आदेश फेटाळून कामावर रूजू
By Admin | Updated: May 16, 2015 01:16 IST2015-05-16T01:16:58+5:302015-05-16T01:16:58+5:30
मुख्याधिकाऱ्यांनी निलंबित केले असूनही नगर परिषद बांधकाम विभागात कार्यरत कनिष्ठ अभियंता स्वमर्जीने कामावर येत आहेत.

आदेश फेटाळून कामावर रूजू
गोंदिया : मुख्याधिकाऱ्यांनी निलंबित केले असूनही नगर परिषद बांधकाम विभागात कार्यरत कनिष्ठ अभियंता स्वमर्जीने कामावर येत आहेत. नियमानुसार त्यांना निलंबन काळात विभागातील काम करता येत नाही. मात्र मुख्याधिकाऱ्यांच्या आदेशाला डावलून ते काम करीत आहेत.त्यांच्या या मनमर्जी प्रकाराने पालिकेत सध्या विविध चर्चांना पेव फुटले आहे. सध्या मुख्याधिकारी सुट्टीवर असून ते आल्यानंतर मात्र हे प्रकरण काय वळण घेते याकडे पालिकेतील सर्वांचे लक्ष लागले आहे.
कंत्राटदारांकडे असलेल्या कामगारांचे हजेरीपट आस्थापना विभागात जमा करण्याचे आदेश पालिकेच्या बांधकाम विभागात कार्यरत कनिष्ठ अभियंता रवंीद्र कावडे यांना देण्यात आले होते. तसेच हजेरीपट सादर होत नाही तोपर्यंत कंत्राटदारांचे देयक अदा करण्यात येवू नये असे मुख्याधिकारी सुमंत मोरे यांचे आदेश असतानाही कावडे यांनी कंत्राटदारांचे देयक अदा करण्याकरिता त्यांच्याकडे सादर केले. शिवाय माहिती अधिकारांतर्गत कावडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आले असतानाही त्यांनी कोणतीही कार्यवाही केली नाही व माहिती पुरविण्यात कसूर केला. यावरून मुख्याधिकारी मोरे यांनी वरिष्ठांच्या आदेशांचे पालन करीत नसल्याचा ठपका ठेवत कावडे यांना निलंबीत केले.
या संदर्भात २३ एप्रिल रोजी तसे आदेश काढण्यात आले आहेत. त्या आदेशाची प्रत अभियंता कावडे यांना देण्यात आली. मात्र त्यांनी ती स्वीकृत केली नाही. यावर मात्र पालिकेने २४ एप्रिल रोजी त्यांच्या घरावर निलंबन आदेशाची प्रत चिकटविण्याची (चष्मा कार्यवाही) कार्यवाही केल्याचे कळले. त्यानंतर मुख्याधिकारी मोरे ८ मे पासून सुट्टीवर गेलेत.
दरम्यान मात्र कनिष्ठ अभियंता कावडे ११ मेपासून आपल्या कामावर रुजू झाले आहेत. नियमानुसार कावडे यांना कार्यालयात येण्यास मनाही नसली तरी त्या विभागात कार्य करण्यास मनाही असल्याचे कळते. मात्र कावडे आपली दैनंदिन कामे करीत असून पूर्वीप्रमाणेच ते कार्यरत असून आपल्या अर्जीत रजा संपल्याने पुन्हा कामावर रूजू झाल्याचे सांगत आहेत.
अशात मात्र पालिकेत आता विविध चर्चांना पेव फुटले असून कावडे यांच्याकडून मुख्याधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केले जात असल्याचे बोलले जात आहे. कावडे मात्र आपल्याला निलंबनाचे आदेश मिळालेच नसल्याचे सांगत आहेत. (शहर प्रतिनिधी)
मुख्याधिकारी आल्यावरच होणार निर्णय
कावडेंच्या निलंबनाच्या विषयाला घेऊन पालिकेत सध्या कुजबूज सुरू आहे. तर यावर आता मुख्याधिकारी मोरे हे परत आल्यावरच निर्णय होणार असल्याचे स्पष्ट दिसून येते. शिवाय कावडे यांचे प्रकरण आता काय वळण घेते याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत जाणून घेण्यासाठी मुख्याधिकारी मोरे यांना संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.