कौशल्य विकासातून बेरोजगारीवर मात
By Admin | Updated: May 20, 2015 01:32 IST2015-05-20T01:32:13+5:302015-05-20T01:32:13+5:30
डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेद्वारे बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी दोन दिवसीय उपक्रम येथे राबविण्यात येत आहे.

कौशल्य विकासातून बेरोजगारीवर मात
गोंदिया : डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेद्वारे बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी दोन दिवसीय उपक्रम येथे राबविण्यात येत आहे. देशात सर्वात मोठा बेरोजगारीचा राक्षस उभा आहे. हा बेरोजगारीचा राक्षस कौशल्य विकास प्रशिक्षणाच्या माध्यमातून पळवून लावू. त्यासाठीच हा एक छोटासा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणेद्वारे गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील युवक व युवतींसाठी कौशल्य विकास प्रशिक्षणाविषयी १९ व २० मे रोजी पवार सांस्कृतिक भवन गोंदिया येथे मार्गदर्शन मेळावा घेण्यात येत आहे. मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
ना. बडोले पुढे म्हणाले, लोकांची अशी समझ आहे की सरकारची माणसे म्हणजे भावनाशून्य माणसांची चमू. अधिकारी, पुढारी व शासनकर्ते म्हणजे असंवेदनशील माणसे, असा समाजाचा दृष्टिकोन असतो. भांडवली व्यवहार होणार नाही तोपर्यंत काम होणार नाही, अशी त्यांची समझ असते. हे सत्य असले तरी संपूर्ण सत्य नाही. काही अधिकारी व शासनकर्ते चांगली असतात. त्यांच्या कार्यामुळे व प्रेरणेमुळेच समाजाचा विकास घडून येतो. बार्टीची चमू उत्तम कार्य करीत आहे. बार्टीच्या माध्यमातून राज्यातील पहिला प्रयोग गोंदियात होत आहे. जात वैधता पडताळणीचा त्रास कमी करण्यासाठी सर्व दस्तऐवज पुणे येथे एकत्र करण्याचे काम सुरू आहे. समाजातील मुले आएएस अधिकारी व्हावे, असे आम्हाला वाटते. सिव्हील सर्व्हिसेससाठी दिल्ली येथे उत्तम मार्गदर्शन केंद्रे आहेत. तिथे राज्यातील विद्यार्थ्यांना पाठविण्याचे आमचे प्रयत्न आहेत. शिवाय सिव्हील सर्व्हिसेससाठी कायमस्वरूपी मार्गदर्शन केंद्र पुणे व नागपूर येथे उघडण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
शिवाय देशातील पहिली कौशल्य विकास अकादमी नागपुरात स्थापन करावयाची आहे. त्यासाठी आम्ही जागा शोधणे सुरू केले आहे. राज्यातील काही विद्यापीठातही बार्टीचे केंद्र उघडण्यात येतील. पाचवी पास ते पुढील शिक्षण घेतलेल्यांसाठी बार्टीच्या माध्यमातून प्रशिक्षण देवून ८ ते ३० हजार रूपयांपर्यंतची नोकरी हमखास मिळवून दिले जाते. विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी त्यांनी बार्टीच्या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे ते म्हणाले.
या वेळी प्रामुख्याने जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, बार्टीचे महासंचालक परिहार, नगराध्यक्ष कशीश जायस्वाल, गोरेगाव पं.स. सभापती चित्रलेखा चौधरी, अपंग विकास महामंडळाचे सुहास काळे, जातपडताळणी समितीचे विभागीय अध्यक्ष गौतम, डॉ. लक्ष्मण भगत, भरत क्षत्रिय व विविध कंपन्यांचे अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.
संचालन प्रा. सविता बेदरकर यांनी तर आभार जात पडताळणी समितीचे विभागीय अध्यक्ष गौतम यांनी मानले. याप्रसंगी गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)
१०० टक्के रोजगाराची हमी
बार्टीच्या माध्यमातून ७० पेक्षा अधिक संस्था बेरोजगारांना प्रशिक्षण देतात. त्या कालावधीत मानधनसुद्धा दिले जाते. नोकरीची १०० टक्के हमी असते. सदर मेळाव्यात पाचवीपासून तर पुढील शिक्षण असलेल्या बेरोजगारांनी मोठ्या प्रमाणात प्रशिक्षणासाठी अर्ज केले आहेत. यापैकी जवळपास दोन हजार विद्यार्थ्यांची निवड प्रशिक्षणासाठी करण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांना ८ ते ३० हजार रूपयांपर्यंतची नोकरीसुद्धा दिली जाईल. तसेच प्रशिक्षणासाठी ज्यांची निवड होवू शकली नाही, त्यांच्याही रोजगारासाठी प्रयत्न केले जाईल, असे पालकमंत्री बडोले यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी व बार्टीचे महासंचालक यांचे मनोगत
मी यशदामध्ये काम केले आहे. ते पुणेमध्ये कार्यक्रम घेतात व त्यांना भरपूर प्रतिसाद मिळतो. मी त्यांना विदर्भात काम करण्यास सांगितले तर त्यांचा मानस नकारार्थी होता. परंतु बार्टीच्या माध्यमातून गोंदियात कार्यक्रम होणे स्तुत्य आहे. प्रत्येकाने आपल्या आवडीनुसार संस्था, विषय व क्षेत्र निवडावे. मग त्यापासून हटू नये. अनेक युवकांमध्ये धरसोड वृत्ती असते. अनेकांची धाव आरामाच्या नोकरीसाठी असते. परंतु आरामाने प्रगती होत नाही, तर कौशल्य व कार्यकुशलतेने प्रगती होते. गोंदियात दीड हजाराच्या जवळपास जॉब आहेत. त्यामुळे गोंदियात उपलब्ध जॉबनुसार बार्टीच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात यावे. गोंदिया जिल्ह्यातील १८ ते ३५ वयोगटातील सर्व युवकांचा सर्व्हे करून त्यांची माहिती साठविली जाणार असून त्यानुसार रोजगार देण्यासाठी योजना आखली जाईल. जिल्ह्यातील सर्व युवकांना कौशल्यपूर्ण करू, असा मानस जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी व्यक्त केला.
सन २०१३ मध्ये बार्टीच्या माध्यमातून सर्वप्रथम स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम गोंदियातच झाले होते. आता सन २०१५ मध्ये जिल्हास्तरीय प्रशिक्षणाचा प्रथम कार्यक्रमही गोंदियापासूनच सुरू होत आहे. अनुसूचित जाती-जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी बार्टीकडे निधी आहे. शिवाय काही निधी ओबीसी व ओपनसाठी आहे. जे गरजू असतील त्या सर्वांची निवड प्रशिक्षणासाठी करण्यात येईल. ७० पेक्षा अधिक खासगी संस्था बार्टीशी जुडलेल्या आहेत. खासगी कंपन्यांचेही काही तरी सामाजिक योगदान असावे म्हणून ते सहकार्य करीत आहेत, अशी माहिती बार्टीचे महासंचालक परिहार यांनी दिली.