समन्वयातून पूरस्थितीवर मात
By Admin | Updated: June 24, 2015 02:00 IST2015-06-24T02:00:29+5:302015-06-24T02:00:29+5:30
पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे गोंदिया, भंडारा आणि मध्यप्रदेशातील शिवनी आणि बालाघाट जिल्ह्यातील सिंचन ...

समन्वयातून पूरस्थितीवर मात
जिल्हाधिकारी सूर्यवंशी यांचा पुढाकार : आंतरराज्य पूर नियंत्रण समितीची बैठक
गोंदिया : पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे गोंदिया, भंडारा आणि मध्यप्रदेशातील शिवनी आणि बालाघाट जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे पूर सदृश्य परिस्थिती निर्माण होते. ही परिस्थिती उद्भवणार नाही, यासाठी संबंधित चारही जिल्ह्यातील महसूल आणि सिंचन प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी परस्पर योग्य समन्वय ठेवून उद्भवणाऱ्या पूर परिस्थितीवर मात करावी, असे मत जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी व्यक्त केले.
आंतरराज्य पूर नियंत्रण समितीची बैठक सोमवार (दि.२२) बालाघाट (मध्यप्रदेश) जिल्हाधिकारी कार्यालय येथे पार पडली. या वेळी डॉ. सूर्यवंशी बोलत होते. या वेळी बालाघाटचे जिल्हाधिकारी व्ही. किरण गोपाल, गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गावडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. सूर्यवंशी म्हणाले, सिंचन प्रकल्पातून अतिवृष्टीच्या काळात पाणी सोडताना सिंचन विभागाने बाधित होणाऱ्या जिल्ह्यांना पूर्व कल्पना द्यावी. त्यामुळे हानी कमी होण्यास मदत होईल. नदीकाठावरील गावातील नागरिकांनासुध्दा पूर्वसूचना देऊन सतर्क करता येईल. सिंचन विभागाच्या आंतरराज्यीय अधिकाऱ्यांनी परस्परांशी या काळात योग्य समन्वय ठेवणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.
बालाघाटचे जिल्हाधिकारी व्ही. किरण गोपाल म्हणाले, पूर परिस्थितीच्या काळात सिंचन व महसूल विभागाने अत्यंत सतर्क राहून काम करणे गरजेचे आहे. ज्या प्रकल्पातील पाणी सोडल्यामुळे पूर परिस्थिती निर्माण होते, त्या विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून योग्य त्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. पूर परिस्थितीच्या काळात संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपलब्ध असले पाहिजे. योग्य समन्वय व संपर्कातून पूर परिस्थितीवर मात करावी. पूर परिस्थिती उद्भवणारच नाही यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, पूर परिस्थितीत वाढणाऱ्या पाण्याच्या पातळीबाबतची माहिती संबंधित जिल्ह्यांना द्यावी, असेही ते म्हणाले.
बैठकीला गोंदिया मध्यम प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता ए.एस. गेडाम, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता एन.के.ढोरे, बाघ-इटियाडोह प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता व्ही.जी. गोन्नाडे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनाली चव्हाण, भंडारा मध्यम प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंता सोनाली चोपडे, शिवनीचे उपविभागीय अधिकारी के.सी. परते, बालाघाटचे उपविभागीय अधिकारी डी.एस. पटले, वाराशिवनीचे उपविभागीय अधिकारी के.बी. चौबे, लांजीचे उपविभागीय अधिकारी मेहताब सिंह, बालाघाटचे कार्यकारी अभियंता पी.के. मुदगल, सुभाष पटेल, सुनील व्यास, वाराशिवनीच्या तहसीलदार मिनाक्षी इंगळे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
संजय सरोवरामुळे अनेक गावे प्रभावित
मध्यप्रदेशातील संजय सरोवरातून पूर परिस्थितीच्या काळात पाणी सोडल्यास बालाघाट, गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील गावे प्रभावित होतात. पूर सदृश्य परिस्थितीच्या काळात सिंचन विभागाने महसूल विभागाला याची पूर्वकल्पना द्यावी. त्यामुळे बाधित गावातील नागरिकांना सतर्क करता येईल, असे जिल्हाधिकारी सूर्यवंशी म्हणाले.