पोपटांची तस्करी करणारी टोळी जेरबंद; 200 रुपये दराने होत होती विक्री

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2020 09:40 AM2020-02-10T09:40:14+5:302020-02-10T09:40:22+5:30

शिरपूरनजीक रायपूरकडून नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या चारचाकी वाहनात पोपटांची तस्करी करणाऱ्या एका आंतरराज्यीय टोळीला जेरबंद करण्यात देवरी पोलिसांना यश आले आहे.

parrot smugglers gang arrested | पोपटांची तस्करी करणारी टोळी जेरबंद; 200 रुपये दराने होत होती विक्री

पोपटांची तस्करी करणारी टोळी जेरबंद; 200 रुपये दराने होत होती विक्री

Next

देवरी : राष्ट्रीय महामार्ग क्र. 53 वरील शिरपूरनजीक रायपूरकडून नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या चारचाकी वाहनात पोपटांची तस्करी करणाऱ्या एका आंतरराज्यीय टोळीला जेरबंद करण्यात देवरी पोलिसांना यश आले आहे. सविस्तर असे की, काल रविवारी (दि.09) रात्री 11 वाजेच्या सुमारास ठाणेदार कमलेश बच्छाव यांचे नेतृत्वात गस्तीवर असलेल्या देवरी पोलिसांच्या चमूने रायपूरकडून नागपूरच्या दिशेने भरधाव जाणाऱ्या टाटा इंडिका (क्र. सीजी04- एचसी 0208 ला संशय आल्याने तपासणीसाठी रोखले.

वाहनात गोणपाटामध्ये पॅकिंग केलेले ताराच्या पाच पिंजऱ्याविषयी वाहनचालक मोहम्मद असलम शेख फरीद (वय 35) राहणार न्यू राजेंद्रनगर रायपूर याला विचारणा केली असता त्याने स्थानिक आदिवासी लोकांकडून अवैधरीत्या पोपटांची खरेदी करून जादा भावाने नागपूरच्या बाजारात विक्री करीत असल्याची कबूली दिली. जप्त केलेल्या पाच पिजऱ्यातून 150 पोपट आढळून आले. हे पोपट 200 रुपये दराने विक्री करीत असल्याची माहिती आरोपींनी दिली. या कामात त्याला मदत करणारा मोहम्मद जाबीर मोहम्मद महेबूब राहणार संजयनगर रायपूर यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले.

पशूपक्ष्यांची वाहतूक करून तस्करी करणे गैरकायदेशीर असल्याने पोलिसांनी आरोपींसह मुद्देमाल आणि वाहन जप्त करून देवरीच्या वनविभागातील अधिकाऱ्यांच्या स्वाधीन केले. उल्लेखनीय म्हणजे अशा प्रकारची बेकायदेशीर पशूपक्ष्यांची तस्करी ही मोठी नवीन बाब नाही. वनविभागाने या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. पोलिसांच्या या कार्यवाहीमध्ये ठाणेदार बच्छाव यांचेसह हवालदार कावळे, राऊत, नायक उईके आणि बोहरे यांचा समावेश होता.

Web Title: parrot smugglers gang arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.