जीवघेण्या डेंग्यूवर मात

By Admin | Updated: November 18, 2015 01:55 IST2015-11-18T01:55:23+5:302015-11-18T01:55:23+5:30

मागील वर्षी सात जणांचा जीव घेणाऱ्या डेंग्यूला यंदा जिल्हा हिवताप नियंत्रण विभागाने मात दिली आहे.

Overcoming the Dangerous Dengue | जीवघेण्या डेंग्यूवर मात

जीवघेण्या डेंग्यूवर मात


गोंदिया : मागील वर्षी सात जणांचा जीव घेणाऱ्या डेंग्यूला यंदा जिल्हा हिवताप नियंत्रण विभागाने मात दिली आहे. या वर्षात डेंग्यूने एकाही रुग्णाचा जिल्ह्यात मृत्यू झाला नसल्याची नोंद या विभागाकडे आहे. जनतेकडून लाभलेल्या योग्य प्रतिसादाचे हे फलित असल्याचे या विभागाचे अधिकारी सांगतात. मात्र मलेरियाचा कहर पूर्णपणे नियंत्रणात आलेला नसून यावर्षी ५ जणांना बळी पडावे लागले. त्यामुळे डांसाच्या प्रकोपापासून जिल्हा अद्याप मुक्त झालेला नसल्याचेही स्पष्ट होते.
मागील काही वर्षात जिल्ह्यातील स्थिती बघता डेंग्यू व मलेरिया म्हणताच अंगावर थरकाप येणार अशी स्थिती होती. डासांवर नियंत्रणाअभावी डेंग्यू व मलेरिया हे डासजन्य आजार फोफावून कित्येकांना जीव गमवावा लागला. याचा परिणाम असा झाला की, डेंग्यू व मलेरिया यांची नोंद जीवघेण्या आजारात नागरिक करीत होते. पावसाळ्याच्या दिवसांत नागरिक दहशतीतच वावरत होते.
पावसाळा डासांचा प्रजननाचा काळ असल्याने पावसाळ््यात डासांची उत्पत्ती थांबविण्यासाठी जिल्हा हिवताप नियंत्रण विभागाकडून डासनाशकाची फवारणी केली जाते. याशिवाय नागरिकांना डासांची उत्पत्ती थांबविण्याबाबत नागरिकांना जागरूक राहण्याचे आवाहन केले जाते.
सातत्याने केल्या जात असलेल्या या दोन्ही प्रयत्नांचे फलीत आज पुढे येत असल्याचे दिसून येत आहे. त्यातही यावर्षी नागरिकांच्या सहकार्याने हिवताप नियंत्रण विभागाने डेंग्यूवर मात करण्यात यश मिळविल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.
विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, मागील वर्षी सन २०१४ मध्ये जेथे ५६ डेंग्यूग्रस्त रुग्ण आढळून आले आणि सात जणांचा मृत्यू झाला होता, तेथेच यंदा सन २०१५ मध्ये एकही डेंग्युग्रस्त रुग्ण नसून कुणालाही जीव गमवावा लागल्याची नोंद विभागाकडे आहे.
यावरून डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती जिल्ह्यात उद्रेक करण्याइतपत झाली नसावी असे म्हणता येईल. (शहर प्रतिनिधी)

मलेरिया ठरतोय घातक
डेंग्यूवर नियंत्रण मिळविण्यात जरी यश आले असल्याचे दिसून येत असले तरी यावर्षी मलेरिया डेंग्यूवर भारी ठरल्याचे दिसते. सन २०१४ मध्ये मलेरियाचे २९ रुग्ण आढळून व नऊ जणांचा मृत्यू झाला असताना यावर्षी सन २०१५ मध्ये सात ग्रस्त व पाच जणांचा मृत्यू झाल्याची नोंद विभागाकडे आहे. यावरून डेंग्यू जरी नियंत्रणात असला तरी मलेरियाच्या उपाययोजनेत मात्र विभाग अपयशी ठरत असल्याचे दिसून येते.
नागरिकांमध्ये आली जागृती
डेंग्यूसारख्या जीवघेण्या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी हिवताप विभागाकडून होत असलेल्या प्रयत्नांना जनतेकडून मिळालेल्या योग्य प्रतिसादाचा सिंहाचा वाटा आहे. या विभागाकडून फवारणी व जनजागृती केली जात असताना नागरिकांनी डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती होऊ नये यासाठी या विभागाकडून दिलेल्या सूचनांचे योग्य पालन केले. त्यामुळे डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती झाली नाही. शिवाय निसर्गानेही साथ दिल्याने डासांच्या उत्पत्तीस पोषक ठरणारे वातावरण निर्माण झाले नसावे असे जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.सलील पाटील यांनी सांगितले.

Web Title: Overcoming the Dangerous Dengue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.