लोकल रेल्वेगाड्यांमध्ये ‘पेपर गँग’ सक्रिय

By Admin | Updated: May 17, 2014 23:46 IST2014-05-17T23:46:28+5:302014-05-17T23:46:28+5:30

रेल्वेतील गर्दीतून दाटीवाटीने आपण आपल्या कुटुंबासह प्रवास करीत असाल तर सतर्क व्हा. आपले दागिने वा रोख रक्कम ठेवलेल्या सुटकेसवर ‘पेपर गँग’ची करडी नजर आहे.

'Pappar Gang' active in local trains | लोकल रेल्वेगाड्यांमध्ये ‘पेपर गँग’ सक्रिय

लोकल रेल्वेगाड्यांमध्ये ‘पेपर गँग’ सक्रिय

गोंदिया : रेल्वेतील गर्दीतून दाटीवाटीने आपण आपल्या कुटुंबासह प्रवास करीत असाल तर सतर्क व्हा. आपले दागिने वा रोख रक्कम ठेवलेल्या सुटकेसवर ‘पेपर गँग’ची करडी नजर आहे. आपल्याला ही गँग कशी गंडवेल याचा नेम नाही. मागील अनेक दिवसांपासून रेल्वेच्या लोकल गाड्यांमध्ये ही टोळी सक्रिय झाली आहे. नागपूर-रायपूर या रेल्वेमार्गावर ही गँग सक्रिय झाली असून कुटुंबासह प्रवास करणार्‍या प्रवाशांवर या गँगची नजर असते. या टोळीमध्ये चार ते पाच जणांचा समावेश आहे. टोळीतील सारेच जण २० ते २५ वर्षे वयोगटातील आहेत. उन्हाळ्याच्या दिवसात लग्न समारंभाच्या कामासाठी शहरात काम करणारे किंवा नोकरी करणारे रेल्वेगाडीने आपल्या गावाला परततात. परतताना रोख रक्कम किंवा दागिणे ठेवलेली सुटकेस रेल्वे बोगीत वरच्या कप्प्यात ठेवलेली असते. अशा वेळी सदर टोळीतील लोक त्या कुटुंबाला गंडविण्याची योजना आखतात. खालच्या बाकावर प्रवाशांची गर्दी असल्याने या टोळीतील दोन लोक वरच्या बाकावर ठेवलेल्या सुटकेसजवळ बसतात. इतर प्रवाशांना आपण सभ्य असल्याची जाणीव करून देण्यासाठी ते हातात वृत्तपत्र घेऊन वाचत असतात. याच टोळीतील एक सदस्य आपल्या संभाषण चातुर्याने बसलेल्या प्रवाशांशी गप्पा करतो. एखादा विषय काढायचा आणि त्यात सार्‍यांनाच चर्चेसाठी प्रोत्साहित करायचे, असा त्यांचा बोलण्यातला आशय असतो. याच टोळीतील एक सदस्य पोलिसांवर नजर ठेवण्यासाठी डब्यातील प्रत्येक दारावर टेहळणी करीत असतो. इतरांपासून नजर चुकवून व आपण पोलिसांच्या जाळ्यात अडकू नये, यासाठी या टोळीतील सारेच सदस्य सतर्क असतात. वरच्या बाकावर दोघे बसलेले असतात. त्यातील एक जण सुटकेससमोर पेपर उघडतो. दुसरा नकली चावीने सुटकेस उघडून त्यातील वस्तू, दागिने, रक्कम अर्थात मिळेल तो माल आपल्या ताब्यात घेतो. पाणी पिण्याचा वा पदार्थ खाण्याचा बहाणा करून ते दोघेही खाली उतरतात. रेल्वेस्थानकापासून एक कि.मी. अगोदरच उतरायचे, असा त्यांचा प्रयत्न असतो. यावेळी साहित्य त्यांच्या मुठीत असते. गस्त घालणारा पोलिस दिसला की त्याची माहितीही सदर आरोपी एकमेकांना नजर संकेताने देतात. अश्या प्रकारच्या घटना डोंगरगड ते राजनांदगावदरम्यान अनेक वेळा घडल्या. या टोळीतील तरुण कोणत्या महिलेच्या अंगावर दागिने नाहीत, याचा शोध घेतात. त्या महिलेने अंगावर दागिने परिधान केलेले नाहीत, याचाच अर्थ तिने ते सुटकेसमध्ये ठेवलेले असावेत, असा अंदाज वर्तवून तिच्या सुटकेसवर या टोळीची नजर जाते. विशेष म्हणजे या टोळीची नजर फक्त सहकुटुंब प्रवास करणार्‍यांवरच असते. २० ते २५ वर्षे वयोगटातील हिंदी भाषिक तरुण या टोळीचे सदस्य आहेत. लोकल गाड्यांमध्येच ही टोळी सक्रिय आहे. परंतु पहिल्या डब्यापासून अखेरच्या डब्यापर्यंत खुली असलेल्या मेमो गाडीत या टोळीचे सदस्य नसतात. गाडीच्या वरच्या बाकावर ठेवलेल्या सुटकेसमधील माल लंपास करण्याची किमया या टोळीतील चोरट्यांना चांगल्या प्रकारे अवगत आहे.या टोळीतील सदस्यांना अटक करण्यासाठी रेल्वे पोलीस विभागाने ग्रस्त घलण्याची गरज आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: 'Pappar Gang' active in local trains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.