कर्जमुक्तीसाठी फक्त ३७४ प्रस्ताव
By Admin | Updated: June 2, 2015 01:38 IST2015-06-02T01:38:35+5:302015-06-02T01:38:35+5:30
राज्य शासनाने शेतकऱ्यांनी सावकारांकडून घेतलेले कर्ज माफ करण्यासाठी परवानाधारक सावकारांकडून प्रस्ताव

कर्जमुक्तीसाठी फक्त ३७४ प्रस्ताव
गोंदिया : राज्य शासनाने शेतकऱ्यांनी सावकारांकडून घेतलेले कर्ज माफ करण्यासाठी परवानाधारक सावकारांकडून प्रस्ताव मागविले आहेत. मात्र जिल्हा उपनिबंधकांकडून मिळालेली माहिती आश्चर्यजनक आहे. ३० मे पर्यंत जिल्ह्यातील फक्त तिरोडा व देवरी तालुक्यातून जेमतेम ३७४ प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. यावरून कर्जमाफी योजनेप्रती सावकारांची अनास्था की, त्यांना योजनेबद्दल माहिती मिळालेली नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
यंदा सर्वत्र दुष्काळी स्थिती आहे. सततच्या नैसर्गिक संकटाच्या पार्श्वभूमीवर विदर्भ व मराठवाडा या दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये वाढ होत आहे. खासगी सावकारांकडील कर्ज हे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमागील प्रमुख कारण असल्याचे विविध समितींच्या अहवालांतून पुढे आले आहे. त्यामुळे दुष्काळी भागात मोडत असलेल्या विदर्भ व मराठवाड्यातील शेतकरी किंवा त्यांच्या कुंटुंबातील सदस्यांनी परवानाधारक सावकारांकडून घेतलेल्या कर्जाला माफी देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यासंदर्भात तसे आदेश जारी करण्यात आले आहे.
त्यानुसार, परवानाधारक सावकारास शेतकऱ्यांकडून ३० नोव्हेंबर २०१४ अखेर येणे असलेले कर्ज व या कर्जावर शासनाने विहित केलेल्या व्याजदराने ३० जून २०१५ पर्यंत होणारे व्याज या योजनेत पात्र राहणार आहे. ती रक्कम शासनामार्फत सावकारास अदा केली जाणार आहे. यासाठी शासनाने राज्यातील अंदाजे १५६.११ कोटी व त्यावर शासनाने विहित केलेल्या व्याजदराने होणारे व्याज सुमारे १५.१९ कोटी अशा एकूण १७१.३० कोटी रूपयांची तरतूद केली आहे. यासाठी परवानाधारक सावकाराने शेतकऱ्यांना दिलेल्या कर्ज व व्याजाच्या तपशिलासह विहित नमुन्यात संबंधित तालुक्याचे सहकारी संस्थांचे सहायक निबंधक यांच्याकडे प्रस्ताव सादर करावयाचे आहे.
मात्र जिल्ह्यातील प्रस्तावांची आकडेवारी आश्चर्यजनक आहे. ३० मे पर्यंत जिल्ह्यात फक्त ३७४ प्रस्ताव प्राप्त झाल्याची माहिती आहे. यातही फक्त तिरोडा व देवरी या तालुक्यांतीलच हे प्रस्ताव असून तिरोडा तालुक्यातून ११२ तर देवरी तालुक्यातून २६२ प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. वरील आकडेवारी बघता या योजनेबद्दल परवानाधारक सावकारांपर्यंत माहिती पोहोचली नसल्याचे तसेच माहिती असूनही त्यांची या योजनेप्रती अनास्था असल्याचे म्हणणे वावगे ठरणार नाही. (शहर प्रतिनिधी)
१२३ सावकारांकडून एकही प्रस्ताव नाही
४जिल्ह्यात २०१ परवानाधारक सावकार आहेत. यात गोंदिया तालुक्यात ७७, तिरोडात ५२, गोरेगाव ५, आमगाव १३, सालेकसा ३, अर्जुनी-मोरगाव २५ तर देवरी तालुक्यात २६ सावकारांचा समावेश आहे. यातील तिरोडा व देवरी तालुक्यातील सावकारांकडूनच ७८ सावकारांनी आतापर्यंत ३७४ प्रस्ताव सादर केले आहेत. उर्वरित १२३ सावकारांनी एकही प्रस्ताव सादर केला नाही. सादर झालेल्या तिरोडा तालुक्यातील ११२ प्रस्तावांत ८६.७५ लाख रूपयांची मुद्दल असून ६४.३० लाख रूपये कर्ज असे एकूण १०१.०५ लाख रूपये आहेत, तर देवरी तालुक्यातील २६२ प्रस्तावांत ४७.०९ लाख रूपयांची मुद्दल असून ७.५३ लाख रूपये व्याज असे एकूण ५४.६२ लाख रूपयांचे प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत.
३० नोव्हेंबर २०१४ पूर्वी ज्या शेतकऱ्यांनी परवानाधरक सावकारांकडून कर्ज घेतले आहे अशा शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यासाठी परवानाधारक सावकारांनी सहायक निबंधक कार्यालयात त्वरित प्रस्ताव सादर करावेत. जेणेकरून ३० जूनपूर्वी सर्व प्रस्तावांची छानणी होऊन प्रत्यक्षात या योजनेची अंंमलबजावणी करता येईल.
- दिग्विजयसिंह आहेर
जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, गोंदिया