खांबी गावात कोरोना बाधितांचा उद्रेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:31 IST2021-04-09T04:31:35+5:302021-04-09T04:31:35+5:30
बोंडगावदेवी : प्राथमिक आरोग्य केंद्र चान्ना-बाक्टी अंतर्गत येणाऱ्या कार्यक्षेत्रात दिवसेंदिवस कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. जवळील ग्राम खांबी ...

खांबी गावात कोरोना बाधितांचा उद्रेक
बोंडगावदेवी : प्राथमिक आरोग्य केंद्र चान्ना-बाक्टी अंतर्गत येणाऱ्या कार्यक्षेत्रात दिवसेंदिवस कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. जवळील ग्राम खांबी (पिंपळगाव) या लहानशा गावात आजघडीला २३ कोरोनाबाधित आढळून आले. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने गाव दहशतीखाली आहे.
सर्व कोरोनाबाधितांना होमक्वारंटाईन करण्यात आले असल्याचे आरोग्य सेविकांनी सांगितले. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव असूनदेखील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा तुडवडा निर्माण झाला आहे. काही ठिकाणी कोरोना चाचण्यांचे प्रमाण कमी झाल्याची माहिती आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र चान्ना अंतर्गत २४ गावांचा समावेश आहे. आठ उपकेंद्रांचा अंतर्भाव आहे. आरोग्य विभागाच्या वतीने काही गावांमध्ये कोरोना चाचणी घेण्यात आली. दरम्यान, गावात तुरळक प्रमाणात कोरोनाबाधित आढळून आल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले. तिसऱ्या कोरोनाच्या लाटेत गुढरी, सिरेगाव, भिवखिडकी, खांबी, पिंपळगाव, बोंडगावदेवी, दाभना, विहीरगाव, बाक्टी या गावांत थोड्या प्रमाणात कोरोनाबाधित आढळून आले. परिसरातील शाळांमधील विद्यार्थ्यांची कोरोना चाचणीसुद्धा करण्यात आली. त्यात काही विद्यार्थी कोरोनाबाधित आढळले. खांबी गावात रॅपिड अँटिजेन टेस्ट घेण्यात आली. आजपर्यंत त्यात २३ जण कोरोनाबाधित आढळून आले. त्यांच्या घरावर कोरोनाबाधिताचे स्टीकर लावून घरामध्येच राहण्याचा सल्ला देण्यात आला. प्राथमिक औषधोपचार त्यांच्या घरी करण्यात येत असल्याचे पिंपळगाव उपकेंद्राच्या आरोग्य सेविका कल्पना शिंदे, माधुरी राजगिरे यांनी सांगितले. खांबी या लहानशा गावात २३ कोरोनाबाधित असल्याचे आरोग्य विभाग सांगत असतानासुद्धा तालुका प्रशासन जागे झाले नाही.
....
काही भागात कोरोना चाचण्याच नाही
परिसरात कोरोना चाचणी काही ठिकाणी झालीच नाही अशी ओरड आहे. प्रतिबंधात्मक कोरोना लसीचा तुटवडा निर्माण झाल्याने ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. परिसरातील ग्रामपंचायतींमध्ये ठेवण्यात आलेल्या भेटी पुस्तिकेमध्ये आरोग्य विभागाचे कर्मचारी गाव भेटी दरम्यानचा अहवालसुद्धा लिहिताना दिसून येत नाही. खांबी गावात कोरोनाबाधित रुग्ण वाढत असतानासुद्धा खुद्द गावकऱ्यांना कोरोनाबाधितांची संख्या माहीत नाही. यामुळे कोरोनाचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.