कोदामेडी ग्रामपंचायतीच्या नियमबाह्य कामांची चौकशी
By Admin | Updated: December 29, 2016 01:09 IST2016-12-29T01:09:35+5:302016-12-29T01:09:35+5:30
तालुक्यातील नियमबाह्य कामे करण्यासाठी प्रसिध्द असलेल्या कोदामेडी ग्रामपंचायतीची चौकशी करण्याचे आदेश आयुक्त कार्यालय नागपूर

कोदामेडी ग्रामपंचायतीच्या नियमबाह्य कामांची चौकशी
आयुक्तांचे आदेश : गटविकास अधिकाऱ्यांकडे जबाबदारी
सडक-अर्जुनी : तालुक्यातील नियमबाह्य कामे करण्यासाठी प्रसिध्द असलेल्या कोदामेडी ग्रामपंचायतीची चौकशी करण्याचे आदेश आयुक्त कार्यालय नागपूर यांचेकडून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना प्राप्त झाले. त्यानुसार जिल्हा परिषदेकडून चौकशीचे पत्र येताच सडक-अर्जुनी पंचायत समितीचे खंडविकास अधिकारी आनंद लोकरे यांनी कोदामेडी ग्रा.पं.मध्ये जावून चौकशीला प्रारंभ केला आहे.
प्रकरण असे की, ग्रा.पं.कोदामेडी येथे सभामंडपाचे बांधकाम डिसेंबर २०१५ ला सुरू करण्यात आले. तसेच जानेवारी २०१६ मध्ये दलित वस्ती योजनेअंतर्गत सिमेंट रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले. परंतु सदर काम सुरू करण्यापूर्वी साहित्य पुरवठ्याकरीता निविदा काढणे महत्वाचे होते. परंतु सरपंच आणि सचिवांनी निविदा न काढता नियमबाह्यरित्या आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करून काम पूर्ण करून घेतले. ही कामे पूर्ण झाल्यानंतर दि.१२/०२/२०१६ रोजी सदर कामाची वर्तमानपत्रात निविदा प्रकाशित केली. ही निविदा १७/०२/२०१६ ला उघडण्यात आली व २३ फेब्रुवारी २०१६ च्या मासिक सभेत प्रवीण भिवगडे यांचे नावाची निविदा मंजूर करण्यात आली. परंतु ग्रामपंचायतने काम आधी केले आणि नंतर निविदा काढल्या. सदर नियमबाह्य कामांची चौकशी करून सरपंच अनिता बडोले यांनी आपल्या कामात कसूर केल्यामुळे त्यांना मुंबई ग्रा.पं.अधिनियम १९५८ चे कलम ३९(१) नुसार अपात्र घोषित करावे, अशी तक्रार ग्रा.पं.सदस्य निशांत राऊत, आनंदा झाडे, सुलोचना मुनिश्वर, प्रमिला मरस्कोल्हे या सदस्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी गोंदिया यांचेकडे आपली लिखित तक्रार दिली. परंतू त्यांच्याकडून तक्रारीकडे दुर्लक्ष झाल्यामुळे हीच तक्रार १४ जुलै २०१६ ला विभागीय आयुक्त नागपूर यांचेकडे पाठविली.
विभागीय आयुक्तांनी तक्रारीची दखल घेवून मुख्य कार्यकारी अधिकारी गोंदिया यांना पत्र पाठवून ग्रा.पं.कोदामेडीतील कामांचा अहवाल मागितला. सदर पत्राची दखल घेवून १६ डिसेंबरला तक्रारकर्त्याना आणि सरपंच अनिता बडोले आणि तत्कालीन सचिव एस.एस.लांजेवार यांना ग्रा.पं.मध्ये बोलावून लोणारे यांनी चौकशी केली.