एकाच अधिकाऱ्यावर कारभार
By Admin | Updated: January 28, 2016 01:44 IST2016-01-28T01:44:25+5:302016-01-28T01:44:25+5:30
तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र कालीमाटी येथील वैद्यकीय अधिकारी आर.एम. कोहाडे यांच्यावर संपूर्ण रुग्णालयाचा भार आहे.

एकाच अधिकाऱ्यावर कारभार
समस्या आरोग्याची : कालीमाटी प्राथमिक आरोग्य केंद्राचे बेहाल
आमगाव : तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र कालीमाटी येथील वैद्यकीय अधिकारी आर.एम. कोहाडे यांच्यावर संपूर्ण रुग्णालयाचा भार आहे. त्यामुळे पाहिजे त्याप्रकारे या प्राथमिक रुग्णालयातून रुग्णांना सेवा मिळत नाही. या प्रकाराने परिसरात व्यापक रोष व्यक्त होत आहे. त्याचबरोबर येथे दुसऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती त्वरित करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
या प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत अनेक गावांचा समावेश आहे. त्यात कालीमाटी, सुपलीपार, मोहगाव, कातुर्ली, करंजी, बोदा, भोसा, टाकरी, टेकरी हे जवळची गावे आहेत. यानंतर शेवट राज्याचे टोक घाटटेमनी, गिरोला, लंबाटोला व इतर गावे समाविष्ट आहेत. जवळपास पंधरा हजार लोकसंख्येचा परिसर असून एकाच वैद्यकीय अधिकाऱ्यावर या रुग्णालयाचा रहाटगाडगा सुरू आहे.
सुट्टीच्या दिवशी रुग्णांची सेवा करण्यात डॉ.आर.एम. कोहाडे यांची वेळ निघून जाते. २६ जानेवारीला सुट्टी असून अनेक नागरिकांनी आपल्या मुलांना या रुग्णालयात तपासणी करण्यासाठी आणले होते. मात्र मुलांची साधी तपासणी केली जात नाही, अशी शोकांतिका कालीमाटी रुग्णालयाची आहे.
कातुर्ली येथील क्रिश राजू लांजेवार (वय एक महिना) ओपीडी नं. १३८४ काढून कर्मचारी नाहीत, असे सांगून त्या एक महिन्याच्या बाळाला तपासणी न करता घरी पाठविण्यात आले. कातुर्ली येथील छोटू शहारे यांच्या मुलास तपासणी करण्यासाठी टाळाटाळ होत असताना डॉ.आर.एन. कोहाडे यांना विनंती करण्यात आली. तेव्हा वैद्यकीय अधिकारी यांनी मी एकटा वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहे. आम्हालासुद्धा घरपरिवार आहे. दरदिवशी १० ते १५ फोन येतात. कुणाचे काम करायचे. तसेच राजकीय दबाव सतत होत असल्याने कामाचा ताण वाढला आहे. येथे एका अधिकाऱ्याचे रुजू होण्याचे आदेश मिळाले. मात्र ते या ठिकाणची परिस्थिती पाहून कामावर रुजू झाले नाही. येथे जो वैद्यकीय अधिकारी रुजू होतो, तो काही काळ निघाल्यानंतर स्थानांतरणाच्या मागे लागतो व यश मिळाले की निघून जातो. ही आतापर्यंतच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची सत्यस्थिती आहे.
कधी वैद्यकीय अधिकाऱ्याला राजकीय मंडळी धारेवर धरतात, तर कधी कोणी लेखनीच्या माध्यमातून ब्लॅकमेल करतात. अशा घटना या प्राथमिक आरोग्य केंद्रात घडल्या आहेत. त्यामुळे येथे कोणी येण्यास तयार नाही. जे काम करतात त्यांच्यावर कामाचा दबाव जास्त असतो. ते एकटे रुग्णांना सेवा देत नाही, अशी गंभीर अवस्था या रुग्णालयाची आहे.
एक जरी वैद्यकीय असला तरी त्याला रुग्णाची सेवा किंवा देखभाल करणे गरजेचे आहे. मात्र सुट्टी आहे, मी एकच अधिकारी आहे, असे सांगून एक महिन्याच्या मुलाची तपासणी न करता परत पाठविणे योग्य की अयोग्य आहे, हे वैद्यकीय अधिकाऱ्याने ठरवावे.
एकंदरित कालीमाटी वैद्यकीय रुग्णालयात कर्मचारी वर्गाची कमतरता हे निमित्त समोर करुन कामचुकारपणा करीत असल्याचा आरोप अनेक नागरिकांनी केला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्राथमिक आरोग्य केंद्राचे झालेले बेहाल व एकाच वैद्यकीय अधिकाऱ्यावर कारभार याचा विचार करुन तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. उर्मट वागणूक करणाऱ्या कर्मचाऱ्यांवरही कारवाईची मागणी करण्यात आली आहे. (तालुका प्रतिनिधी)