जिल्ह्यातील चार कृषी केंद्रांना खत विक्री बंदीचे आदेश
By Admin | Updated: August 7, 2015 01:36 IST2015-08-07T01:36:25+5:302015-08-07T01:36:25+5:30
सन २०१५ च्या जुलै महिन्यात जिल्ह्यातील चार कृषी केंद्रांना खत विक्री बंदचे आदेश देण्यात आले आहेत.

जिल्ह्यातील चार कृषी केंद्रांना खत विक्री बंदीचे आदेश
तपासणी अहवाल : बियाण्यांचे दोन नमुने अप्रमाणित
गोंदिया : सन २०१५ च्या जुलै महिन्यात जिल्ह्यातील चार कृषी केंद्रांना खत विक्री बंदचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्हास्तरीय भरारी दक्षता पथकाच्या कारवाईत सदर कृषी केंद्रांतील विक्रेत्यांकडे साठा पुस्तके, बिल बुक, रेट बोर्ड आदी माहिती न आढळल्यामुळेच त्यांना विक्री बंदचे आदेश देण्यात आले आहे.
या चार कृषी केंद्रांमध्ये गोंदिया तालुक्यातील दोन तर गोरेगाव व अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील प्रत्येकी एकेक कृषी केंद्राचा समावेश आहे. यामध्ये मातृशक्ती कृषी केंद्र नवरगावकला, जयकिसान कृषी केंद्र रावणवाडी, शहारे कृषी केंद्र गोरेगाव व लक्ष्मी कृषी केंद्र निमगाव (अर्जुनी-मोरगाव) यांचा समावेश आहे. सदर चारही कृषी केंद्रांमध्ये तीन लाख एक हजार ७२० रूपयांच्या ३९१ खताच्या बॅग होत्या. मात्र भरारी पथकाच्या कारवाईत सात दिवसांसाठी त्यांचा स्टॉक सिल करण्यात आल्याचे जिल्हा कृषी कार्यालयातून सांगण्यात आले आहे.
खरीप हंगामात जून महिन्यात जिल्हास्तरीय भरारी दक्षता पथकाच्या कारवाईत जिल्ह्यातील २५ विक्री केंद्रांमध्ये साठा पुस्तके, बिल बुक, निविष्टा व खरेदी बिल आढळले नाही. त्यामुळे त्या २४ विक्री केंद्रांना विक्री बंदचे आदेश देण्यात आले होते. विक्रेत्यांना तीन दिवसांचा कालावधीसाठी देवून कारणे दाखवा नोटिस बजावण्यात आले होते. तसेच त्यांचे रेकार्ड तपासणीसाठी कार्यालयात बोलाविण्यात आले होते. मात्र त्यांचे रेकार्ड पूर्ण असल्यामुळे त्या विक्रेत्यांना विक्री करण्याचे आदेश देण्यात आले.
जिल्ह्यात एकूण एक हजार ५९८ कृषी केंद्र आहेत. यात रासायनिक खतांचे किरकोळ व घाऊन मिळून एकूण ७८८ केंद्र आहेत. बियाणे विक्रीचे ४१५ केंद्र तर खत विक्रीचे ४४१ केंद्र आहेत. याशिवाय कृषी केंद्रांचे परवाने नुतनीकरणाअभावी काही परवाने रद्द करण्यात येत आहेत, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील सूत्रांनी दिली आहे.
बियाणे, खत व कीटकनाशकांची तपासणी
जिल्ह्यात भात बियाण्यांचे एकूण उद्दिष्ट ४३२ होते. यापैकी सर्वच नमुण्यांची तपासणी करण्यात आली. यात दोन नमुणे अप्रमाणित आढळले. यापैकी एक अर्जनी-मोरगाव तर दुसरा गोंदिया तालुक्यातील आहे. खताचे १८६ नमुने तपासणीसाठी काढण्यात आले. सर्व नमुने परीक्षणासाठी अमरावती येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. त्यांचा विश्लेषण अहवाल येणे बाकी आहे. कीटकनाशकांचे उद्दिष्ट ४६ असताना ७१ नमुने काढण्यात आले असून ते अमरावती येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. त्यांचाही अहवाल मिळणे बाकी असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
खताचा १५ हजार २२१ क्विंटल साठा शिल्लक
जिल्ह्यात एप्रिल ते ३१ जुलैपर्यंत ४० हजार ३४१.३५ क्विंटल खताचा साठा उपलब्ध झाला होता. यापैकी २५ हजार ११९.३८ क्विंटल खत विक्री झालेला आहे. तर अद्याप १५ हजार २२१.९७ क्विंटल साठा शिल्ल्लक आहे. यात युरिया दोन हजार ४२६ क्विंटल, डीएपी ७५४ क्विंटल, एसएसपी दोन हजार २१७ क्विंटल व संयुक्त खते नऊ हजार ८२४.९७ क्विंटल खत साठा शिल्लक आहे.
६३ टक्के रोवणी आटोपली
जिल्ह्यात रोवणी व आवत्या मिळून एकूण एक लाख १६ हजार ४९२ हेक्टरमध्ये रोवणी झालेली असून याची टक्केवारी ६३ आहे. गोंदिया तालुक्यात १९ हजार ६९६ हेक्टर, तिरोडा तालुक्यात १४ हजार ५८५ हेक्टर, आमगाव तालुक्यात १३ हजार ४८० हेक्टर, गोरेगाव तालुक्यात ११ हजार ४३१ हेक्टर, सालेकसा तालुक्यात ११ हजार ७४५ हेक्टर, देवरी तालुक्यात १६ हजार १६१ हेक्टर, अर्जुनी-मोरगाव तालुक्यात १५ हजार ९२३ हेक्टर तर सडक-अर्जुनी तालुक्यात १३ हजार ४७१ हेक्टरमध्ये रोवणी झाल्याचे जिल्हा कृषी कार्यालयातून सांगण्यात आले आहे.