घरकुलाच्या नावावर नियमबाह्य वसुली

By Admin | Updated: September 4, 2015 01:48 IST2015-09-04T01:48:31+5:302015-09-04T01:48:31+5:30

ग्रामीण क्षेत्रातील दारिद्र्य रेषेखालील बेघर किं वा कच्चे घर असलेल्या लाभार्थ्यास कायमस्वरुपी पक्के घर बांधणीसाठी अर्थ सहाय्य देऊन घरकूल ...

Out-of-house recovery | घरकुलाच्या नावावर नियमबाह्य वसुली

घरकुलाच्या नावावर नियमबाह्य वसुली

कित्येकांना गंडविले : गावकऱ्यांची कारवाईची मागणी
रावणवाडी : ग्रामीण क्षेत्रातील दारिद्र्य रेषेखालील बेघर किं वा कच्चे घर असलेल्या लाभार्थ्यास कायमस्वरुपी पक्के घर बांधणीसाठी अर्थ सहाय्य देऊन घरकूल तयार करण्यासाठी लाभार्थ्यांची निवड ग्राम सभेत करणे आवश्यक आहे. परंतु सिरपूर येथील ग्रामपंचायत सदस्य आणि तंटामुक्त समितीच्या अध्यक्षाने संगनमत करुन गावातील भोळ््या लोकांना घरकूल मंजर करवून देण्याचे आमिष देऊन त्यांच्याकडून पैशांची वसुली केली आहे. अवैध मार्गाने करण्यात आलेल्या वसुलीच्या प्रकारामुळे गावकऱ्यांत रोष निर्माण झाला असून प्रकरणी खंडविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी गावकरी करीत आहेत.
केंद्र आणि राज्य शासनाच्या इंदिरा आवास घरकूल योजनेच्या लाभार्थ्यांची निवड ही त्या-त्या ग्रामपंचायतींच्या ग्रामसभेतून केली जाते. यासाठी लाभार्थी हा दारिद्र्य रेषेखालील असणे बंधनकारक आहे. विशेष म्हणजे घरकुलासाठी करण्यात आलेली लाभार्थ्यांची निवड ही ग्रामसभेने मंज़ूर केलेल्या प्रतीक्षा यादीमध्ये असणेही आवश्यक आहे. त्याचप्रमाणे लाभार्थी बेघर अथवा त्याचे कच्चे घर गावात असणे आवश्यक आहे. तर रमाई आवास योजनेचा लाभार्थी हा अनुसूचित जातीचा असणे आवश्यक आहे. त्याला जाती प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.
मात्र ग्राम सिरपूर येथील ग्रामपंचायत सदस्य आणि तंटामुक्त समितीच्या अध्यक्षांनी गावातील अशिक्षित व निराधार व्यक्तींना घरकूल मंजूर करवून देण्याचे आमिष दिले. यासाठी त्यांनी गावातील व्यक्तींकडून प्रत्येकी दोन हजार रूपयांची वसुली केल्याची ओरड गावात होत आहे.
गावातील व्यक्तीच गावातीलच गरीब व निराधारांची लुबाडणूक करीत असल्याचे उघडकीस आल्याने गावकऱ्यांत रोष व्याप्त आहे. (वार्ताहर)

Web Title: Out-of-house recovery