ग्रामीण भागातील रुग्णांची होतेय दिशाभूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:51 IST2021-02-05T07:51:21+5:302021-02-05T07:51:21+5:30
बोंडगावदेवी : ग्रामीण भागात वैद्यकीय व्यवसायाकडे मोठ्या आदराने पाहिल्या जाते. सर्वसामान्य रुग्ण आजही डॉक्टरांना ‘देवदूत’ समजून त्यांचा आदर करतात, ...

ग्रामीण भागातील रुग्णांची होतेय दिशाभूल
बोंडगावदेवी : ग्रामीण भागात वैद्यकीय व्यवसायाकडे मोठ्या आदराने पाहिल्या जाते. सर्वसामान्य रुग्ण आजही डॉक्टरांना ‘देवदूत’ समजून त्यांचा आदर करतात, परंतु तालुक्यातील काही निवडक खासगी डॉक्टर आपले सामाजिक दायित्व विसरून सर्वसामान्य रुग्णांची दिशाभूल करीत असल्याचा प्रकार अर्जुनी मोरगाव तालुक्यात काही ठिकाणी सुरू आहे.
तालुक्याच्या ठिकाणी नामांकित डॉक्टरांची खासगी रुग्णालये आहेत. प्रामाणिकपणे वैद्यकीय सेवा करणारे खासगी डॉक्टर आजही तालुक्यात आहे, तर काही खासगी डॉक्टर आलेल्या रुग्णांची तपासणी करून औषधे बाहेरून आणायला सांगतात, परंतु काही निवडक डॉक्टरांनी आपल्याच दवाखान्यात औषधांचा मोठ्या प्रमाणात साठा करून ठेवला आहे. रुग्णांना आपल्याच जवळची औषधे देऊन मर्जीनुसार पैसे घेत असल्याचा आरोप आहे. खासगी डॉक्टर रुग्णांना मोठ्या प्रमाणात औषधे देतो. त्या मोबदल्यात मोठी रक्कमही घेतो, परंतु औषधे घेतल्याचे बिल मात्र देत नाही. काही निवडक खासगी डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी करण्याबरोबरच ‘औषधी विक्री’ व्यवसाय सुरू केल्याचा प्रकार दिसून येत आहे. मात्र, या प्रकाराकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष झाले आहे.
बॉक्स
तपासणी शुल्क निश्चित नाही
खासगी डॉक्टरांच्या दवाखान्यात तपासणी फी दर्शविणारा तक्ता दर्शनी भागात असणे गरजेचे आहे. वैद्यकीय सेवा करणाऱ्या खासगी डॉक्टरांच्या दवाखान्यात तपासणी शुल्काचा बोर्ड दिसून आला, परंतु काही निवडक डॉक्टरांच्या दवाखान्यात तपासणी शुल्काचा तक्ता दिसून आला नाही.