पटेल हे दुसऱ्यांसाठी जगणारे व्यक्तिमत्त्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2016 02:09 IST2016-02-10T02:09:31+5:302016-02-10T02:09:31+5:30
मनोहरभाई पटेलांनी शिक्षणाची सोय करून देऊन जी सामाजिक भावना ठेवली, त्याच भावनेतून त्यांचे सुपुत्र प्रफुल्ल पटेल हे मार्गक्रमण करीत आहेत.

पटेल हे दुसऱ्यांसाठी जगणारे व्यक्तिमत्त्व
मान्यवरांच्या भावना : गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील १४ गुणवंतांचा सुवर्णपदकांनी सन्मान
गोंदिया : मनोहरभाई पटेलांनी शिक्षणाची सोय करून देऊन जी सामाजिक भावना ठेवली, त्याच भावनेतून त्यांचे सुपुत्र प्रफुल्ल पटेल हे मार्गक्रमण करीत आहेत. ते दिल्लीत असले तरी नेहमी गोंदिया-भंडाऱ्याबद्दल बोलत असतात. आज येथे आल्यानंतर त्यांच्या कामांची झलक पहायला मिळाली. आपल्या भागाच्या विकासासाठी त्यांची तळमळ पाहून दंग झालो. पटेल हे दुसऱ्यांसाठी जगणारे व्यक्तिमत्त्व आहे, असे प्रशंसोद्गार इलेक्ट्रॉनिक्स माध्यमातील प्रसिद्ध पत्रकार, मुलाखतकार रजत शर्मा तसेच माध्यम गुरू म्हणून प्रसिद्ध असणारे सुहेल सेठ यांनी काढले.
येथील मनोहरभाई पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विशाल प्रांगणात शिक्षणमहर्षी मनोहरभाई पटेल यांच्या ११० व्या जयंती समारंभात मंगळवारी (दि.९) ते बोलत होते. प्रसिद्ध सिने अभिनेता आणि युवा दिलांची धडकन सलमान खान याच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा.प्रफुल्ल पटेल होते. यावेळी गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील १४ विद्यार्थ्यांना मनोहरभाई पटेल स्मृती सुवर्णपदक देऊन गौरविण्यात आले.
यावेळी बोलताना माध्यम गुरू सुहेल सेठ म्हणाले, गोंदिया भारताची शान आहे. शिक्षणाच्या बाबतीत मनोहरभाईंनी जे स्वप्न पाहीले होते त्यामुळे १९८४ मध्येच गोंदियात ‘मेक इन इंडिया’ची सुरूवात त्यांनी केल्याचे दिसून येते. मी गेल्या २०-३० वर्षांपासून प्रफुल्ल पटेलांना ओळखतो. पण आज गोंदियात येऊन त्यांची खरी ओळख झाली, असे ते म्हणाले. रजत शर्मा यांनी बोलताना आज जर मी खा.पटेल यांच्या बोलवण्यावरून गोंदियात आलो नसतो तर मोठी गोष्ट ‘मिस’ केली असती असे सांगून मी गेल्या ३५-४० वर्षात अनेक गोष्टी बदलताना पाहील्या. पण प्रफुल्ल पटेलांना बदलताना पाहीले नाही, असे ते म्हणाले.
प्रास्ताविक भाषणात खा.पटेल म्हणाले, नागपूर ते जबलपूरपर्यंतच्या पट्ट्यात कोणतेही कॉलेज नसताना आणि केवळ एक हायस्कूल असताना मनोहरभाईंनी गोंदिया शिक्षण संस्थेची स्थापना करून गोंदिया-भंडारा जिल्ह्यात शिक्षणाची दारे उघडली. आज प्रत्येक शाखेच्या अभ्यासक्रमासोबत १ लाख २० हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत याचा मला अभिमान आहे. येथून शिकून गेलेले विद्यार्थी आज देश-विदेशात विविध क्षेत्रात सेवा देत आहेत. एके काळी या भागाला केवळ जंगल, आदिवासी प्रदेश आणि नक्षलवाद एवढीच ओळख होती. आज १८ हजार कोटींचा अदानी प्रकल्पांसह सिंचनाच्या सोयी वाढल्या आहेत. त्यामुळे पिकांमध्ये नवनवीन प्रयोग होत आहेत. या जिल्ह्याला विकासाच्या वाटेवर नेऊन विकसित जिल्हा अशी ओळख द्यायची आहे असे खा.पटेल म्हणाले. या कार्यक्रमाचे संचालन आ.राजेंद्र जैन यांनी केले.
यावेळी मंचावर माजी मंत्री अनिल देशमुख, आ.गोपालदास अग्रवाल, माजी आ.दिलीप बन्सोड, बंडू सावरबांधे, विलास श्रृंगारपवार, नाना पंचबुद्धे, सेवक वाघाये, मधुकर कुकडे, अनिल बावनकर, वर्षाताई पटेल, हरिहरभाई पटेल आदी प्रामुख्याने उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)