घरचा विरोध पत्करून प्रेमीयुगूल विवाहबंधनात
By Admin | Updated: June 11, 2015 00:48 IST2015-06-11T00:48:53+5:302015-06-11T00:48:53+5:30
सोमलपूर येथील तंटामुक्त समितीने सज्ञान असलेल्या प्रेमीयुगुलांना पती-पत्नीच्या पवित्र नात्यात अडकवून अखेर ..

घरचा विरोध पत्करून प्रेमीयुगूल विवाहबंधनात
तंटामुक्त समितीचा पुढाकार : गावकऱ्यांचे समर्थन
बोंडगावदेवी : सोमलपूर येथील तंटामुक्त समितीने सज्ञान असलेल्या प्रेमीयुगुलांना पती-पत्नीच्या पवित्र नात्यात अडकवून अखेर दोन प्रेमवीरांचा लपून-छपून भेटण्याच्या प्रकारावर अखेर पडदा पाडला. त्यांना सुखी संसारासाठी उपस्थित गावकऱ्यांनी आशीर्वाद दिले.
सजातीय असलेल्या प्रेमीयुगुलास मुलीच्या वडिलांचा विरोध सहन करावा लागला. दोघांचेही एकमेकांवर जिवापाड प्रेम जडल्याने आई-वडिलांच्या विरोधाला न जुमानता हाच माझा पती समजून त्या मुलीने दोन दिवसांपूर्वी आपल्या प्रेमवीराचे घर गाठले. सोमलपूर गट ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या बिडटोला येथील महेश मुलचंद गजभिये (२५) असे त्या प्रेमवीराचे नाव आहे. झरपडा येथील शैलेजा जयेंद्र मेश्राम (१९) असे प्रेयसीचे नाव आहे.
एकमेकांवर जिवापाड प्रेम करणाऱ्या या प्रेमीयुगुलांना सोमलपूर येथील तंटामुक्त समितीच्या वतीने बिडटोला येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या बुध्द विहारात गावातील नागरिकांच्या उपस्थितीत मंगल परिणय करून देण्यात आले. बिडटोला येथील महेश गजभिये हा युवक झरपडा येथील आपल्या मावशीकडे नेहमी जाणे-येणे करायचा. तेथे वास्तव्याला असताना तेथील शैलेजासोबत त्याची ओळख झाली. महेशचे वारंवार झरपड्यात जाणे-येणे होत असल्याने त्यांच्या भेटी गाठी झाल्या. सहा महिन्यांपूर्वी ओळख झालेल्या त्या दोघांची मैत्री वाढली. भेटी वाढल्या. यापुढे आपण दोघेही एकत्र जीवन जगू असे स्वप्न त्यांनी रंगविले. मुलीच्या प्रेमाची माहिती होताच घरच्यांनी विरोध केला. मुलीने आई-वडिलांच्या विरोधात प्रेमवीराचे घर गाठले. दोघेही सज्ञान असल्याने त्यांनी आम्ही स्वमर्जीने जातीरिवाजाप्रमाणे लग्न लावण्यास तयार आहोत. आमचा विवाह करून द्यावा, अशी विनंती तंटामुक्त समितीकडे केली.
सोमवारी सकाळी ११ वाजता बिडटोला येथील बुध्द विहारात लग्न लावून देण्यात आले. या वेळी सोमलपूर-बीडटोलाचे तंमुस अध्यक्ष लैलेश्वर खुणे, पोलीस पाटील मेश्राम, पोलीस हवालदार निर्वाण, पोलीस नायक मधू कुरसुंगे, उपसरपंच पांडव मेश्राम, लवा मेश्राम, हरेंद्र खोब्रागडे, मन्साराम मेश्राम, देवदास गणवीर, सुभाष मेश्राम, मुखरू मेश्राम प्रामुख्याने उपस्थित होते. परिणय विधी हरेंद्र खोब्रागडे यांनी पार पाडली. (वार्ताहर)