चुकारे न मिळाल्याने शेतकऱ्यांत आक्रोश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:13 IST2021-01-24T04:13:32+5:302021-01-24T04:13:32+5:30
केशोरी : या वर्षीच्या खरीप हंगामातील धान पिकाची खरेदी शासनाच्या आदिवासी विकास महामंडळाने केशोरी, गोठणगाव व इळदा येथील आधारभूत ...

चुकारे न मिळाल्याने शेतकऱ्यांत आक्रोश
केशोरी : या वर्षीच्या खरीप हंगामातील धान पिकाची खरेदी शासनाच्या आदिवासी विकास महामंडळाने केशोरी, गोठणगाव व इळदा येथील आधारभूत धान खरेदी केंद्रामार्फत केली. धान खरेदी करून दोन महिन्यांचा कालावधी लोटूनही शेतकऱ्यांना धानाचे चुकारे मिळाले नाही. त्यामुळे आदिवासी विकास महामंडळाविरोधात शेतकऱ्यांच्या मनात आक्रोश वाढत आहे. महामंडळाने त्वरित धानाचे चुकारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावे अन्यथा या मागणीसाठी शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ग्राम केशोरी, गोठणगाव व इळदा या आधारभूत धान खरेदी केंद्रार्फत या परिसरातील शेतकऱ्यांचे खरीप हंगामातील धान आदिवासी विकास महामंडळाने खरेदी केले आहे. आदिवासी महामंडळाने अजून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात चुकारे जमा केले नाही. या संदर्भात उपप्रादेशिक अधिकारी (नवेगावबांध) यांच्याशी संपर्क साधून विचारणा केली असता त्यांनी आज-उद्या मिळतील असे सांगून टोलविले. आता १५ दिवस झाले परंतु धानाचे चुकारे अद्यापही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाले नाही. यावरुन महामंडळातील अधिकारी शेतकऱ्यांना खोटी माहिती देऊन दिशाभूल करीत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
धानाचे चुकारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाले किंवा नाही याची चौकशी करण्यासाठी शेतकरी दररोज बॅंकेत हेलपाटे मारत आहेत. धानाचे चुकारे देण्यात महामंडळाने विलंब केल्याने रबी धान पीक लागवडीचा हंगाम येऊन ठेपला आहे. मात्र शेतकऱ्यांच्या हातात पैसा नसल्याने रबीसाठी लागणारा खर्च कुठून करावा असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या मनात महामंडळाविषयी आक्रोश भडकत आहे. महामंडळाने शेतकऱ्यांचा अधिक अंत न पाहता त्वरित विना विलंब धानाचे चुकारे जमा करावे अन्यथा शेतकरी आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा दिनेश पाटील रहांगडाले या शेतकऱ्यासह शिवसेनेचे चेतन दहीकर यांनी दिला आहे.