ग्रामपंचायतीच्या निष्काळजीपणामुळे खुलेआम वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:33 IST2021-01-16T04:33:54+5:302021-01-16T04:33:54+5:30
बाराभाटी : जवळच्या येरंडी - देवलगाव गावात अनेक दिवसांपासून टिल्लूपंपांचा खुलेआम वापर सुरू आहे. पण या प्रकाराकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष ...

ग्रामपंचायतीच्या निष्काळजीपणामुळे खुलेआम वापर
बाराभाटी : जवळच्या येरंडी - देवलगाव गावात अनेक दिवसांपासून टिल्लूपंपांचा खुलेआम वापर सुरू आहे. पण या प्रकाराकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष झाले आहे. परिणामी गावातील अनेक नळ कनेक्शनधारकांना पिण्याचे शुध्द पाणी मिळण्यापासून वंचित राहावे लागत आहे.
येरंडी येथे गावात दोन पाणी पुरवठा याेजना कार्यान्वित आहेत. मात्र, ग्रामपंचायतीची लघु पाणी पुरवठा ही योजना २५ वर्षांपासून सुरू आहे. पण नळ योजनेवर टिल्लू पंप लावून पाणी नेले जात असल्याने अन्य नळ कनेक्शनधारक पाण्यापासून वंचित राहात आहेत. यासंदर्भात अनेकदा ग्रामपंचायतीकडे तक्रार करण्यात आली. मात्र, त्याची अद्याप दखल घेण्यात आली नाही. परिणामी समस्या कायम आहे. काही दिवसांपूर्वी ग्रामसेवकांनी कारवाई करण्यासाठी मोहीम सुरू करणार असल्याचे सांगितले होते. पण अद्याप माेहीम सुरू केली नाही. परिणामी टिल्लू पंपाचा सर्रासपणे वापर होत आहे. गावातील नळकनेक्शनधारक नियमित पाणी कराचा भरणा करतात. पण टिल्लू पंप लावणाऱ्यांमुळे अनेकांना पाण्यापासून वंचित राहावे लागत असल्याने त्यांच्यातून रोष व्यक्त होत आहे. ग्रामपंचायत सातत्याने या प्रकाराकडे दुर्लक्ष करीत असल्याने गावकऱ्यांनी याची तक्रार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे.