आजपासून धान खरेदी
By Admin | Updated: November 15, 2014 01:45 IST2014-11-15T01:45:56+5:302014-11-15T01:45:56+5:30
विदर्भातील चार जिल्ह्यात यावर्षी मार्केटिंग फेडरेशनअंतर्गत धान खरेदी करण्यास सहकारी संस्था अखेर राजी झाल्या आहेत.

आजपासून धान खरेदी
गोंदिया : विदर्भातील चार जिल्ह्यात यावर्षी मार्केटिंग फेडरेशनअंतर्गत धान खरेदी करण्यास सहकारी संस्था अखेर राजी झाल्या आहेत. गोंदिया जिल्ह्यात ४० संस्थांच्या केंद्रांवर खरेदी करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी मंजूर केला आहे. या संस्थांमार्फत शनिवारपासून (दि.१५) शासकीय हमीभावानुुसार धान खरेदी सुरू होणार आहे. मात्र शनिवारी जिल्ह्यातील मोजक्याच केंद्रांवर धान खरेदी सुरू होणार असून सर्व केंद्रांवर खरेदी सुरू करण्यास किमान आठ दिवस लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
आधीच खरेदीचा तिढा निर्माण झाल्यामुळे शेतकऱ्यांना आपला धान कमी भावात व्यापाऱ्यांना विकावा लागत आहे. त्यात आता एक महिन्याचा अल्टिमेटम देत सहकारी संस्था धान खरेदी करण्यास तयार झाल्या असताना त्वरित धान खरेदी केंद्र सुरू करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.अमित सैनी यांनी दिले आहेत. मात्र मार्केटिंग फेडरेशनकडून बारदान्यासह गोदाम उपलब्ध करण्यापर्यंतची तयारी करण्यास आणखी काही दिवस लागणार असल्यामुळे सर्व धान खरेदी केंद्र सुरू होण्यासाठी शेतकऱ्यांना काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. शनिवारी सुरू होणाऱ्या खरेदी केंद्रांमध्ये गोंदिया तालुक्यातील काचेवाही, गोरेगाव तालुक्यातील गोरेगाव, कालीमाटी, तिमेझरी तसेच अर्जुनी मोरगाव तालुक्यातील अर्जुनी येथील ख.वि.संघ, वि.का.सह. संस्था आणि सहकारी राईस मिल तथा नवेगावबांध येथील केंद्राचा समावेश आहे.
विशेष म्हणजे अजून मार्केटिंग फेडरेशनकडे पुरेशा प्रमाणात गोदामांची उपलब्धताही झालेली नाही. गोदामे भाड्याने घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. गोदामे उपलब्ध होण्यावरही खरेदी केंद्र कधी उघडले जाणार हे अवलंबून राहणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)