डुकरांच्या उपद्रवामुळे भातपिकांची नासाडी

By Admin | Updated: November 25, 2014 22:58 IST2014-11-25T22:58:11+5:302014-11-25T22:58:11+5:30

डुकरांच्या उपद्रवामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. धानाच्या नासाडीसह नागरिकांचा परिवार असुरक्षित झाला आहे. हलक्या धानाच्या नासाडीची आतापर्यंत तिरोडा वनविभागात २५ प्रकरणे नोंद झाली

Paddy losses due to pigs nuisance | डुकरांच्या उपद्रवामुळे भातपिकांची नासाडी

डुकरांच्या उपद्रवामुळे भातपिकांची नासाडी

काचेवानी : डुकरांच्या उपद्रवामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. धानाच्या नासाडीसह नागरिकांचा परिवार असुरक्षित झाला आहे. हलक्या धानाच्या नासाडीची आतापर्यंत तिरोडा वनविभागात २५ प्रकरणे नोंद झाली असून भारी धानाची नासाडी डुकरांनी सर्वाधिक केली आहे. डुकरांच्या नासाडीची प्रकरणे २०० च्या वर जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. वनविभागाकडून मिळणारी नुकसान भरपाई खूप कमी असून यात वाढ करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
काचेवानी परिसरातील बरबसपुरा, मेंदिपूर, इंदोरा, निमगाव, एकोडी, काचेवानी रेल्वे, जमुनिया, बेरडीपार यासह अनेक गावातील शेतकऱ्यांच्या शेतात डुकरांनी धानपिकांची नासाडी केली आहे. मात्र काही शेतकऱ्यांनी मिळणे कमी व त्रास अधिक या कारणांमुळे नुकसानभरपाईचे प्रस्तावच सादर केले नाहीत.
बरबसपुरा रेल्वे चौकी परिसरात माने परिवाराच्या शेतात डुकरांनी धुमाकूळ केल्याने धानपिकांची नासाडी झाली. बरबसपुरा येथील तुमसरे सहीत १० ते १५ शेतकऱ्यांच्या शेतात डुकरांनी धानपिकाची नासाडी केली आहे. काचेवानी परिसरातील अनेक गावांत डुकरांनी नासाडी केली. डुकरांच्या नासाडी करण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याने शेतकरी त्रासले आहेत. वनविभागाकडून मिळणारे आर्थिक सहाय्य अत्यल्प असल्याने शेतकऱ्यांत नाराजी पसरली आहे.
जंगली डुकरांच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने येणाऱ्या दिवसात ही समस्या मोठे रूप घेईल. यावर वनविभागाने रोकथाम करण्याचा प्रयत्न केला नाही तर अनेक गावातील नागरिक आणि त्यांचे कुटुंबीय गंभीर संकटात सापडतील. जंगली डुकरे हिंसक असल्याने शेतकऱ्यांचे कुटुंब शेतात जायला घाबरत असल्याने शेती करणे कठीण होणार आहे.
बरबसपुरा रेल्वे गेट परिसरापासून गावातील टोकापर्यंत संपूर्ण कुटुंबे असुरक्षित झाली आहेत. काही अंतरावर काचेवानी झुडपी जंगल असून दिवसाला या परिसरात डुकरे झोप घेतात. रात्रीला आपल्या आहाराकरिता धानाची नासाडी करतात. एवढेच नाही तर घरपरिसरात सुरन, अदरक आणि कोचईच्या जमिनीत असणाऱ्या बिया खोदून खाण्याकरिता धाव घेतात. त्यामुळे रात्रीला परिवारातील सदस्य घराबाहेर निघण्यास घाबरत आहेत.
डुकरांचे उपद्रव थांबविण्याबाबत वनविभागाला विचारले असता डुकरांनी नासाडी केली, त्याची भरपाई आकारून देण्याचे अधिकार आहेत. मात्र त्यांचा बंदोबस्त कसा करता येईल, हे आपल्याकडे शासनाने अधिकार दिले नाहीत. वन्यजीव कायद्यानुसार त्यांना मारता येत नाही. सुरक्षात्मक उपाय म्हणून काहीही सांगता येणार नाही, असे वन विभागाकडून सांगण्यात आले.
डुकरांचे उत्पात थांबविण्यासाठी नागरिक आणि शेतकऱ्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निदर्शनात ही बाब आणूण देणे गरजेचे आहे. ते ही समस्या शासन दरबारी ठेवून याबाबत नवीन कायदा निर्माण झाल्यास त्याप्रमाणे कारवाई करता येईल, असे वनविभागाच्या सूत्रांनी लोकमतजवळ सांगितले आहे. (वार्ताहर)

Web Title: Paddy losses due to pigs nuisance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.