आरक्षणानुसार निवडून आलेला सदस्य नसल्याने पाच गावांमध्ये पेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:53 IST2021-02-06T04:53:42+5:302021-02-06T04:53:42+5:30
गोंदिया : जिल्ह्यातील १८९ ग्रामपंचायतींची निवडणूक १५ जानेवारीला पार पडली. त्यानंतर २८ जानेवारीला सरपंच पदासाठी आरक्षण जाहीर करण्यात आले. ...

आरक्षणानुसार निवडून आलेला सदस्य नसल्याने पाच गावांमध्ये पेच
गोंदिया : जिल्ह्यातील १८९ ग्रामपंचायतींची निवडणूक १५ जानेवारीला पार पडली. त्यानंतर २८ जानेवारीला सरपंच पदासाठी आरक्षण जाहीर करण्यात आले. मात्र, जाहीर झालेल्या आरक्षणानुसार त्या प्रवर्गाचे उमेदवार नसल्याने पाच गावांमध्ये पेच निर्माण झाला आहे. यावर आता निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार तोडगा काढण्यात येणार आहे. सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झालेल्या प्रवर्गानुसार त्या प्रवर्गाचा उमेदवार नसल्याचे देवरी तालुक्यातील तीन, गोरेगाव तालुक्यातील एक आणि सालेकसा तालुक्यातील गावामध्ये पेच निर्माण झाला आहे. आता यावर निवडणूक विभाग काय तोडगा काढते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बोरटाला ग्रामपंचायतीमध्ये एका पॅनलकडे बहुमत असून त्यांच्याकडे आरक्षणानुसार जाहीर झालेल्या सरपंच पदाचा उमेदवार नसल्याने त्यांना सरपंच पदावर पाणी सोडावे लागणार आहे. तर याच ग्रामपंचायतीमध्ये तीन सदस्य निवडून आलेल्या पॅनलला त्यांच्याकडे त्या प्रवर्गाचा उमेदवार असल्याने सरपंच पदाची लॉटरी लागणार असल्याचे चित्र आहे. १२ फेब्रुवारीला सरपंच आणि उपसरपंचपदी निवड करण्याची प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामुळे या प्रक्रियेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान यामुळे ग्रामीण भागातील राजकारण तापले असून फोडाफोडीच्या राजकारणाला वेग आला आहे.
......
पुढे काय होणार
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील एकूण ५४७ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत काढण्यात आली. आरक्षण सोडतीनुसार त्या प्रवर्गाचा उमेदवार सरपंच पदी आरूढ होणार हे स्पष्ट आहे. मात्र, आरक्षण जाहीर होऊन त्या पदाचा निवडून आलेला उमेदवार नसल्याने आता या पाच गावांसंदर्भात प्रशासन नेमका काय निर्णय घेते, याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले असून याला घेऊन गावकऱ्यांमध्ये उत्सुकतासुद्धा आहे.
......
बहुमत नसताना लागणार लॉटरी
यंदा राज्य निवडणूक आयोगाने सरपंच पदाचे आरक्षण निवडणुकीनंतर जाहीर केले. त्यामुळे सुरुवातीला अनेकांची भ्रमनिराशा झाली होती. त्यानंतर आता निवडणुकीत बहुमत मिळवूनसुद्धा पॅनलला जाहीर झालेल्या सरपंचच्या आरक्षित पदाचा उमेदवार नसल्याने त्यांना सरपंच पदावर पाणी सोडावे लागणार आहे. अशीच स्थिती अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बोरटोला येथे निर्माण झाली आहे. ९ सदस्यीय असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये एका पॅनलचे सहा सदस्य निवडून आले तर दुसऱ्या पॅनलचे ३ सदस्य निवडून आले. मात्र, सहा सदस्य निवडून आलेल्या पॅनलकडे आरक्षित पदाचा उमेदवार नाही तर तीन सदस्य असलेल्या पॅनलकडे उमेदवार असल्याने त्यांना सरपंच पदाची लॉटरी लागणार आहे.
.....
या गावांमध्ये पेच
गोरेगाव तालुक्यातील म्हसगाव ग्रामपंचायतीमध्ये अनुसूचित जाती महिला पदासाठी सरपंच पद आरक्षित झाले आहे; पण या प्रवर्गाचा उमेदवारच निवडून आलेला नसल्याने पेच निर्माण झाला आहे. तर देवरी तालुक्यातील चिपोटा, फुटाणा आणि लोहाना ग्रामपंचायतीमध्येही हीच समस्या असल्याने पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे आता यावर १२ फेब्रुवारीला काय तोडगा काढला जातो, याकडे लक्ष लागले आहे.
.................
निवडणुका झालेल्या ग्रामपंचायतींची संख्या
१८९
निवडून आलेले एकूण ग्रामपंचायत सदस्य
१६९३