शाळांतील पाण्यात एडीसची उत्पत्ती
By Admin | Updated: September 24, 2014 23:38 IST2014-09-24T23:38:21+5:302014-09-24T23:38:21+5:30
शहरात गत एक महिन्यापासून डेंग्यूचे थैमान सुरू आहे़ डेंग्यू सदृश्य आजारामुळे चार बालकांचा मृत्यू झाला़ यानंतर खडबडून जागलेल्या प्रशासनाने शहरात मोहीम राबविली़ शिवाय पुण्याची किटक

शाळांतील पाण्यात एडीसची उत्पत्ती
१०० टक्के डास उत्पत्ती : विद्यार्थ्यांनाच झाली अधिक लागण
किरण उपाध्ये - पुलगाव
शहरात गत एक महिन्यापासून डेंग्यूचे थैमान सुरू आहे़ डेंग्यू सदृश्य आजारामुळे चार बालकांचा मृत्यू झाला़ यानंतर खडबडून जागलेल्या प्रशासनाने शहरात मोहीम राबविली़ शिवाय पुण्याची किटक तज्ञांची चमूही दाखल झाली़ यात शाळांतील पाण्यामध्येच डेंग्यूच्या ‘एडीस’ची उत्पत्ती होत असल्याचे समोर आले आहे़ यामुळे मुलांना शाळेत पाठवावे की नको, असा प्रश्न पालकांसमोर निर्माण झाला आहे़
वैद्यकीय पथकाद्वारे दोन दिवस शाळा, महाविद्यालयातील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तपासण्यात आली़ यात शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांच्या जीविताशी खेळ मांडल्याचे भयावह चित्र समोर झाले. विशेष म्हणजे चांगल्या व नामांकित शाळांचीही जीवघेणी अवस्था आहे. येथील सर्वच शैक्षणिक संस्थांच्या साठवलेल्या पाण्यात डासांची अंडी (लारवा) व डेंग्यूचे डास आढळून आले़ अस्वच्छ टाकीतील शेवाळयुक्त पाणी नळाद्वारे विद्यार्थ्यांना प्यावे लागत असल्याची विदारक स्थितीही समोर आली़ परिस्थितीचे गांभीर्य ओळखून शहरातील सोमवारी (दि़२२) शाळांत मुख्याध्यापकांची बैठक बोलवून शिक्षणाधिकारी संजय डोर्लीकर यांनी पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता पाळा, स्वच्छता राखा अन्यथा शाळांविरूद्ध कडक कारवाई करण्यात येईल, अशी ताकीद दिली.
दहा दिवसांत रुग्णालयात १८०० रुग्णांची रक्त तपासणी करण्यात आली़ यातील केवळ ३ रुग्ण मलेरिया पॉझिटीव्ह आढळले़ ५५० रुग्णांच्या प्लेटलेट तपासल्या़ रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता रविवारीही १८५ रुग्णांची खास चाचणी करण्यात आली़ यात १४५ जणांची मलेरिया चाचणी घेतली; पण डेंग्यूचे संशयित रुग्ण आढळले नसल्याची माहिती आहे़ प्रौढांपेक्षा लहान मुले व नामांकित शाळांतील दहा वर्षे वयोगटाच्या आतील मुलेच अधिक आजारी पडत असल्याने तपासणीचा मोर्चा शाळांकडे वळविण्यात आला़ यात शैक्षणिक संस्थांची स्वच्छतेबद्दल उदासिनता उघड झाली़ आरोग्य विभाग, नगरपरिषद, लॉयन्स क्लब, समाजसेवी संस्था, नगरसेवक, विद्यार्थी शहरात स्वच्छता अभियान राबवित असून जनजागृती करीत आहेत़ शाळांमध्येच डेंग्यूचा अधिक धोका असल्याने पालक मात्र मुलांना शाळेत पाठवित नसल्याचेच दिसते़