कुरिअर सेवेतील त्रुटीबद्दल नुकसानभरपाई देण्याचे आदेश
By Admin | Updated: September 25, 2014 23:25 IST2014-09-25T23:25:32+5:302014-09-25T23:25:32+5:30
गोंदियातून साड्या खरेदी करुन आपल्या जावयाच्या नावे राजस्थानमध्ये कुरिअर सेवेने पाठविल्यानंतर त्या साड्या दिलेल्या पत्त्यावर कुरिअर कंपनीने पोहोचविल्याच नाही. त्यामुळे लक्ष्मी कुरिअर

कुरिअर सेवेतील त्रुटीबद्दल नुकसानभरपाई देण्याचे आदेश
गोंदिया : गोंदियातून साड्या खरेदी करुन आपल्या जावयाच्या नावे राजस्थानमध्ये कुरिअर सेवेने पाठविल्यानंतर त्या साड्या दिलेल्या पत्त्यावर कुरिअर कंपनीने पोहोचविल्याच नाही. त्यामुळे लक्ष्मी कुरिअर कंपनीला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचने नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहे.
तक्रारकर्ते गोंदियातील भाजीपाला बाजाराजवळील दिलीप रंगलाल अग्रवाल हे आहेत. त्यांच्या पत्नीने आपले जावई अंकीत बंसल यांच्या नावे गोंदिया येथून २९ हजार ७०० रूपयांच्या साड्या खरेदी केल्या. ८ मार्च २०१२ रोजी त्या साड्या लक्ष्मी कुरिअर येथे सिकर, राजस्थान येथे बंसल यांना पोहचत्या करण्यासाठी दिल्या. त्यासाठी ६०० रूपये शुल्क देवून पावती घेतली. सात दिवसात वस्तू पोहचतील असे कुरिअर सेवेकडून सांगण्यात आले.
१६ मार्च २०१२ रोजी अग्रवाल यांनी जावई अंकीत बंसल यांना विचारणा केली, यावर कुरिअर न मिळाल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे त्यांनी वारंवार कुरिअर सेवा केंद्रात जावून चौकशी केली. यावेळी त्यांच्या वस्तू कुरिअर केंद्रालासुद्धा न मिळाल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे अग्रवाल यांनी लक्ष्मी कुरिअरने सेवेत केलेल्या त्रृटीबद्दल ३० हजार रूपये, मानसिक त्रासापोटी पाच हजार रूपये व तक्रारीचे खर्च म्हणून दोन हजार ५०० रूपये मिळण्यासाठी ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचात तक्रार दाखल केली.
यानंतर न्यायमंचाने लक्ष्मी कुरियरचे योगेंद्र भगतलाल चौरसिया यांना नोटिस बजावली. याशिवाय ते काम करीत असलेल्या ब्लेझफ्लॅस नागपूर व त्यांचे वरिष्ठ कार्यालय नवी दिल्ली येथेही नोटिस पाठविण्यात आल्या. मात्र वरिष्ठ कार्यालयामार्फत कोणीही उपस्थित न झाल्याने दावा एकतर्फी चालविण्यात आला. यावेळी लक्ष्मी कुरिअरचे चौरसिया यांनी जबाब नोंदविले.
त्यात कुरिअरची पावती खोटी आहे, तसेच ते ब्लेझफ्लॅश नागपूर व नवी दिल्लीचे एजंट असल्यामुळे नुकसान भरपाई देण्यास पात्र नसल्याचे जबाबात सांगितले. तसेच कुरिअरच्या वरिष्ठ कार्यालयांच्या पावतीनुसार डोमेस्टिक गुड्स असल्यास व त्या वस्तूंचा विमा काढला असल्यास ते १०० रूपयापर्यंत भरपाई देवू शकतात, असे सांगून तक्रार रद्द करण्याची मागणी केली.
तक्रारकर्ते अग्रवाल यांनी सुधीर सिंथेटिक गोंदिया येथील साडीचे बिल व ब्लेझफ्लॅश कुरिअर लि.ची पावती दाखल केली. त्यांचे वकील अॅड. एन.एस. पोपट यांनी असा युक्तिवाद केला की, अग्रवाल यांच्या पत्नीने बंसल यांना पाठविण्यासाठी १० साड्या सुधीर सिंथेटिकमधून खरेदी केल्या त्याचे बिलही आहे. कुरिअने पाठविण्यासाठी ६०० रूपये भरल्याची पावती आहे.
मात्र त्या न पोहोचल्याने तक्रार मंजूर करण्यात यावी अशी विनंती केली. न्यायमंचाने कारणमिमांसा केली. त्यात दिलेल्या पत्त्यावर वस्तू पोहोचविण्यासाठी कुरिअर सेवा असमर्थ ठरली, हे पावतीवरून सिद्ध होते.
परंतु पावतीमध्ये समाविष्ट वस्तू ‘लॉ आॅफ कॉन्ट्रक्ट’च्या विरूद्ध असल्यामुळे ते पोहोचविणे बंधनकारक नाही. कुरिअरमध्ये समाविष्ट वस्तूंचे प्रमाण तक्रारीत सादर केले नाही. परंतु तक्रारकर्त्याने वारंवार विचारणा करूनही संयुक्तिक उत्तर न मिळणे ही सेवेतील त्रुटी आहे. त्यामुळे कुरिअर सेवा नुकसानभरपाई देण्यास जबाबदार आहे, असा निर्णय दिला.
त्यानुसार तक्रारकर्ते अग्रवाल यांची तक्रार अंशत: मंजूर करण्यात आली. विरूद्ध पक्ष लक्ष्मी कुरिअर गोंदिया, ब्लेझफ्लॅश नागपूर व नवी दिल्ली यांनी नुकसानभरपाई म्हणून १० हजार रूपये, तक्रारीचा खर्च म्हणून पाच हजार रूपये द्यावे. तसेच या आदेशाचे पालन ३० दिवसांच्या आत करावे, असा आदेश न्यायमंचाने दिला. (प्रतिनिधी)