ओ.बी.डोंगरवार आमगावहातापायांनी सुदृढ असणारे अनेक लोक स्वत:च्या नशिबाला दोष देत बसतात. पणकट्टीपार या गावातील दोघांनी अपंगत्वावर मात करुन आपल्या रोजीरोटीचा मार्ग शोधला. आपल्या कार्यशैलीने उदरनिर्वाहाकरिता दोन पैसे कमविणे सुरू केले आहे. त्यांची ही धडपड इतरांसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे.चुन्नीलाल सितकुरा चुटे (४०) यांना जन्मापासून हाताला अपंगत्व आले आहे. एक हात पूर्ण तर एक हात अपूर्ण आहे. तरीही न डगमगता आपल्या प्रपंचाचा भार डोक्यावर घेवून ती जीवन जगत आहे. तीन मुली, एक मुलगा, शेती नाही, अशा गरिबीमधून तिन्ही मुलींचे लग्न त्यांनी आटोपले. चुन्नीलाल आपल्या दीड हातांनी कट्टीपारच्या मोटारस्टँडवर बसथांब्याच्या घराचा आसरा घेवून सायकल दुरुस्तीचे काम करतात. स्वत:च्या मालकीचे सामान ठेवण्याकरिता त्यांच्याकडे ठेलाही नाही. सकाळपासून संध्याकाळपर्यंत सायकल दुरुस्ती, पंचर दुरुस्ती करुन मिळालेल्या पैशात आपला प्रपंच ते चालवित आहे. तब्बल ३५ वर्षापासून त्यांचा हा व्यवसाय सुरू आहे. दुसरा तरुण कमलेश पांडुरंग पटले (२५) हा जन्मत: दोन्ही पायांनी अपंग आहे. अविवाहित असलेला कमलेश कुटुंबात मोठा आहे. तो स्वत:चा पानठेला चालवून महिन्याकाठी पाच हजार रुपये कमवितो. दोन एकर शेती आहे. कमलेशला ढोलक वाजविण्याचा छंद आहे. त्याने ढोलक वाजविण्याचे शिक्षण कुणाकडूनही घेतले नाही. स्वत:च्या कर्तृत्वाने तो ढोलक वाजविण्याच्या कलेत पारंगत झाला आहे. त्याला भजन मंडळात किंवा सांस्कृतिक कार्यक्रमात ढोलक वाजविण्याकरिता आवर्जुन बोलावतात. त्या मोबदल्यात २०० रुपये एका दिले जातात.दिवसभर पानठेला व रात्री भजन किंवा सांस्कृतिक कार्यक्रमातून पैसे कमवून तो आई-वडीलास हातभार लावत आहे.एकंदरित कट्टीपारच्या दोन अपंगांनी आपल्या अपंगत्वावर मात करुन उदरनिर्वाह करण्यासाठी केलेली ही धडपड निश्चितच कौतुकाचा विषय झाली आहे.
कट्टीपारच्या युवकांची अपंगत्वावर मात
By admin | Updated: January 23, 2015 01:42 IST