गोंदियातील पार्किंग प्लाझाचा फक्त गाजावाजाच
By Admin | Updated: November 27, 2014 23:36 IST2014-11-27T23:36:26+5:302014-11-27T23:36:26+5:30
शहरातील पार्किंगच्या अव्यवस्थेवर तोडगा म्हणून नगर पालिकेने पार्कींग प्लाझाची संकल्पना मांडली होती. मात्र पार्कींग प्लाझाचा फक्त गाजावाजाच सुरू असल्याची वास्तविकता आहे.

गोंदियातील पार्किंग प्लाझाचा फक्त गाजावाजाच
गोंदिया : शहरातील पार्किंगच्या अव्यवस्थेवर तोडगा म्हणून नगर पालिकेने पार्कींग प्लाझाची संकल्पना मांडली होती. मात्र पार्कींग प्लाझाचा फक्त गाजावाजाच सुरू असल्याची वास्तविकता आहे. कारण केवळ पार्कींग प्लाझासाठी लागणारी जागाच तेवढी पालिकेला देण्यात आली. त्याव्यतिरीक्त कागदावर पुढील बांधकामाचे कोणतेही नियोजन पालिकेने अजून केलेले नाही. त्यामुळे पार्किंगच्या समस्येला अजून किती दिवस तोंड द्यावे लागणार हे निश्चित नाही.
गोंदिया शहरात आजघडीला पार्कींगची सर्वात गंभीर समस्या आहे. अरूंद रस्ते व वाहनांची संख्या वाढत चालल्याने वाहतुकीची समस्या उद्भवत आहे. यावर तोडगा म्हणून नगर पालिकेने शहर पोलीस ठाण्याच्या मागील बाजुला असलेल्या पोलीस वसाहतीच्या जागेवर पार्कींग प्लाझा तयार करण्याचे ठरविले होते. आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या पुढाकाराने हा पार्कींग प्लाझा साकारण्यात येणार असून यासाठी पालिकेला पोलीस वसाहतीची जागा पार्कींग प्लाझासाठी उपलब्ध झाल्याचे सांगितले जात आहे.
पालिकेला पार्कींग प्लाझासाठी पोलीस वसाहतीची १५ हजार स्क्वेयर फूट जागा देण्यात आली आहे. या जागेवरील बांधकामही पाडण्यात आले असून पावसाळा संपताच प्लाझाचे बांधकाम सुरू करण्याचा अंदाज यापूर्वी मुख्याधिकारी सुमंत मोरे यांनी वतर्विला होता. या जागेवर दोन मजली भव्य बांधकाम करून त्यातील तळघरात दुचाकी वाहने, तळ मजल्यावर (ग्राऊंड फ्लोअर) चारचाकी वाहने, पहिल्या मजल्यावर सायकली तर दुसऱ्या मजल्यावर भव्य सभागृहाचे बांधकाम करण्यात येणार आहे. यासाठी सुमारे साडेतीन कोटी रुपये खर्चाचे नियोजन पालिकेने केले आहे.
आश्चर्याची बाब म्हणजे जागा पालिकेच्या हाती आली असूनसुद्धा पालिकेने केलेले हे नियोजन सध्यातरी फक्त एक कल्पनाच राहिली आहे. पार्कींग प्लाझाबाबतचे अद्याप कागदोपत्री काहीच काम झालेले नाही. एवढेच नव्हे तर पार्कींग प्लाझाबाबत करण्यात आलेली ही कल्पना कागदावर साकारण्यासाठी आता आर्कीटेक्टकडे देण्यात येणार असल्याची माहिती आहे. याशिवाय पालिकेकडे पार्कींग प्लाझाबद्दल दुसरे काहीच नाही.
पावसाळा संपताच पार्कींग प्लाझाचे बांधकाम सुरू करू, असे मुख्याधिकारी मोरे यांनी सांगितले होते. मात्र ही स्थिती असताना आता याला आणखी किती दिवस लागतील हे तर कोणीच सांगू शकणार नाही.
तोवर मात्र पार्कींग प्लाझाची जागाच बघूनच गोंदियावासीयांना समाधान मानावे लागणार आहे. तोपर्यंत पार्कींग प्लाझा गोंदियावासीयांसाठी एक दिवास्वप्नच राहणार आहे. (शहर प्रतिनिधी)