आमचेच सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे
By Admin | Updated: June 27, 2015 02:22 IST2015-06-27T02:22:18+5:302015-06-27T02:22:18+5:30
धानाला योग्य भाव मिळावा म्हणून राज्य सरकारने यावर्षीही बोनस दिला. एवढेच नाही तर दरवर्षी बोनस देऊन तो वाढवून देऊ, ...

आमचेच सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे
गोंदिया : धानाला योग्य भाव मिळावा म्हणून राज्य सरकारने यावर्षीही बोनस दिला. एवढेच नाही तर दरवर्षी बोनस देऊन तो वाढवून देऊ, असे सांगताना आमचेच सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे असून शेतकऱ्यांसाठी सरकारची तिजोरी रिकामी करण्यास मागेपुढे पाहणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
नागरा येथील मोहरानटोली मैदानावर भाजप उमेदवारांसाठी आयोजित जाहीर प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी मंचावर पालकमंत्री तथा सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, खा.नाना पटोले, आ.विजय रहांगडाले, प्रदेश महामंत्री आंबटकर, भाजपचे विदर्भ संघटनमंत्री उपेंद्र कोटेकर, जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, माजी आ.डॉ.खुशाल बोपचे, केशवराव मानकर, भेरसिंग नागपुरे, हेमंत पटले, खोमेश रहांगडाले, भजनदास वैद्य, नेतराम कटरे, अशोक इंगळे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या सरकारची धोरणं कशी शेतकरी हिताची आहेत हे सांगताना अनेक दाखले दिले. इंग्रजांच्या काळापासून ५० टक्केपेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनाच नुकसानभरपाई म्हणून शासनाची मदत मिळत होती. मात्र पहिल्यांदाच मोदी सरकारने ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याचा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्वठन पूर्वी ३ वर्षाकरिता केले जात होते. मात्र आमच्या सरकारने ते ५ वर्षाकरिता करून शेतकऱ्यांना कर्जात दिलासा दिला आहे. घोटाळे करणारे आदीच्या सरकारमधील नेते कोणत्या तोंडाने अच्छे दिन आले का? असा सवाल करतात, असे म्हणून लोकांचे तर अच्छे दिन येणार आहेच पण घोटाळेबाजांसाठी बुरे दिन आणल्याशिवाय राहणार नाही, असे ते म्हणाले. शेतकऱ्यांना पिक विम्यातून नुकसानभरपाई मिळण्यासाठी वैयक्तिक पातळीवर नुकसानीची मोजणी करणारी यंत्रणा सुरू करणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
गेली पाच वर्षे गोंदिया जिल्हा परिषद भाजपाकडे होती. पण राज्यात आणि केंद्रातील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारने सहकार्य केले नाही. पण आता पुन्हा भाजपाकडे जिल्हा परिषद देऊन विकासाची गाडी वेगाने दौडू द्या, असे आवाहन शेवटी त्यांनी केले.
यावेळी ना.राजकुमार बडोले यांनी निवडणूक आली की बाबासाहेब आठवणाऱ्या पक्षांवर टिका केली. खा.नाना पटोले यांनी मार्केटिंग फेडरेशनच्या एका स्थानिक संचालकाकडून व्यापाऱ्यांचे हित जोपासण्यासाठी खरेदी केंद्रात पोत्यांचा तुटवडा निर्माण केला जात असल्याचा आरोप केला. संचालन दीपक कदम यांनी केले. (जिल्हा प्रतिनिधी)
बोनस दरवर्षी सुरू राहावा
मुख्यमंत्र्यांच्या भाषणापूर्वी भाजपचे जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे मागणी करताना धान उत्पादकांना दरवर्षी बोनस सुरू राहावा, तसेच बोनसची रक्कम नवीन वर्षात २५० वरून वाढवून द्यावी आणि जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांची अर्धवट असलेली कामे पूर्ण करावी अशी मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात तो धागा पकडत बोनस कायम ठेवण्याची मागणी मान्य केली, मात्र आचारसंहितेमुळे यावर जास्त बोलणार नसल्याचे ते म्हणाले.
पुराम दाम्पत्याची अनुपस्थिती खटकणारी
आमगाव-देवरीचे आमदार संजय पुराम आणि जि.प.सभापती सविता पुराम यांची मुख्यमंत्र्यांच्या सभेला अनुपस्थिती अनेकांना खटकली. जिल्ह्यातील भाजपचे सर्व आजी-माजी आमदार आणि सभापती हजर असताना पुराम दाम्पत्य का अनुपस्थित होते हे कळू शकले नाही.