धान पीक रोगराईने नष्ट
By Admin | Updated: October 30, 2015 02:00 IST2015-10-30T02:00:48+5:302015-10-30T02:00:48+5:30
अगोदर पाण्याने त्यानंतर आता रोगराईने उभ्या धानाला पोखरून काढल्याचे सर्वत्र दिसून येत आहे.

धान पीक रोगराईने नष्ट
मावा व तुळतुळा रोगांचा जोर : तालुका कृषी अधिकाऱ्यांनी केली पाहणी
साखरीटोला : अगोदर पाण्याने त्यानंतर आता रोगराईने उभ्या धानाला पोखरून काढल्याचे सर्वत्र दिसून येत आहे. परिसरात त्याही पेक्षा गंभीर स्थिती बघावयास मिळत असून धानपिकावरील रोगराईच्या भस्मासुराने शेतकरी हवालदिल झाल्याचे चित्र दिसत आहे. या परिस्थितीची पाहणी जिल्हा परिषद सदस्य लता दोनोडे यांच्यासह तालुका कृषी अधिकारी जी.जी.तोडसाम यांनी केली.
जिल्हा परिषद सदस्य दोनोडे यांनी आपल्या कारूटोला क्षेत्राचा दौरा केला असता शेतकऱ्यांनी आपली कैफियत त्यांच्यापुढे मांडली. यात सलंगटोला येथील शेतकरी रामु अर्जुन चुटे यांनी आर.पी. या जातीच्या धानाची लागवड तीन एकरमध्ये केली होती. यासाठी आतापर्यंत त्यांना जवळपास ३० ते ३५ हजार रुपये खर्च आला.मात्र मावा व तुळतुळा रोगाने त्यांचे तीन एकरातील धान पूर्णपणे फस्त केले आहे. त्यामुळे शेरभर सुद्धा धान त्यांच्या घरी येणार नाही अशी परिस्थिती निर्माण होऊन त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे. रोगांनी त्यांच्या शेतातले उभे पीक नष्ट केल्याने त्यांच्यासमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. परिस्थिती लक्षात घेत त्यांनी तालुका कृषी अधिकारी जी.जी. तोडसाम यांनाही सलंगटोला येथे बोलाविले. यावेळी मंडळ कृषी अधिकारी पी.एस. मेंढे, कृषी सहाय्यक एच.एम. गजभिये, संजय दोनोडे, माजी सरपंच मिलींद गजभिये, संतोष बोहरे, कुवरलाल बावनथडे, डी.बी. ठाकरे व अन्य उपस्थित होते.
यासोबतच अधिकाऱ्यांनी सलंगटोला, दागोटोला व इतर गावांत जाऊन धानाची पाहणी केली. सलंगटोला येथील चंद्रभान मुनेश्वर यांच्या तीन एकरातील व विनोद दोनोडे यांच्या १० एकरातील धानाला मावा व तुळतुळा रोेगाने ग्रस्त केल्याचे यावेळी दिसून आले. हाच प्रकार दागोटोला येथील राजकुमार थेर यांच्या तीन एकरातील तर केशव बावनथडे यांच्या दीड एकर शेतातील धानावर दिसून आला. त्यामुळे शेतकऱ्यांवर उपासमारीची पाळी आली आहे. परिसरात अनेक शेतकऱ्यांचे धान रोगराईमुळे नष्ट झाल्याची स्थिती आहे. असे असताना सुद्धा गोंदिया जिल्ह्याला शासनाने दुष्काळग्रस्त घोषित केले नाही, ही शोकांतिका आहे. (वार्ताहर)