दुरूस्तीच्या नावावर फक्त खड्डे खोदकाम

By Admin | Updated: September 6, 2014 23:56 IST2014-09-06T23:56:51+5:302014-09-06T23:56:51+5:30

आमगाववासीयांसाठी वरदान ठरलेली येथील वाढीव पाणी पुरवठा योजना राजकीय खेळीमुळे मात्र आता शाप वाटू लागली आहे. घाईघाईने झालेल्या लोकार्पणानंतर लगेच पाईप लाईन फुटून पाण्याचा नासाडा यातून होत आहे.

Only digging pits in the name of repair | दुरूस्तीच्या नावावर फक्त खड्डे खोदकाम

दुरूस्तीच्या नावावर फक्त खड्डे खोदकाम

आमगाव : आमगाववासीयांसाठी वरदान ठरलेली येथील वाढीव पाणी पुरवठा योजना राजकीय खेळीमुळे मात्र आता शाप वाटू लागली आहे. घाईघाईने झालेल्या लोकार्पणानंतर लगेच पाईप लाईन फुटून पाण्याचा नासाडा यातून होत आहे. यावर आळा घालण्यासाठी दुरूस्तीच्या नावावर आता मात्र जागोजागी खड्डे खोदकाम काम सुरू असल्याचा प्रकार दिसून येत आहे.
आज शहराची लोकसंख्या २० हजार च्या घरात आहे. वाढत्या लोकसंख्येला लक्षात घेता शासनाने दोन कोटींची वाढीव पाणी पुरवठा योजना दिली. मात्र या योजनेला दुसऱ्या योजनेत समाविष्ट करण्याचा नाद अंगलट आल्याचा प्रकार घडला. योजनेची पाईप लाईन टाकण्याचे काम सुरूच असतानाच घाईघाईत या योजनेचे लोकार्पण करण्यात आले.
शहरासाठी वरदान म्हणून या योजनेकडे बघितले जात होते. मात्र श्रेय लाटण्याचे राजकारण या योजनेसाठी शाप ठरू लागले आहे. नियोजन शून्य कारभारामुळेच एक ना एक विघ्न या योजनेच्या आडी येत आहे. काम अपूर्ण असूनही त्यातून पाणी पुरवठा सुरू केल्याने पाईप लाईन फुटून पाण्याचा नासाडा होऊ लागला आहे. पाणी वाचवाचा संदेश दिला जात असताना शहरात मात्र पाण्याचा खुलेआम अपव्यय होत आहे.
दुरूस्ती करण्याचे काम हाती घेण्यात आले असून फक्त खड्डे खुदाईचा प्रकार सुरू असल्याचे बघावयास मिळत आहे. हा प्रकार मात्र आता शहरवासीयांत चिड निर्माण करीत आहे. खोदण्यात येत असलेल्या खड्यांमुळे नागरिकांना एकतर वाहतूकीला त्रास होत आहे. शिवाय पाणी पुरवठा खंडीत झाल्याने नागरिकांचा पारा चढला आहे. त्यात आता पाईप लाईनच्या दुरूस्तीचे सोंग केले जात असल्याने नागरिकांच्या सहनशक्तीचा अंत होऊन ज्वालामुखी कधी फुटतो हेच बघायचे आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Only digging pits in the name of repair