गणेशोत्सवातून अवयवदान जनजागृती
By Admin | Updated: September 10, 2016 00:24 IST2016-09-10T00:24:55+5:302016-09-10T00:24:55+5:30
राज्य आरोग्य सेवा तर्फे ३० आॅगस्टपासून सुरू असलेल्या अवयवदान जनजागृती अभियानाला मुदतवाढ देण्यात आली आहे.

गणेशोत्सवातून अवयवदान जनजागृती
गोंदिया : राज्य आरोग्य सेवा तर्फे ३० आॅगस्टपासून सुरू असलेल्या अवयवदान जनजागृती अभियानाला मुदतवाढ देण्यात आली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहात साजरा होणाऱ्या गणेशोत्सवाच्या विविध मंडळांतून आता अवयवदान जनजागृती करणार असल्याची माहिती बाई गंगाबाई शासकीय महिला रूग्णालयाच्या अभियान प्रकल्प संचालिका डॉ. सुवर्णा हुबेकर यांनी दिली.
जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व लॉयन्स क्लब रॉयल संजीवनी स्वयंसेवी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने ३० आॅगस्टपासून अवयवदानाचा महायज्ज्ञ सुरू आहे. या कालावधीत सुमारे ५४७ लोकांनी अवयवदानासाठी समोर येवून संकल्प पत्रे भरून दिली आहेत. जिल्ह्याची १४ लाख लोकसंख्या पाहता अवयवदानाचा हा महायज्ज्ञ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावा म्हणून गणेशोत्सवाचे औचित्य साधून व्यापक पातळीवर जनजागृती केली जाणार आहे, असे डॉ. सुवर्णा हुबेकर यांनी सांगितले.
महाराष्ट्रात अजूनही १२ हजार रूग्ण वेगवेगळ्या अवयवांच्या प्रतीक्षेत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अवयवदानाचे महत्व अधोरेखित केल्यामुळे ठिकठिकाणी अवयवदानाला उदंड प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यातील शहरातून सुमारे तीन हजार ५०० गणेश मंडळाद्वारे, प्रतिकृतीद्वारे, पोस्टर प्रदर्शन, रांगोळी आदिंच्या माध्यमातून गणेश दर्शनासाठी येणाऱ्या नागरिकांना या उदात्त अवयवदानाच्या प्रेरणेसाठी जागृत केले जाणार आहे.
गंगाबाई शासकीय महिला रूग्णालयातर्फे डॉ. सुवर्णा हुबेकर, जनसंपर्क कार्यकर्ता अनिल गोंडाणे, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ती निर्वाण, नेत्रतज्ज्ञ समुपदेशक हरीश चिंधालोरे, डॉ. भलावी, राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यापीठ समन्वयक प्रा. बबन मेश्राम, प्रा. गुणवंत गाडेकर, डॉ. संजय आसुटकर, राजेश कनोजिया, सविता तुरकर, जगन सितला, प्रतिक कदम, राजेश्वर, सनदी लेखापाल विनोद जैन व्याख्याते म्हणून विविध गणेश मंडळांना भेटी देवून तेथे जनजागृतीद्वारे नागरिकांच्या मनातील अवयवदानाबाबत भ्रामक गैरसमजूती दूर करणार आहेत.