधिक्षीका येथेच कार्यरत आहेत. परंतु त्यांनाही कोणतेच काम नाही. या ठिकाणचे काही कर्मचारी इतर ठिकाणी कामानिमित्त समायोजीत करण्यात आले. परंतु त्यांचे पगार मात्र याच शाळेचे कर्मचारी म्हणून निघत आहे. शाळा चालविण्यासाठी भाड्याने घेण्यात आलेल्या घराचे तसेच इतर साहित्य ठेवलेल्या घराचे १२ ते १५ हजार रुपये भाडे दरमहा शासनाकडून निघत आहे. कर्मचाऱ्यांचे लाखोचे पगारसुध्दा निघत आहे. तसेच लाखो रुपयांचे साहित्य बेकार पडून आहे. काही सामान नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.
सर्वकाही आहे, विद्यार्थीच नाही
४मागील चार वर्षापासून येथील विद्यार्थी कमी होत गेले. सत्र २०१४-१५ मध्ये सर्व वर्गाची मिळून पटसंख्या १७ वर येवून ठेपली आणि सत्र २०१५-१६ या शैक्षणिक सत्रात एकही विद्यार्थी या शाळेत शिकायला आला नाही. आज येथे ही परिस्थिती आहे की वर्गखोली आहे पण वर्गच भरत नाही. खडू फळा आहे पण फळ्याकडे पाहून शिकणारे नाही. कार्यालय आहे पण नोंद करण्यासाठी काहीच नाही. पुस्तके आहेत पण वाचणारे कोणीच नाही. स्वयंपाक करणारे आहेत परंतु जेवण करणारे कोणीच नाही. खेळाचे साहित्य आहे, मात्र खेळणारे कोणीच नाही, बिछाने आहेत परंतु त्यावर झोपणारे कोणीच नाही. स्वयंपाक करण्याचे साहित्य, गॅस हंडे, भांडे इत्यादी तसेच किमती पुस्तके, फर्निचर, धुळखात पडले आहेत.

Web Title: Patti zero, still the school starts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.