पक्षाला शर्यतीचाच घोडा बदलणे जास्त महागात पडले

By Admin | Updated: May 19, 2014 23:39 IST2014-05-19T23:39:11+5:302014-05-19T23:39:11+5:30

गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघात काँग्रेस पक्षाने ऐनवेळी शर्यतीचा घोडा बदलला. सुरुवातीला खासदार मारोतराव कोवासे यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली होती.

The party was more expensive to change the race than the horse | पक्षाला शर्यतीचाच घोडा बदलणे जास्त महागात पडले

पक्षाला शर्यतीचाच घोडा बदलणे जास्त महागात पडले

सालेकसा : गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघात काँग्रेस पक्षाने ऐनवेळी शर्यतीचा घोडा बदलला. सुरुवातीला खासदार मारोतराव कोवासे यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली होती. कारण की, काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी विद्यमान खासदारांना पुन्हा उमेदवारी देण्यात यावी अशी शिफारस निवडणुक समितीने कडे केली होती त्यानुसार राज्य निवडणुक समिती ने मारोतराव कोवासे यांच्या नावावर शिक्का मोर्तब करुन यादी केंद्राकडे पाठविली होती. परंतु ऐन वेळी मतदार संघातील निवडणुक प्रभारी तसेच पक्षाचे पदाधिकारी यांनी कोवासे यांच्या नावाला विरोध केला व आपल्या विरोधाचा संदेश सरळ दिल्ली पर्यंत पोहोचविला व शेवटी मारोतराव कोवासेंऐवजी गडचिरोलीचे आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी यांना काँग्रेस ची उमेदवारी जाहीर करण्यात आली. परंतु सहा विधानसभा मतदार संघापैकी कोणत्याही विधानसभा क्षेत्रात उसेंडी यांनी मुसंडी मारली नाही. गडचिरोली चिमूर मतदार संघात काँग्रेस चारही मुंड्या चीत झाली. तर दुसरीकडे भाजपचे अशोक नेते यांचा दांडगा जनसंपर्क व मोदींची लाट यामुळे दोन लाख ३० हजारपेक्षा जास्त मताधिक्याने नेते विजयी झाले. अर्थातच कॉँग्रेसने ऐनवेळी शर्यतीचा घोडा बदलला तरी त्यापासून अपेक्षेच्या विपरीत फळ काँग्रेसवाल्यांना मिळाले. गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघात गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी, गडचिरोली आणि आरमोरी अशा तीन तर चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर आणि ब्रह्मपुरी असे दोन आणि गोंदिया जिल्ह्यातील आमगाव विधान सभाक्षेत्र मिळून असलेला हा लोकसभा क्षेत्र अनुसूचित जमातीसाठी राखीव करण्यात आला. यामुळे आदिवासीसाठी निवडणुक लढण्याचे मार्ग मोकळे झाले परंतु गैर आदिवासी दिग्गज नेत्यांसाठी या क्षेत्रातून जाण्यासाठी संसदेचे दार बंद झाले. त्यामुळे या क्षेत्रात सर्व गैर आदिवासी दिग्गज नेते निष्क्रीय झाले व पक्ष कार्यकर्तेच बनून राहिले. २००९ च्या निवडणुकीत गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे जुने प्रतिद्वंदी व अनुभवी राजकारणी मैदानात उतरले. यात भाजपकडून तत्कालीन आमदार नेते तर काँग्रेस कडून माजी आमदार कोवासे निवडणुक रिंगणात उतरले. दोघांचे राजकारण गडचिरोली विधासभा पर्यंत मर्यादीत होते. लोकसभेत दोघांची लडाई चांगली रंगली. परंतु गडचिरोली जिल्ह्या बाहेरील तीन विधानसभा क्षेत्र चिमूर, ब्रह्मपुरी आणि आमगाव येथून काँग्रेसला झुकते माप मिळाले व कोवासे यांचा विजय झाला. क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठ्या मतदार संघाचे ते खासदार बनले व त्यामुळे त्यांच्या समोर आव्हानेसुद्धा मोठी निर्माण झाली. संपूर्ण गडचिरोली जिल्हा व इतर दोन जिल्ह्यांचा मोठा भूभाग एकूण २० तालुके जवळपास झाले. १४ लाख मतदारांत जनसंपर्क साधणे व समस्या सोडविणे निधीच्या योग्य नियोजनानुसार विकास कामात सद्उपयोग करणे असे आवाहन पेलण्यात कोवासे यशस्वी होवू शकले नाही. मात्र त्यांनी निधी खर्च करण्यात इतर खासदारांपेक्षा आघाडी वर राहिले परंतु विकास निधीचा उपयोगाचा प्रभाव शेवटच्या माणसापर्यंत पोहोचला नाही. त्यांनी दिलेली विकास निधी तथाकथीत पक्ष कार्यकर्ते व ठेकेदारी करणार्‍या स्वार्थी हितचिंतकापर्यंत जाऊन अडकली. अर्थात खासदार निधीचा उपयोग म्हणजे ‘आसमान से टपका और खजूर पे अटका’ सारखी परिस्थिती राहिली. मध्य प्रदेशच्या सीमेपासून तर आंध्र प्रदेशच्या सीमेपर्यंत पसरलेला साढे पाचशे किमी.पेक्षा जास्त लांब तर दुसरीकडे छत्तीसगड पासून नागपूर जिल्ह्याच्या सीमेपर्यंत पसरलेला गडचिरोली-चिमूर क्षेत्र त्यामुळे संपूर्ण लोकसभा क्षेत्र फिरणे लोकांना भेटणे अशक्य काम आहे. त्यावर दोन क्षेत्र वगळता चार विधानसभा क्षेत्र घनदाट जंगलांनी व्यापलेले, अतिदुर्गम नक्षलग्रस्त संवेदनशील भाग तसेच आदिवासी मागासलेल्या लोकांचे प्रमाण जास्त व क्षेत्राचा मागासलेपणा त्या सर्व परिस्थितीत संपूर्ण क्षेत्राचा विकास एका लोकप्रतिनिधीच्या भरवशावर होऊ शकत नाही. त्यातच मावळते खासदार कोवासे हे कधीही उस्फूर्तपणे काम करताना दिसले नाही. त्यामुळे मतदारांमध्ये त्यांच्या बद्दल नाराजी वाढतच राहिली. अशा परिस्थितीत गडचिरोलीची जागा हरल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात घेता पक्षाचे काही आमदार, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष व इतर पदाधिकार्‍यांनी नारे लावून उमेदवारी बदलण्यात यश प्राप्त केले व डॉ. उसेंडी यांना मैदानात उतरविले. परंतु उसेंडीना एवढा वेळ मिळालाच नाही की त्या दरम्यान ते संपूर्ण क्षेत्राचा दौरा करतील. यामुळे जनसंपर्क होऊ शकला व त्यातही मोदी लहर कॉंग्रेसला भारी पडली.

Web Title: The party was more expensive to change the race than the horse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.