Otherwise, it is difficult to handle 70 crore OBCs | अन्यथा ७० कोटी ओबीसींना सांभाळणे कठीण

अन्यथा ७० कोटी ओबीसींना सांभाळणे कठीण

ठळक मुद्देप्रदीप ढोबळे : ओबीसी जनजागृती जनचेतना अभियानाचा समारोप, भव्य मोटारसायकल रॅली

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : भारतीय राज्यघटनेने ओबीसी प्रवर्गाला संवैधानिक अधिकार देत या प्रवर्गाला मागावसर्गीय असा दर्जा दिला. मात्र आत्तापर्यंतच्या प्रत्येक सरकारने ओबीसी प्रवर्गाला त्यांचे अधिकार दिलेच नाही. या प्रवर्गाने आपल्या मागण्यांच्या पूर्ततेकरिता आंदोलनात्मक पवित्रा घेतला. तेव्हा-तेव्हा सत्ताधारी मंडळीने हे आंदोलन दडपण्याचे प्रयत्न केले. या प्रवर्गातील ७० कोटी जनतेने आपल्या मनात ठाणले तर सत्ताही आमची राहील व कायदेही आमचेच चालतील. यापुढे नेतेमंडळी आणि सरकारांने ओबीसींच्या हिताचे बोलल्यास त्यांचेही हित राहिल, असे परखड मत ओबीसी सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप ढोबळे यांनी मांडले.
ओबीसी संघर्ष कृती समिती, ओबीसी राष्ट्रीय महासंघ, ओबीसी सेवा संघाच्यावतीने ओबीसी जनगणनेकरिता जिल्ह्यात ५ फेब्रुवारीपासून जनजागृती चेतना यात्रा काढण्यात आली होती. त्या यात्रेचा समारोप गोंदिया येथे बुधवारी (दि.१९) करण्यात आला. या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे कार्याध्यक्ष डॉ. खुशाल बोपचे, ओबीसी संघर्ष कृती समितीचे जिल्हाध्यक्ष बबलू कटरे, ओबीसी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा.बी.एम.करमकर, ओबीसी संघर्ष कृती समितीचे कार्याध्यक्ष अमर वºहाडे, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे खेमेंद्र कटरे, ओबीसी अधिकारी-कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष संदीप तिडके, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष डॉ. सविता बेदरकर, संभाजी ब्रिगेडचे क्रांती ब्राम्हणकर, युवा स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष जितेश राणे, छावा संग्राम परिषदेचे जिल्हाध्यक्ष निलम हलमारे, अवामे मुस्लीमचे जिल्हाध्यक्ष, आम आदमी पक्षाचे पुरूषोत्तम मोदी, पुष्पा खोटेले, राजेश चांदेवार, वाय.टी.कटरे, एस. यू. वंजारी, सुनील भरणे उपस्थित होते.
प्रदीप ढोबळे म्हणाले, ओबीसी समाज हा भोळा आहे. हा समाज आता जागृत होत आहे. आता या समाजातील नागरिकांना आपले अधिकार कशामुळे मिळू शकले नाही, हे कळले आहे. जेव्हापर्यंत ओबीसी प्रवर्गाची स्वतंत्र जनगणना करून त्यांची आकडेवारी समोर येत नाही, तेव्हापर्यंत या समाजाला आपले अधिकार मिळणार नाहीत. ओबीसी प्रवर्ग देशात ६० टक्क्यांच्यावर आहे.आम्ही निवडून देतो त्या प्रतिनिधींनी आणि सरकारने आता ओबीसींचा अंत पाहू नये. आता आंदोलन म्हणजे दानपेटी झाली असून आमच्याकरिता मतदान म्हणजे मंदिर झाले आहे.
डॉ. खुशाल बोपचे यांनी संसदेत ओबीसी खासदारांची कशाप्रकारे दिशाभूल करण्यात येते यावर मार्गदर्शन केले. संचालन मनोज मेंढे, सुनील पटले यांनी केले तर आभार राजीव ठकरेले यांनी मानले. समारोपीय कार्यक्रमापुर्वी जिल्हाधिकारी कार्यालय ते जयस्तंभ चौक दरम्यान रॅली काढण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज आणि महापुरुषांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले.
शिशीर कटरे, लक्ष्मण नागपुरे, गणेश बरडे, विलास चव्हाण, महेंद्र बिसेन, राजेश नागरीकर, कैलाश भेलावे, पप्पू पटले, सी.पी.बिसेन, विजय फुंडे, आनंदराव कृपाण, सुनील भोंगाडे, रवी भांडारकर, कमल हटवार, हरीष ब्राम्हणकर, विनायक येडेवार, दिनेश हुकरे, मनोज डोये, मनोज शरणागत,राधेशाम भेंडारकर यांनी सहकार्य केले.

आमदारांनी दिले आश्वासन
कार्यक्रम स्थळाला जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनीधींना आमंत्रित करण्यात आले होते. गोंदियाचे आमदार विनोद अग्रवाल यांनी हजेरी लावली. विधानसभेत अध्यक्ष नाना पटोले यांनी ओबीसी आरक्षणासंदर्भातील ठरावाला आपण समती दर्शविली होती. ओबीसी प्रवर्ग अद्यापही मागासलेला आहे. पंतप्रधान मोदी यांना मी ओबीसींच्या स्वतंत्र जणगणनेकरिता पत्र लिहीणार असून जेव्हा केव्हा ओबीसींच्या मागण्यांचा विषय येईल, तेव्हा मी ओबीसींसोबत असल्याचे आश्वासन दिले.

Web Title: Otherwise, it is difficult to handle 70 crore OBCs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.