फक्त ६३९ जणांचीच बीएसएनएलला पसंती
By Admin | Updated: July 14, 2015 02:19 IST2015-07-14T02:19:23+5:302015-07-14T02:19:23+5:30
दूरसंचार क्षेत्रात शासनाने ‘पोर्टेबिलिटी’ ही सेवा सादर करून नागरिकांना आपली मनपसंत कंपनी निवडून त्यांची सेवा घेण्याची

फक्त ६३९ जणांचीच बीएसएनएलला पसंती
कपिल केकत ल्ल गोंदिया
दूरसंचार क्षेत्रात शासनाने ‘पोर्टेबिलिटी’ ही सेवा सादर करून नागरिकांना आपली मनपसंत कंपनी निवडून त्यांची सेवा घेण्याची मुभा उपलब्ध करवून दिली. असे असतानाही नागरिकांचा कल शासकीय व सर्वात स्वस्त अशा बीएसएनएलकडे दिसत नाही.
सेवा थोडी महाग असली तरी चालेल पण चांगली सेवा मिळावी या अपेक्षेने मोबाईल ग्राहकांचा कल खाजगी कंपन्यांकडे जास्त बघावयास मिळत आहे. ‘पोर्टेबिलीटी’ची ही सेवा सुरू झाल्याच्या साडेपाच वर्षांच्या काळात फक्त ६३९ जणांनीच बीएसएनएलची सेवा निवडल्याची माहिती आहे.
खाजगी क्षेत्रातील एखाद्या सेवेपेक्षा शासकीय सेवेला स्वीकारण्याकडे तसा नागरिकांचा जास्त कल दिसून येतो. हेच कारण आहे की, शासकीय सेवा स्वस्त व त्यासाठी दगदग करावी लागली तरी ती परवडते अशी प्रतिक्रीया नागरिकांकडून व्यक्त केली जाते. तशी ही वास्तवीकताही आहे. मात्र दूरसंचार क्षेत्रात बीएसएनएल बाबतीत ही परिस्थिती काही औरच आहे. कारण शासकीय यंत्रणेतील ही सेवा असून अन्य खाजगी कंपन्यांच्या तुलनेत स्वस्त ही आहे. मात्र नागरिकांचा कल बिएसएनएलकडे नसून खाजगी कंपन्यांची सेवा स्वीकारण्याकडे जास्त दिसून येतो.
बीएसएनएल दूरसंचार क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी असून शासकीय क्षेत्रात असल्याने ति एक भरवश्याची कंपनी आहे. अन्य खाजगी कंपन्यांप्रमाणे आपल्या ग्राहकांच्या खिशाला चुना लागू नये म्हणून अत्यंत स्वस्त दरात कंपनीकडून सुविधा पुरविली जाते. मात्र पुरविण्यात येणाऱ्या सुविधांच्या दुबळेपणामुळे नागरिकांना आता बीएसएनएल नकोशी वाटू लागली आहे.
यात विशेष म्हणजे बीएसएनएल मोबाईल सेवेला घेऊन तर बीएसएनएलला आता ‘भूल से ना लेना’ असा नि:शुल्क सल्ला एकमेकांना दिला जातो. परिणामी बीएसएनएलचा ग्राहक वर्ग दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. यामागचे कारण खुद्द बीएसएनएलद्वारे पुरविण्यात येणारी बोगस सेवाच ठरत आहे.
पोर्टेबिलिटीतून ६३९ जणांनी निवडले बीएसएनएल
वापरात असलेला मोबाईल क्रमांक तोच ठेवून आपल्या पसंतीची दूरसंचार सेवा निवडता यावी यासाठी शासनाने मार्च २०१० मध्ये ‘पोर्टेबिलीटी’ ही सेवा सुरू केली. त्यानुसार, आतापर्यंतच्या सुमारे साडे पाच वर्षांच्या काळात फक्त ६३९ जणांनीच बीएसएनएल ची निवड केल्याची माहिती विभागाकडून मिळाली आहे. यात सन २०१५ मध्ये तर फक्त ६४ जणांनीच सेवा घेतली असल्याचे दिसून आले. एकंदर यातून बीएसएनएल आता लोकांना नापसंत असल्याचे दिसून येत आहे.
जिल्ह्यात सर्वाधिक
९५ टॉवर्स
बीएसएनएलचे जिल्ह्यात सर्वाधिक ९५ टॉवर्स आहेत. शहरी भागापासून ते अतिदुर्गम भागांत बीएसएनएलचे हे टॉवर्स असल्याने सर्वत्र बीएसएनएलची सेवा मिळते. खाजगी कंपनांच्या या तुलनेत कमी टॉवर्स आहेत. त्यामुळे दुर्गम भागात फक्त बीएसएनएलच काम करते. मात्र असे असतानाही बीएसएनएलकडून पुरविण्यात येणारी सेवा उत्तम नसल्याने बीएसएनएलचे कॉलच लागत नाहीत. परिणामी टॉवर असल्यावरही बीएसएनएलचा मोबाईलधारक आउट आॅफ कव्हरेज एरिया दाखवितो. ग्रामीण भागात तर सर्रास ही समस्या उद्भवत आहे.