फक्त सहा विहिरींचे काम पूर्ण
By Admin | Updated: April 27, 2017 00:58 IST2017-04-27T00:58:41+5:302017-04-27T00:58:41+5:30
मागेल त्याला शेततळे योजनेअंतर्गत गोंदिया जिल्ह्यात यंदा मागेल त्याला विहीर योजना राबविली जात आहे.

फक्त सहा विहिरींचे काम पूर्ण
मागेल त्याला विहीर योजना : २२५ लाभार्थ्यांना कामाचे पत्र
सालेकसा : मागेल त्याला शेततळे योजनेअंतर्गत गोंदिया जिल्ह्यात यंदा मागेल त्याला विहीर योजना राबविली जात आहे. याअंतर्गत जिल्ह्यात एकूण दोन हजार विहिरींचा लाभ गरजू शेतकऱ्यांना देण्यात येत आहे. त्यातच सालेकसा तालुक्याला २५० विहिरींचा लक्ष्य असून एकूण फक्त सहा विहिरींचे काम पूर्ण झालेले आहे. येत्या ४० दिवसात पावसाळा सुरू होण्याची शक्यता असून यावर्षी एकूण २५० विहिरींचे काम पूर्ण होऊन लक्ष्यपूर्ती होणार की नाही, याबद्दल संशय असून अनेक विहिरींचे काम पुढील वर्षापर्यंत लांबणीवर जाण्याची शक्यता आहे.
मागेल त्याला विहीर योजनेअंतर्गत इच्छुक लाभार्थ्यांना आॅनलाईन अर्ज करण्याची सोय शासनाने उपलब्ध करून दिली होती. सालेकसा तालुक्यात एकूण ३७० लोकांनी विहिरींसाठी अर्ज केला होता. त्यातील जवळपास १९ अर्ज निरस्त झाले होते. उर्वरित ३५० अर्ज पात्र ठरले असून ‘आधी या-आधी घ्या’ या पध्दतीचा अवलंब करीत ज्यांनी प्रथम अर्ज केला अशा २५० लाभार्थ्यांची निवड करण्यात आली.
त्या अर्जानुसार लाभार्थ्यांच्या शेतीची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. यात आतापर्यंत २२५ लाभार्थी योजनेसाठी पात्र ठरले असून टप्याटप्याने आतापर्यंत एकूण २२५ लाभार्थ्यांना वर्क आर्डर जारी करण्यात आले आहेत. परंतु जवळपास २५ अर्ज वेगवेगळ्या कारणाने रद्द होऊ शकतात, हे प्रथम पाहणीनंतर निष्पन्न झाले आहे.
यात काही लोकांनी खोटी माहिती दाखवित पूर्वी लाभ घेऊनही अर्ज केला. काहींनी शेततळ्याचा लाभ घेतला आहे. अशा लोकांनासुध्दा नाकारण्यात येत आहे. असे जवळपास २५ अर्ज रद्द होत असून त्या जागी प्रतीक्षा यादीतून अर्ज स्वीकारून त्यांना विहीर मंजूर करण्यात येईल, असे संबंधित विभागातील कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे.
जानेवारी महिन्यापासूनच विहिरीची प्रक्रिया सुरु झाली असली तरी आतापर्यंत फक्त सहा विहिरी पूर्ण झाल्या असून जवळपास २५-३० विहिरीचा काम प्रगतीपथावर आहे. तर इतर १५० पेक्षा जास्त विहिरींचे काम आतापर्यंत सुरूही झाले नाही. त्यामुळे आता यंदा ती कामे पूर्ण होणार, असे वाटत नाही.
विहिरींची कामे लांबणीवर जाण्याची अनेक कारणे समोर आली आहेत. यात बांधकाम विभागात मनुष्यबळाचा अभाव असल्याने प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतीवर जाऊन विहीर बांधकामासाठी लेआऊट देण्यासाठी विलंब होत आहे.
दुसरे महत्वाचे कारण म्हणजे वेळेवर खोदकाम करणारे कंत्राटदार व मजूर उपलब्ध होत नाही. काही लाभार्थ्यांच्या शेतीलगत इतर शेतकऱ्यांच्या शेतीत रबी पीक असून लाभार्थ्यांच्या शेतीत बांधकाम साहित्य पोहचणे शक्य होत नाही. आणखी इतर कारणांमुळे विहिरीच्या कामांना उशीर होत असल्याचे दिसून येत आहे. (तालुका प्रतिनिधी)