एकमेव ‘स्टेडियम’ची दुरवस्था
By Admin | Updated: August 31, 2015 01:34 IST2015-08-31T01:34:47+5:302015-08-31T01:34:47+5:30
शहरात विविध मैदानी खेळ खेळणाऱ्या खेळाडूंची संख्या मोठी आहे. शहरात नगरपालिकेच्या मालकीचे असलेले एकमात्र इंदिरा गांधी क्रीडा संकुल आहे.

एकमेव ‘स्टेडियम’ची दुरवस्था
खेळाडूंपुढे सरावाचा प्रश्न : नगर परिषद व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
गोंदिया : शहरात विविध मैदानी खेळ खेळणाऱ्या खेळाडूंची संख्या मोठी आहे. शहरात नगरपालिकेच्या मालकीचे असलेले एकमात्र इंदिरा गांधी क्रीडा संकुल आहे. परंतु संकुलातील स्टेडियम व मैदानाच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने स्टेडियमची दुरवस्था झाली आहे. यामुळे शहरातील खेळाडूंसमोर ‘सराव’ करावा कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
शहरातील खेळाडूंसाठी सुविधायुक्त व सुसज्ज असे क्रीडा संकुल व्हावे, यासाठी शहराच्या मध्यवर्ती भागात नगर पालिकेने इंदिरा गांधी स्टेडियमची निर्मिती काही वर्षापूर्वी केली. या स्टेडियममध्ये आजवर विविध क्रीडा प्रकारातील जिल्हा, राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धा पार पडल्या आहेत. शहरातील खेळाडूंनाही या स्पर्धांपासून प्रोत्साहन मिळाले. शहरातील अनेक खेळाडूंनी विविध क्रीडा प्रकारात राज्य व देशपातळीवर शहराचे नाव नेले. एकंदरित शहरात खेळांना प्रोत्साहन व खेळाडू निर्माण करण्याचे काम इंदिरा गांधी स्टेडियमने केले आहे. परंतु गेल्या काही वर्षात या स्टेडियमच्या वैभवाला उतरती कळा लागल्याचे दिसते. स्टेडियमच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने पावसाळ्यातील चार महिन्यात स्टेडियममध्ये चिखल साचतो, या चार महिन्यात खेळाडूंसमोर सरावाचा मोठा प्रश्न निर्माण होतो.
स्टेडियममध्ये जमलेले पावसाचे पाणी बाहेर जाण्यासाठी कोणतीही उपाययोजना नसल्याने हा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून आहे. क्रीडा संघटनेच्या सततच्या पाठपुराव्यानंतर पावसाचे पाणी जाण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून नाली बांधकाम सुरू आहे. परंतु या बांधकामाच्या नावावर केवळ खोदकाम झाले असून पक्के बांधकाम थंडबस्त्यात पडले आहे. परिणामी यंदाच्या पावसाळ्यातही खेळाडूंना स्टेडियममध्ये सराव करता येत नाही. तसेच स्टेडियमच्या पायऱ्या तुटलेल्या असून कचऱ्याच्या ढिगाऱ्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. विशेष म्हणजे काही महिन्यापूर्वी शासनाच्या ‘स्वच्छ भारत, स्वच्छ गोंदिया’ अभियानांतर्गत स्टेडियमध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले. परंतु त्यानंतर सर्वांचे दुर्लक्ष झाले. विशेष म्हणजे याच स्टेडियमवर सराव करुन अनेक खेळाडू, सैन्य, पोलीस विभाग व विविध शासकीय विभागात कार्यरत आहेत. परंतु गेल्या काही वर्षात या स्टेडियमची दुरवस्था झाल्याने आता खेळाडूंना शहराबाहेर दुरवरील तिरोडा, बालाघाट, आमगाव व तिरोडा राज्य मार्गावरील खुल्या जागेत सराव करावा लागत आहे.
स्टेडियमच्या दुरवस्थेबद्दल नेहमीच बातम्या प्रकाशित केल्या तर क्रीडा संघटना स्टेडियमची दुरवस्था दूर करण्याचा सातत्याने पाठपुरावा केला जातो. परंतु ढिम्म प्रशासन व लोकप्रतिनिधींना या समस्यांशी काहीही देणेघेणे नाही. मैदानाची पावसाळ्यात दुरावस्था झाली आहे. या ठिकाणी हिरवळ कधी लागणार असे खेळाडूंना वाटत आहे. या मैदानावर चिखलाचे साम्राज्य आहे. परिणामी सराव करण्यात अडचण येत आहे. नाल्यांचे बांधकाम कधी होणार याकडे त्यांचे लक्ष लागले आहे. (तालुका प्रतिनिधी)