समस्यांच्या विळख्यात पालडोंगरी गाव

By Admin | Updated: March 17, 2016 02:34 IST2016-03-17T02:34:17+5:302016-03-17T02:34:17+5:30

तिरोडा तालुक्यातील पालडोंगरी गाव अनेक समस्यांच्या विळख्यात सापडले आहे. याकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचा आरोप तेथील जगलाल रहांगडाले,

Palandongri village is famous for its problems | समस्यांच्या विळख्यात पालडोंगरी गाव

समस्यांच्या विळख्यात पालडोंगरी गाव

ग्रामस्थांचे आरोप : समस्या सोडवा
गोंदिया : तिरोडा तालुक्यातील पालडोंगरी गाव अनेक समस्यांच्या विळख्यात सापडले आहे. याकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचा आरोप तेथील जगलाल रहांगडाले, गणराज रहांगडाले, दिलीप उईके व इतर ग्रामस्थांनी केलेला आहे.
पालडोंगरी ग्रामपंचायतमध्ये सभा घेवून रोजगार सेवक व कृषी मित्र बदलविण्यात यावे, असा ठराव घेण्यात आला होता. मात्र अद्यापही त्यांना बदलविण्यात आले नाही. सचिव गावकऱ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करतो, असा आरोप आहे. जिल्हा परिषदेकडून गावाला नळयोजना मिळाली. संपूर्ण गावात पाईप लाईन घालण्यात आली. दोन वर्षांपूर्वीच ते काम पूर्ण झाले. मात्र अद्याप पाणी पुरवठा सुरू करण्यात आला नाही. नळ योजनेच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. तसेच ज्या जागेवर पाण्याची टाकी बनविण्यात येत आहे, ती जागा शासकीय नसून दुसऱ्या व्यक्तीच्या नावे रेकार्डवर आहे, अशी ग्रामस्थांची ओरड आहे.
ग्रामपंचायत स्तरावर उपसमित्यांची स्थापना केली जाते. मात्र सचिवाने आपल्याच मनमर्जीने समित्या स्थापन केल्या आहेत. त्या समित्या पुन्हा दुसऱ्यांदा स्थापन करण्यात याव्यात, अशी गावकऱ्यांची मागणी आहे. त्यासाठी ग्रामसभेत निवेदनही देण्यात आले. परंतु सचिवांनी दुर्लक्ष केले. मागील तीन-चार वर्षांपासून गावात शौचालयांचे बांधकाम सुरू आहे. परंतु लाभार्थ्यांना अद्याप अनुदान देण्यात आले नाही. गावात नुकताच नवीन सिमेंट रस्त्याचे बांधकाम करण्यात आले. परंतु महिन्याभरातच तो निकृष्ट रस्ता उखडून गिट्टी बाहेर आली आहे. या प्रकाराबाबत चौकशीची मागणी केली जात आहे.
ग्रामपंचायतचे सचिव व ग्रामपंचायतचे सदस्य यांचे संगनमत असून गावाचा विकास करणारेच गावाच्या दुर्गतीसाठी ते जबाबदार असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Palandongri village is famous for its problems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.